आज होणार जीएसटीची १६ वी बैठक
 महा त भा  11-Jun-2017


 

देशात नव्याने लागू करण्यात येणाऱ्या 'वस्तू आणि सेवा करप्रणाली' कायद्याचा आढावा घेण्यासाठी आज जीएसटीची १६ बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. गेल्या काही बैठकांमध्ये वस्तूंचे ठरवण्यात आलेल्या जीएसटी दरांचा देखील पुनर्विचार करण्यात येणार आहे.


अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या बैठकीचा मुख्य अजेंडा हा जीएसटी संबंधीच्या तयारींचा आढावा घेणे तसेच १५ व्या बैठकीत ठरवण्यात आलेल्या दरांवर पुनर्विचार करणे हा आहे. देशातील उद्योजक आणि सामान्य जनतेनी काही वस्तूंवर आकारण्यात येणारा जीएसटी दर कमी केला जावा, अशी मागणी केली होती. यानंतर या दरांवर पुनर्विचार करून त्यामध्ये बदल करण्याचा विचार सरकार करत होते. त्यामुळे या बैठकीत यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.


येत्या १ जुलैपासून संपूर्ण देशात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जीएसटी संबंधीच्या सर्व कामांना गती आली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटीच्या बैठकीत देशांतर्गत वस्तूंचे दर तसेच त्यावर आकारण्यात येणाऱ्या करांचे दर ठरवण्यात आले होते. याच बरोबर जीएसटी लागू केल्यानंतर देशात ई-बिल देखील सक्तीचे करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे वाहतूक आणि तत्सम व्यवसायातील व्यावसायिकांनी या गोष्टीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.