काश्मीर प्रश्नी रशियाचा पाकिस्तानला पाठींबा ?
 महा त भा  12-Jun-2017

भारत आणि रशिया यांच्या मैत्रीला यंदा ७० वर्ष पूर्ण होत आहेत. दोन्ही देशाची मैत्री जगासमोर एक आदर्श म्हणून आज उभी आहे. जगाच्या पाठीवर रशियाने नेहमीच भारताच्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन केले. पाकव्याप्त काश्मीरप्रश्नी देखील अनेक वेळा रशियाने भारताची बाजू घेतली आहे. परंतु रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मात्र भारताचा चुकीचा नकाशा मंत्रालयाकडून छापण्यात आला आहे. या नकाशामध्ये गिलगीट, बाल्टीस्थान हा पाकिस्तानचाच अधिकृत भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर श्रीनगरपासून खालचा भाग हा भारतामध्ये असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीर प्रश्नी रशियाचा पाकिस्तानला पाठींबा आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

केवळ पाकिस्तानलाच नाही तर चीनला देखील पाठींबा ?

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर रशियाचे जगभरातील देशांशी असलेले संबंध दर्शवण्यासाठी एक नकाशा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नकाशामध्ये सर्व देश आणि त्यांच्या सीमा दर्शवण्यात आल्या आहेत. यामध्ये भारत, चीन आणि पाकिस्तान देखील दर्शवण्यात आले आहेत. परंतु यात पाकव्याप्त काश्मीर आणि चीनच्या ताब्यात असलेला अक्साई चीनचा प्रदेश हा अनुक्रमे पाकिस्तान आणि चीनचा अधिकृत भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर भारताच्या ताब्यात असलेला जम्मूचा भाग हाच तेवढा भारताचा अधिकृत भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीरप्रश्नी भारताची बाजू घेणाऱ्या रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून झालेली ही चूक अजिबात दुर्लक्षित करण्यासारखी नाही.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरचे कोडे गेल्या ७० वर्षांपासून अद्याप सुटलेले नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतर संपूर्ण काश्मीरप्रदेश हा अधिकृतपणे भारतात सामील करण्यात आला होता. याचे पुरावे देखील भारताकडे उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रिटेनने देखील या गोष्टीला दुजोरा देत भारताची बाजू घेतली होती. तसेच पाकिस्तानची चांगलीच कानउघडणी केली होती. रशियाने देखील अनेक वेळा काश्मीरप्रश्नी भारताची बाजू घेतली आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात काश्मीर प्रश्नी भारताचे पारडे त्यामुळे नेहमी जड राहिले आहे. परंतु रशियाच्या या चुकीमुळे भारताची अखंडता आणि सर्वभौमात्वावर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर कारवाई करत ही चूक लवकर दुरुस्त करण्याची गरज आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर असलेला हा नकाशा म्हणजे रशियाची एक चुक आहे, का रशियातर्फे हे जाणूनबुजून करण्यात आले आहे. या बद्दल काही कल्पना नाही. मात्र भारताच्या दोन्ही शत्रू राष्ट्रांसंबंधी विवादित असलेल्या भूभागाबद्दल असे होणे म्हणजे काही निव्वळ योगायोग नाही. त्यामुळे या नकाशाच्या माध्यमातून भारत आणि रशियाच्या या अत्यंत जुन्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

- संतोष कसबे