खलनायक नही महाखलनायक है तू..
 महा त भा  25-May-2017

 
महिला फक्त बिछान्यात झोपण्यासाठी चांगल्या असतात, ‘‘असे निर्लज्ज बेताल मत व्यक्त केले तेलगू सिनेमातील खलनायक चलपती रावने. आता हा कोण चलपती का छळपती, याचे म्हणणे इतके का गंभीरपणे घ्यायचे, असेही मनात आले. पण, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, तर काळ सोकावत आहे. चलपती राव हा तेलगू सिनेसृष्टीतला खलनायक. ‘नायक नही, खलनायक है तू...‘ गाणं प्रसिद्ध आहे, पण चलपती रावबद्दल तर ‘खलनायक नही महाखलनायक है तू...’ हेच बोल अचूक ठरावेत. रविवारी हैदराबादमध्ये एका चित्रपटाच्या ध्वनिचित्रफित प्रकाशनाच्या कार्यक्रमात चलपती रावला प्रश्न विचारला गेला की, ‘‘महिलांमुळे मानसिक शांतता भंग होते का?’’ (असा प्रश्न म्हणे त्या चित्रपटामध्ये होता.) तर या प्रश्नाला उत्तर देताना चलपतीने महिलांविषयी वरील संतापजनक उद्गार काढले. पण चलपती राव, तुम्हाला महिला कशासाठी, कधी आणि कुठे योग्य आहेत, हे सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण चलपतीलाच नव्हे, तर या जगात प्रवेश करणार्‍या प्रत्येकालाच नऊ महिने, नऊ दिवस पोटात ठेवून शारीरिक आणि मानसिक झिज सहन करत जन्म देणारी आई हीसुद्धा आई असली तरी सर्वप्रथम एक स्त्रीच असते. अर्थात आया-बहिणींवर जाऊ नये, ही संस्कृती आहेच. पण चलपतीसारख्यांना आठवण द्यायलाच हवी की, महिला आयुष्यभर सर्वच नात्यात सर्वच स्तरावर आपल्या सर्वशक्तिनीशी दुसर्‍यांसाठीच जगत, झटत असतात. काही अपवाद असतीलही, पण ते अपवाद. जगभरातल्या स्त्रिया या कुणाच्या न कुणाच्या आयुष्याला अर्थपूर्ण करण्यासाठी स्वत:चं जगणं हरवून बसतात आणि त्याचं त्यांना सोयर सूतकही नसतं ना दु:ख. उलट त्यात त्यांना परमेश्वर गवसल्याचा आनंद होतो. महिलांच्या या असामान्यतेची ओळख चलपतीला काय किंवा त्याच्यासारखा विचार करणार्‍या इतरही विकृत लिंगभेदींना झाली नसावी, असेच वाटते. चलपती एक व्यक्ती नाही, तर वृत्ती म्हणून पाहिले तर जाणवते की, जिच्याशिवाय आपले आयुष्य पूर्णत्वास येऊच शकत नाही, अशा स्त्रीविषयी असे बोलताना नक्की त्यामागची पार्श्वभूमी काय असेल?
औरत ने जन्मदिया मर्दो को
मर्दोने उसे बाजार दिया...
 
चलपतीसारख्या काही विकृतांच्या नजरेत मनात आणि मेंदूमध्येही ती फक्त ‘औरत’च असते. सडक्या विचारांतून, कृतीतून प्रसवणार्‍या या विचारांना वेळीच ठेचून काढले पाहिजे!
 
 
 
रटरटणार्‍या किड्यांचा हुंकार
स्त्रियांना भोगदासी समजत तिच्या आयुष्याची माती करणारे लोक कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रात उघड-उघड आणि लपत-छपतही भेटतात, दिसतात. काही गोष्टी उघड होतात, तर काही गोष्टी कधीच न उजेडात येणार्‍या अंधारात विलुप्त होतात. गेल्या काही महिन्यांत महिलांविषयी अवमानकारक विधान करणार्‍यांचे जणू पेव फुटले आहे की काय असे वाटते. मग ते अभिनेत्री सनी लिऑन संदर्भातले रामूचे नेमके महिलादिनीच बरळलेले विधान असो वा आपल्याच सोबत राजकीय क्षेत्रात आपल्यापेक्षाही सरस कामकरणार्‍या महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह विधान करणारे जयंत पाटील असो आणि आताचे हे चलपती महाशय. हे सगळे वेगवेगळ्या परिघातील लोक आहेत, पण त्यांचा विचार, केंद्रबिंदू एकच आहे, तो म्हणजे स्त्रियांंना ‘भोगदासी’ही तर ‘भोगवस्तू’ समजणे आणि ‘वस्तू’ काय जिवंतच नसते मुळी; मग तिला भावभावना, मान-अपमान या मानवी संवेदनांचा गंध तो काय.
 
हे सगळे असे असले तरी कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. स्त्रीशक्तीचे अगदी माणूसपणही नाकारले तरी जमाना कालही स्त्रियांचाच होता आणि आजही स्त्रियांचाच आहे. याच्या समर्थनार्थ सर्वच क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत हे घिसेपिटे वाक्य आजही तोंडावर मारता येईल. पण त्याहीपेक्षा वास्तव हेच आहे की, आपल्या सडक्या डोक्यात आलेले विचार जाहीरपणे मांडताना यांच्या नसलेल्या मेंदूचा कितीही ताळतंत्र सुटला तरी त्यानंतर त्यांना हातपाय जोडून थुंकलेले चाटत महिलाशक्तीची माफी मागावीच लागते. अर्थात, त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांच्या मनात स्त्रियांविषयी एकाएकी आदरभाव उत्पन्न झाला, हे असे समजणे म्हणजे मूर्खपणाच ठरावा. ही मंडळी माफी मागतात, कारण सगुण, सकारात्मक आत्मभान आलेला समाज एकदिलाने या विकृत विचारांच्या विरोधात उभा राहतो. या लोकांना कळून चुकले आहे की, विकृतीच्या भावांपलीकडली खंबीर अमूल्य अशी समाजशक्ती, महिलाशक्ती सोबत आहे. त्यामुळे चलपती ‘छळपती’चे विधान म्हणजे, घाणीचिखलात रटरटणार्‍या किड्यांचा हुंकार, ज्यांची दखल घ्यावी की नाही, हा प्रश्नसुद्धा उठत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या विकृत विचारांचे किळसवाणे डबके लखलाभ! डबक्यातच जगा आणि तिथेच रमा! तुमची पर्वा कुणाला? सर्व शक्तिमान महिला शक्तीला तर मुळीच नाही.
- योगिता साळवी