आज हो न हो कल हमारा है... नॉर्थ ईस्ट वेज(एनईवेज)
 महा त भा  03-May-2017

 
आसामचा चहा तर जगप्रसिद्ध, त्या जोडीला तपशीलवार विचार केला तर मेघालयमध्ये पिकणार्‍या हळदीमध्ये सगळ्यात जास्त औषधी गुणधर्म आढळतात. मेघालयमध्ये झाडूसाठी लागणारे गवत सर्व देशभरात जाते. नागालँडमधल्या मिरच्या सर्वात जास्त तिखट. त्रिपुराच्या बांबूच्या वस्तू, मणिपूरमध्ये तयार होणारी सुंदर लाकडी खेळणी, अरुणाचलमधील नानाविध फळं आणि फुलं. पण या सर्वांचा उपयोग काय? कुणासाठी? याचा वेध घेतला तर जाणवले की, व्यवस्थित अर्थार्जन देणार्‍या या घटकांचा योग्य वापर केला, तर उत्तर -पूर्वेकडील राज्ये आर्थिकदृष्ट्या स्थिर बनतील. त्या स्थिरतेसाठी ‘एनईवेज’ म्हणजे ‘नॉर्थ ईस्ट वेज’ संस्था काम करीत आहे.
 
उत्तर-पूर्व भारतात रा.स्व.संघातर्फे विस्तारक म्हणून गेलो असता आणि त्यानंतरही अनेकदा कामानिमित्त तिथे दीर्घ वास्तव्याला गेलो असता, मला एकच सत्य आढळले, ते म्हणजे भाकरी दान करण्यापेक्षा भाकरी कमवायला आणि बनवायला शिकवली तर भाकरी दान करण्याची वेळच येणार नाही, आणि ज्यांना भाकरी दान करत आहोत त्यांना दान घेण्याची विपरीत परिस्थिती उरणार नाही.’’ ’एनईवेज’चे प्रमुख दयानंद सावंत सांगत होते.
 
गोरेगावला राहणारे टिपिकल मराठमोळ्या घरातले दयानंद सावंत उत्तर-पुर्वेकडील राज्यातल्या स्थितीवर भाष्य करत होते की, ’’उत्तर-पूर्व राज्यात अनेक प्रश्न आहेत, जितके प्रश्न आहेत तितक्या किंवा त्याहीपेक्षा दसपट जास्त काम करणार्‍या सामाजिक स्वयंसेवी संस्था आहेत. धार्मिक, सामाजिक, पर्यावरण या ना त्या नावाने सर्वच संस्था काम करत आहेत. त्या कामाचे स्वरूप अर्थात उत्तर-पूर्व भारतात काहीतरी सकारात्मक चांगले व्हावे असेच आहे. मी ही अशा कामांसाठी जोडलो गेलो. काम करता करता मला जे अनुभव आले त्यातूनच ’एनईवेज’चा जन्म झाला.’’
    
उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये आणि उर्वरित भारतामध्ये एक दरी आहे, असे म्हटले जाते आणि काही प्रमाणात ते म्हणणे खरेही आहे. ती दरी, तो दुरावा कदाचित राहणीमान, खानपान, वेशभूषा, केशभूषा या सर्वांच्या पलीकडे जाऊन उरणारा आहे. दैनंदिन जीवनाला व्यापून उरणारा भावनिक दुवा. तो भावनिक दुवा उत्तर-पूर्व राज्यांमध्ये आणि उर्वरित भारतात प्रस्थापित व्हावा, ही भारताची आणि काळाचीही गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संस्था तसेच इतरही काही संस्था प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्याचीच मधुर फळे म्हणून उत्तर-पूर्वकडील राज्ये आणि उर्वरित भारतात सौख्याचे आणि आपुलकीचे नाते जुळले आहे. त्यातूनच प्रेरणा घेऊन दयानंद सावंतांनी ’एनईवेज’ नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ’एनईवेज’ म्हणजे ’नॉर्थ ईस्ट वेज’, म्हणजे उत्तर-पूर्वेकडे जाणारा रस्ता. दयानंद सांगतात, ’’उत्तर-पूर्वेकडील राज्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करतो. आंतरिक तळमळ म्हणून तिथे सेवाभावी व्यक्ती स्वतःचा वेळ, ऊर्जा, धनही देतात. विद्यार्थी शिकतात. शिकल्यानंतर काय? शिकल्यानंतर शिकून दर्जा वाढलेला असतो. मात्र ते जे शिकले आहेत त्याला पोषक होतील, अशा नोकर्‍या त्यांना तिथे उपलब्ध होतच नाहीत. नोकर्‍या पुरवू शकतील असे मोठे उद्योगधंदेच नाहीत. मग हे आधुनिक तंत्रज्ञान शिकलेले युवक रोजगाराच्या आशेने शहराकडे निघतात. त्यातही उत्तर-पूर्व राज्याच्या बाहेरच्या प्रदेशाकडे स्थलांतर करतात. त्यामुळे होते काय की गावं रिकामी होतात. गावाचं एक समाजचक्र, अर्थचक्र थांबते. त्याचाच फायदा बांगलादेशी घुसखोर घेतात. ते उत्तर-पूर्व सीमेलगतच्या प्रदेशातील गावांमध्ये येनकेनप्रकारे बस्तान बसवितात. असं करत करत गावेच्या गाव बांगलादेशींच्या ताब्यात जाण्याच्या मार्गावर आहेत. दुसरे असे की उत्तर-पूर्व भारतातील सांस्कृतिक परंपरा फारच संपन्न आहेत. बांबूपासून बनविलेल्या वस्तू, लाकडाची खेळणी किंवा वापरातल्या वस्तू, हातमागावर विणलेली वस्त्रे, आकर्षक रंगसंगतीच्या नक्षीदार शाली यासाठी उत्तर-पूर्व राज्ये प्रसिद्धच पण बनवलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी बाजारपेठ हवीच ना? तसेच आधुनिक जगाच्या तंत्रज्ञानाशी स्पर्धा करेल, असे उत्पादन असेल तरच लोक त्या वस्तू विकत घेतील ना? बरं या लोकांची उपजीविका शेतीवर आधारित म्हटली तर वर्षाच्या सात-आठ महिने थंडी. मोजून तीन-चार महिने शेती करणार. त्यातही ब्रह्मपुत्रेला पुराचा आणि विध्वंसाचा वारसा लाभलेला. त्यामुळे इथल्या लोकांचे आर्थिक जीवन दुर्दैवीच त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून आम्ही उत्तर-पूर्वेकडील राज्याच्या पारंपरिक आर्थिक उत्पन्नाच्या स्त्रोतांचा अभ्यास केला. त्या पारंपरिक स्त्रोतांचा विकास झाला तर स्थानिक लोकांचे कल्याण होऊ शकते.’’ उत्तर-पूर्वेकडील राज्यांतील पारंपरिक व्यवसायाच्या संवर्धनासाठी विकासासाठी ’एनईवेज’ संस्थेने काही मूल्ये ठरवली आहेत.

* पारंपरिक उत्पादन स्त्रोत शोधणे
* उत्पादन निर्मितीची पारंपरिक प्रक्रिया आणि इतरत्र उत्पादनासाठी वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान यांचा अभ्यास करणे
* आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने स्थानिक उत्पादकांना उत्पादननिर्मितीसाठी फायदा होत असेल, तर ते तंत्रज्ञान त्यांना उपलब्ध करून देणे.
*उत्तर-पूर्वेकडील राज्यांतील खेडेगावात असलेल्या उत्पादन केंद्राशी त्या-त्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान घेतलेल्या व्यक्तींना जोडणे. या तंत्रज्ञान शिकलेल्या व्यक्ती उत्पादन करणार्‍या लोकांना वेळोवेळी सर्वच बाबतीत सल्ला आणि इतरही आवश्यक मदत करतील.
*उत्तर-पूर्वेकडील राज्यांतील खेडेगावातही जर एखादे छोटेसे का होईना, उत्पादन केंद्र सुरू होत असेल तर त्या केंद्राला सर्वतोपरी मदत करणे. कोणत्याही परिस्थितीत ते केंद्र सुरू होऊन व्यवस्थित चालायलाच हवे याची काळजी घेणे.
*उत्तर-पूर्वेकडील राज्यांतील उद्योगवस्तू निर्माण करणार्‍या व्यक्तीचा, संस्थेचा देशातील इतर यशस्वी उद्योजकांशी परिचय करून देणे.
*उत्तर-पूर्वेकडील राज्यांतील पारंपरिक कौशल्यकारांना देशातील इतर राज्यांत निर्हेतुकपणे सहल घडवून आणणे.
 
