‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ला सहा महिन्यांची करमाफी
 महा त भा  26-May-2017


राज्याच्या महसूल विभागाचा निर्णय

माजी क्रिकेटपटू व राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावरील आधारित बहुचर्चित हिंदी चित्रपट ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’चा पुढील सहा महिन्यांचा करमणूक कर माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या महसूल विभागाने जाहीर केला.

आजच शासनाने याबाबतचा निर्णय जाहीर केला. राज्य शासनाने सचिन तेंडुलकर यांची व सदर सिनेमाची मुक्तकंठाने स्तुती केली असून, ‘एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जागतिक दर्जाचा खेळाडू बनण्याकरता आवश्यक असलेल्या उच्च ध्येय, कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटी या सारख्या मानवी कौटुंबिक व सामाजिक मूल्यांबाबतचे महत्व दर्शवून त्याद्वारे क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करण्यास भारतातील तरुण पिढीला प्रेरित करणाऱ्या व भारतीय क्रिकेट संघाचे अलौकिक खेळाडू असलेल्या सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा असल्याचे शासनाने म्हटले आहे. कार्निव्हल मोशन पिक्चर्सचे प्रमुख राजेश नायर यांनी नुकतीच या चित्रपटाला करमणूक शुल्क माफी देण्याची मागणी शासनाकडे केली होती.

सदर विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत सदर सिनेमा उच्च शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक मूल्य दर्शवणारा असल्याचे सांगत महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमातील कलम ६ (अ) नुसार या चित्रपटाला पुढील सहा महिन्यांसाठी करमणूक शुल्क माफ केले आहे. २०० नॉट आउट सिनेमाज या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून जेम्स अर्सकाईन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.