जलयुक्त शिवार अभियानाचा निधी खर्च करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत
 महा त भा  08-May-2017

जलयुक्त शिवार अभियानाचा तीन वर्षांचा घेतला आढावानिधी शेतकऱ्यांसाठी खर्च करण्याच्या सूचना


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानासाठी राज्य शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी शेतकऱ्यांसाठी टंचाईवर मात करणाऱ्या जलसंधारण कामांसाठी खर्च व्हावा. तसेच, सन 2016-17 या आर्थिक वर्षातील या योजनेंतर्गतची कामे पूर्ण करण्याचा कालावधी संपला आहे. राज्य शासनाने ही कामे करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. तरी अभियानाशी संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करून युद्ध पातळीवर ही कामे पूर्ण करावीत, असे आदेश जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.

या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी करताना हलगर्जी करणाऱ्या संबंधित यंत्रणांवर जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करावा. तसेच, कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची अनामत रक्कम जप्त करावी, असेही आदेश देऊन प्रा. शिंदे म्हणाले, सन 2017-18 साठी या अभियानांतर्गत प्रकल्प आराखडा तयार करताना संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावे टंचाईमुक्त होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी तहसीलदारांनी संबंधित विधानसभा सदस्य, लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले.

खोत म्हणाले, सन 2016-17 ची प्रलंबित कामे पूर्ण करणे हे एक आव्हान आहे. या कामांना संबंधित यंत्रणांनी गती द्यावी. कारण ही कामे झाली नाहीत तर ती गावे या अभियानापासून वंचित राहतील.