दयानंदांना विचारले, ’’हे तर खूप मोठे काम आहे, हे सर्व साध्य कसे काय करू शकता?’’ यावर त्यांचे उत्तर होते, ’’१९९६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून मेघालयात गेलो होतो. तेव्हाच तिथल्या बांधवांशी माझे ऋणानुबंध जुळले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांना मी संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिक्षणासाठी आणले. त्यातून पुढे त्या विद्यार्थ्यांच्या गावाशी माझा संबंध येत राहिला. आज त्या विद्यार्थ्यांपैकी शैलेंद्र लासो याने एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आणि तो पुन्हा त्याच्या गावी परतला. तर हरमेस खोंनतरेन याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि परत गावाला गेला. ’एनईवेज’ची संकल्पना तयार झाल्यानंतर हे दोन्ही विद्यार्थी संस्थेच्या मदतीला आले. एकतर ते मेघालयातले स्थानिक आहेत, महाराष्ट्रात शिक्षण घेऊन ते गावात स्थिरावले आहेत. त्यामुळे त्यांची आम्हाला मदत होते. तसेच संदीप पवार हे यशस्वी उद्योजक आणि अजित पालेकर हे टॅक्स कन्सल्टंट हेही देशप्रेम आणि सामाजिक जाणिवेतून संस्थेशी जोडले गेले आहेत. संस्था प्राथमिक अवस्थेत आहे. संस्थेची ध्येयधोरणे गाठण्यासाठी खूप लांबचा पल्ला आहे. पण एक मात्र खरे की चांगल्या कामाला स्वतःहून मदत करायला लोक मात्र तयार होतात.’’
   
संस्थेच्या कार्याची माहिती घेतल्यावर कळले की, ’एनईवेज’ने मेघालयातल्या ३०० महिला कारागिरांशी संपर्क-संवाद साधून त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळेल यासाठी यशस्वी प्रयत्न केला आहे. काही महिन्यांपूर्वीच इथल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आपल्या मुंबईतही भरले होते. तसेच मेघालयमध्ये झाडूच्या गवतांचे वारेमाप उत्पादन होते. हे गवत कापून सुकवणे हा इथल्या जनतेचा पारंपरिक जोडधंदा. पण त्यापलीकडे काय? कारण या गवताचा झाडू बनवून तो विकणे, हा साधा विचारही इथल्या सामान्य जनतेच्या मनात येत नाही. त्यामुळे बाहेरचे उद्योजक कवडीमोलाच्या भावात इथे हे सुकवलेले गवत विकत घेतात आणि झाडू बनवून भाराभर किमतीत ते विकतात. मेघालयमधल्या उत्पादित झाडूच्या गवतांचा वापर करून तिथल्याच स्थानिकांकडून झाडू बनवायचे. ते उत्तम प्रकारे बनवलेले झाडू या लोकांच्या मार्फतच विकायचे. त्यामुळे यांना चार पैसे मिळतील. यासाठी ’एनईवेज’ने तिथल्या लोकांना प्रशिक्षण देऊन, उत्पादित वस्तूंसाठी चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी सर्वेक्षण केले. त्यातूनच मग काही ठिकाणी या स्थानिक लोकांनी बनविलेल्या झाडूंना आणि इतर पारंपरिक उत्पादनांना चांगली मागणी आली आहे. स्वकष्टाने मिळविलेल्या छोट्याशाही गोष्टींचे मूल्य होऊच शकत नाही. हाताला काम आणि कामाला योग्य दाम मिळाले तर भारतासारख्या युवा देशाच्या भाळी आलेली बेकारी, बेकारीमुळे येणारे नैराश्य, त्यातून होणार्‍या सर्वच स्तरांवर नुकसान करणारा विध्वंस यांचा बिमोड होऊ शकतो. ’एनईवेज’च्या या उपक्रमाद्वारे खारीच्या वाट्याने का होईना ते साध्य होत आहे.

