ग्रीकमध्ये भूकंप, १० नागरिकांचा मृत्यू
 महा त भा  13-Jun-2017


ग्रीकमध्ये काल झालेल्या भूकंपामध्ये १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मध्यम तीव्रतेच्या या भुकंपामुळे शेकडो नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. दरम्यान ग्रीक प्रशासनाकडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. भुकंपामुळे ढासळलेल्या घरांचे ढिगारे उचलणे तसेच नागरिकांसाठी मदतशिबिरे प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहेत.


ग्रीकच्या पूर्वेकडे असलेल्या लेस्वोस द्वीपसमूहाजवळ हा भूंकप काल रात्री झाला. भूकंपाची तीव्रता ६.३. रिश्टर स्केल ऐवढी मोजण्यात आली आहे. ग्रीकच्या पूर्वेकडे असलेल्या एजियन सागरात या भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे सांगितले जात आहे. मध्य रात्री १२.३० च्या सुमारास शहरामध्ये भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के जाणवले. पहिला धक्का ६.१ रिश्टर तर दुसरा ६.३ रिश्टर तीव्रतेचा होता. भूकंपाच्या धक्कामुळे अनेक ठिकाणची घरे आणि इमारती काही क्षणातच जमीनदोस्त झालेल्या. भूकंपाचा भीतीने अनेक नागरिक आपापल्या घरातून रस्तावर आले होते. थोड्यावेळाने भूकंप थांबल्यानंतर प्रशासने तातडीने मदतकार्य धाडण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ढिगाऱ्यातून १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच वित्तहानीचा नेमका आकडा अजून कळलेला नाही.