नासा आणि इस्रो बनवणार जगातील सर्वात मोठा उपग्रह
 महा त भा  23-May-2017


भारतीय अवकाश संशोधन संस्था आता लवकरच आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध अवकाश संस्थेबरोबर मिळून इस्रो लवकरच जगातील सर्वात मोठा इमेजिंग उपग्रह तयार करणार आहे. या उपग्रहाला 'निसार' (NISAR) असे नाव देण्यात येणार असून हा जगातील सर्वात महाग उपग्रह असणार आहे.


निसार या प्रकल्पाचे पूर्ण नाव नासा-इस्रो सिंथेटिक अपरचर रडार सॅटेलाइट असे असून याच्या निर्मितीसाठी १ खर्व रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा उपग्रह प्रत्येक आठवड्यात पृथ्वीची एक परिक्रमा पूर्ण करणार आहे. याच्यातील रडार यंत्रामुळे पृथ्वीच्या वातावरणात होत असलेले बद्दल, ध्रुवीय प्रदेशातील बर्फाचे प्रमाण याविषयी अचूक माहिती मिळू शकणार आहे.


निसार हा नासा आणि इस्रो या दोघांचा पहिला सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. निसारमध्ये टू-फ्रिक्वेंसी रडार यंत्रणा असणार आहे. याच्यातील एल-बॉंडची वेव्हलेंग्थ २४ सेंटीमीटर तर एस-बॉंडची वेव्हलेंग्थ १२ सेंटीमीटर असणार आहे. यातील एल-बॉंडची निर्मिती नासाकडून. तर एस-बॉंडची निर्मिती इस्रोकडून करण्यात येत आहे. एका प्रकल्पाचा निर्मिती कालावधी हा तीन वर्षाचा असून २०२१ मध्ये भारतातून इस्रो मार्फत या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.