आयुर्वेदिक रेसिपी- चंद्रप्रभा क्षीरिका
 महा त भा  09-May-2017

पायस/क्षीरिका (पौष्टिक खिरी)

 

पयसि पयसा वा संस्कृतमन्नम् ।
                                                              (चरक संहिता, अष्टांग हृदय)

अर्थ:- दुधापासून केल्या जाणाऱ्या खीरीला 'पायस किंवा क्षीरिका' असे म्हणतात.

तांदूळ, गहू, नारळ, शेवया, रवा यांपासून खीर तयार केली जाते. आयुर्वेदाने खिरीला बल्य (बळ प्रदान करणारी) व पौष्टिक सांगितले आहे. सणासुदीला अथवा शुभ प्रसंगी आपल्याकडे काहीतरी गोड़ करायची प्रथा आहे. खीर हा सर्वांच्या पसंतीचा पदार्थ असल्यामुळे सर्वात जास्त प्रमाणात केला जातो.

खीर ही पचायला जड असल्यामुळे अग्नीचे बळ चांगले असणाऱ्यांनी मनसोक्त खावी. पचन शक्ती कमी असणाऱ्यांनी मात्र खीरीचे सेवन झाल्यावर गरम पाणी प्यावे म्हणजे खीर सहजपणे पचते.

या सदराची सुरुवात आपण स्वादिष्ट तांदळाच्या खिरीपासून करत आहोत.

 

चंद्रप्रभा क्षीरिका (तांदळाची खीर)

 

संदर्भ :- क्षेमकुतूहल

 


भारतात सर्वात जास्त प्रमाणात खाल्ली जाणारी धान्ये म्हणजे तांदूळ व गहू. आयुर्वेदामध्ये दोन्हीचे वर्गीकरण "शूक वर्गात" केले जाते.

मधुर आणि कषाय (तुरट) रस (चव) असणारे हे धान्य थंड आहे म्हणून पित्त दोष कमी करते आणि वात व कफ दोषाला किंचित वाढवते. ही खीर अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे वजन वाढवायचे असल्यास आणि पचन शक्ती चांगली असल्यास ही आठवड्यातून दोनदा खायला द्यावी. खीर करायची सामान्य कृती ही साधारण समान आहे. पाहूया तांदळाच्या खिरीचे गुण-धर्म त्याच्या कृतीसह.

 

साहित्य:-

 

१/४ कप  तांदूळ  

१ लिटर गाईचे दूध 

४ चमचे गाईचे तूप

१/३ कप साखर  

२ चमचे मध                            

४ वेलच्या

केशर - ३-४ काड्या

बदाम, पिस्ता - वरून घालण्याकरिता

 

वाढणी :-

 

कृती :-

१. सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत. धुतलेले तांदूळ साधारण अर्धा तास पाण्यात भिजत घालावेत.

२. एका कढईत ३ चमचे तूप घालून भिजवलेल्या तांदळातील पाणी काढून टाकून तांदूळ ५-१० मि. तुपावर परतून घ्यावे.

३. दुसऱ्या पातेल्यात १ लि. दूध गरम करायला ठेऊन द्यावे. अर्ध पक्व दुधामध्ये तुपावर परतलेले तांदूळ घालावे.

४. दूध व तांदळाचे मिश्रण मध्यम आचेवर आटविण्यास ठेऊन सतत ढवळत राहावे.

५. साधारण निम्मे दूध आटल्यावर साखर, राहिलेले तूप, अर्धे केशर व वेलची कुटून घालावी.

६. तांदूळ चांगले शिजून दाट खीर तयार होईपर्यंत मध्यम आच ठेवावी.

७. खीर थोडी गार झाल्यावर bowl मध्ये वरून कापलेले बदाम, पिस्ता व केशर घालून सजवून सर्व्ह करावी.

 

फलश्रुती :-

 

१. वातपित्तनाशक - वात व पित्त दोषाचे शमन करते.

२. गुरु - खीर हा पदार्थ मूलतः पचायला जड असतो. पचन शक्ती कमी असल्यास जास्त प्रमाणात खाऊ नये.

३. बल्य व धातुपुष्टीकर - पौष्टिक असणारी ही खीर शरीरास बळ देते व धातूंचे व शरीराचे पोषण करते. वजन कमी असणाऱ्यांनी पचन शक्ती चांगली असल्यास ही खीर अधून-मधून खावी.

४. मलावरोधक - तांदळाची खीर मलाला बांधते त्यामुळे मल घट्ट होतो परिणामी मलावरोध (constipation) होऊ शकतो.

५. रक्तपित्त - रक्त व पित्त दूषित झाल्यामुळे नाक, कान व गुदप्रदेशावाटे रक्तस्त्राव होणाऱ्या व्याधिस रक्तपित्त म्हणतात. रक्तपित्त व्याधीमध्ये तांदळाची खीर अतिशय पथ्य आहे.

६. दाह - अंगाची आग होत असल्यास ह्या खीरीने ती कमी होते. 

 

उन्हाळ्यामध्ये अति उकाड्यामुळे झालेला शक्तिऱ्हास भरून काढण्यासाठी ही खीर अतिशय उपयुक्त आहे. मात्र पचन शक्ती प्रबळ नसल्यास खिरीचे सेवन थोड्या प्रमाणात करावे हे पुन्हा नमूद करावेसे वाटते.

 

- वैद्य विशाखा मोघे