सुषमा स्वराज यांच्याकडून कैलाश मानसरोवर यात्रेला हिरवा झेंडा
 महा त भा  11-Jun-2017

 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उद्या निघणाऱ्या कैलाश मानसरोवर यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भाविकांचा काफिला कैलाश मानसरोवर यात्रेसाठी निघणार आहे. त्यासाठी सुषमा स्वराज यांनी या यात्रेत जाणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. उद्या निघणाऱ्या या यात्रेमध्ये ५८ भाविकांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

कैलाश मानसरोवर यात्रेसाठी यावर्षी ४५०० भाविकांचे अर्ज त्यांना आले होते, त्यातून त्यांनी ६० भाविकांची निवड केली होती. मात्र, दोन भाविकांची शारीरिक स्थिती कमकुवत असल्याने त्यांना जाता येणार नसल्याने या यात्रेसाठी ५८ भाविकांचा काफिला उद्या नवी दिल्ली येथून रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या प्रवासात कोणत्याही भाविकाने रस्त्यावरून जातांना प्लास्टिकची पिशवी अथवा पाण्याची रिकामी बाटली रस्त्यावर टाकू नये, ही यात्रा सुखरूप व प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी सुषमा स्वराज यांनी भाविकांना सल्ला दिला.

 

कैलाश मानसरोवर यात्रा अजून सुखकर होण्यासाठी स्वराज वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असून यानंतर हा प्रवास अजून सुखकर व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.