बालमजूरी प्रथेविरोधात अकोल्यात जनजागृती
 महा त भा  12-Jun-2017


 

लहान मुले, किशोरवयीन व दिव्यांगाचाही सहभाग

जागतिक बालमजूरी विरोधी दिवसानिमित्त राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे आज नागरिकांनी जनजागृती फेरी काढली. या वेळी बालमजूरी प्रथेविरोधी जनजागृतीसाठी आयोजित स्वाक्षरी अभियान व मोटरसायकल रॅलीला लहान मुले, किशोरवयीन व दिव्यांगाचीही मोठी उपस्थिती होती.

इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या जनजागृती फेरीची सुरुवात झाली. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी चौकात उभारलेल्या फलकावर नागरिकांनी स्वाक्षरी केली.

अग्रभागी चित्ररथ व त्यामागे दुचाकीस्वार स्वयंसेवक असे जनजागृती फेरीचे स्वरूप होते. जयस्तंभ चौक-जुना कॉटन मार्केट-विलास नगर-शेगाव नाका-पंचवटी या मार्गाने इर्विन चौकात परत येऊन तिचा समारोप झाला.

या जनजागृती फेरीत शालेय विद्यार्थ्यी पालकांसोबत सहभागी झाले होते. यावेळी या शालेय मुलांच्या हातातील फलकांवर आम्हाला विद्यार्थी म्हणून जगू द्या, शिक्षण हा आमचा अधिकार आहे, बालकामगार हा अभिशाप आहे व बालमजूरी करून घेणे गुन्हा आहे, बालमजुरी प्रथा हद्दपार झाल्यावरच भारत खऱ्या अर्थाने स्वच्छ व सुंदर होईल अशा आशयाचा अतिशय अर्थपूर्ण मजकूर झळकत होता.