 
’एनईवेज’ने मुंबईतील अनेक तंत्रशिक्षण देणार्‍या संस्था आणि महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे. या संस्थांमधून उच्च तंत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे तांत्रिक ज्ञान असते. पण प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसतो. तर उत्तर-पूर्वेकडच्या खेड्यात वस्तू उत्पादित करणार्‍यांकडे अनुभव असतो, पण त्या वस्तू निर्मितीसाठीचे आधुनिक ज्ञान नसते. ’एनईवेज’ने या दोन घटकांचा समन्वय साधण्याचे ठरवले आहे. तंत्रज्ञान शिकलेल्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकअनुभव शिक्षण म्हणून किमान एक महिना आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग उत्तर-पूर्वेतील राज्यातल्या कारागिरांसाठी करावा. त्यांना आपले आधुनिक तंत्रज्ञान शिकवावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन क्षमता कशी वाढते याचे ज्ञान द्यावे. वस्तूंची गुणवत्ता सुधारणा आणि वस्तू विक्री यांचा आर्थिक संबंध समजून द्यावा. यासाठी मुंबईतल्या काही महाविद्यालयांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. ’एनईवेज’च्या या उपक्रमातून अनेक विषय साध्य होणार आहेत. पहिला विषय म्हणजे उत्तर-पूर्वेकडच्या कारागिरांना, उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान मिळेल, पण दुसरा अगदी महत्त्वाचा विषय म्हणजे, उर्वरित भारतातले उच्च तंत्रज्ञान घेतलेले युवक उत्तर-पूर्वेकडील राज्यांशी जोडले जातील. त्यातही देशाच्या पूर्वेकडील राज्यांत आपल्याच भारतीय बांधवांसाठी निःस्वार्थी भावाने काम करण्याची प्रेरणा युवकांमध्ये तयार होईल. तसेच देशातील, दुसर्‍या राज्यातील युवक आपलेपणाने आपल्यासाठी झटत आहेत याची जाणीव याची नोंद उत्तर-पूर्वेकडील संबंधित लोक घेतीलच. या अनुषंगाने आठवले, उत्तर-पूर्व राज्यांतून आलेल्या लोकांची चेहरेपट्टी, सवयी भारताच्या उर्वरित प्रदेशातील लोकांशी जुळत नाहीत. त्यामुळे उत्तर-पूर्वेकडील वेगळ्या चेहरेपट्टीचे युवक हे चिनी जपानीच आहेत, असा गैरसमज बहुतेकांना होतो. त्यामुळे उर्वरित भारतापासून आपण वेगळे आहोत, असा गैरसमज या उत्तर-पूर्वेकडील राज्यांकडून आलेल्यांनाही होतो. जेव्हा पुन्हा कधी ते परत आपल्या उत्तर-पूर्वेकडील राज्यांत जातात तेव्हा उर्वरित भारतात आपल्याला भारतीय म्हणून पाहिले गेले नाही, अशी सल घेऊनच जात असतील, नव्हे जातात. त्या पार्श्वभूमीवर एनईवेजचा हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे.
 
'एनईवेज’च्या या देशकल्याणी आणि तितक्याच महत्त्वाकांक्षी योजनेच्या विस्तारासाठी आर्थिक बाजूही तितकीच भक्कम आणि नियोजित हवी. त्याचे प्रयोजन काय? विचारल्यावर दयानंद म्हणाले, ’’सध्या संस्थेच्या विचारांशी सहमत असलेल्या व्यक्तींना जोडण्याचे काम सुरू आहे. निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय संस्था तसेच संबंधित सरकारी विभाग यांच्याशी संपर्क सुरू आहे. सूचना, सल्ला आणि सर्वच प्रकारच्या मदतीची संस्थेला गरज आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे संस्था प्राथमिक स्तरावर आहे. आता कुठे सुरुवात आहे पण काम तर सुरू केले आहे, आता थांबून चालणार नाही. हे संस्थेचेच काम नाही तर देश बांधण्याचे काम आहे. देश बांधण्याच्या कामासाठी सर्वजण पुढे येतीलच अशी खात्री आहे. काम तर थांबणार नाहीच.’’ दयानंद त्यांचे सहकारी आणि एनईवेज संस्थेच्या प्रेरणेला, कर्तव्यनिष्ठेला आणि देशप्रेमी संकल्पनेला मनापासून शुभेच्छा! तसेही, 
 जोश हो देशके हित मे तो
कठिण हो डगर कितनी भी
मंझिल हमारी है
आज हो न हो कल हमारा है..

दयानंद यांनी सांगितलेली एक आठवण... 
ते म्हणाले, ‘‘मी मेघालयात एका स्थानिक नागरिकाच्या घरी गेलो. दाट वृक्षराजीत लपलेले घर. वेगवेगळ्या प्रकारची कधीही न पाहिलेली, कुठेही वाचनात न आलेली झाडे तिथे आढळली. त्या व्यक्तीने एका झाडाकडे पाहात सांगितले, ’’ या झाडाच्या फांदीने रस्त्याला ओरखडा पाडला आणि त्या रस्त्याने एखादी गाडी गेली तर त्या गाडीचा टायर फुटतो.’’ या झाडाचे नाव ‘लक्ष्मणरेखा’ आहे. रामायणात कांचनमृगाची कथा आहे. कांचनमृगासाठी लक्ष्मणला रानात जायचे असते. त्याआधी ते सीतामैयासाठी लक्ष्मणरेखा आखतात. ती रेखा या झाडाचीच. त्याने मला सांगितले. तिथे २०० पेक्षा जास्त औषधी वनस्पती होत्या. त्यातल्या बहुतेक तर त्या परिसराव्यतिरिक्त बाहेर कोणाला माहितीही नसतील. मी हे का सांगतो तर आपल्या देशाची उत्तर-पूर्व राज्ये खरोखरच नैसर्गिक आणि सांस्कृतिकरित्या संपन्न आहेत. त्या संपन्नतेची, संस्कृतीची ओळख उर्वरित देशाला व्हावी यासाठी ‘एनईवेज’ प्रयत्नशील आहे.’’ 

 
 
- योगिता साळवी