आयुर्वेदिक रेसिपी- गोधूम पायस
 महा त भा  23-May-2017

 

पौष्टिक खिरी

 

गोधूम पायस (गव्हाची खीर)

 

संदर्भ: निघंटु रत्नाकर

 

"गोधूम पिंडी पायसं" नावाची खासियत तेलंगाना, आंध्र प्रदेश येथे पूर्वीपासून बनवली जाते. ह्यावरून लक्षात येते कि भारत वर्षात आयुर्वेदीय पाकशास्त्राचा प्रसार पुरातन काळात जोरात चालायचा म्हणून आयुर्वेदाच्या छटा विविध प्रदेशांच्या खाद्य प्रकारांमध्ये आजही बघायला मिळतात.

गोधूम म्हणजे "गहू". गव्हाच्या पोळ्यांपासून ते गव्हाच्या खिरीपर्यंत जेवढे प्रकार आहेत ते मुळातच पौष्टिक आहेत. गहू हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं धान्य असल्यामुळे जगभरात आवडीने खाल्ल जातं.

भारतात रोजच्या जेवणात तर ह्याचा वापर असतोच पण खास प्रसंगी म्हणजे सणावारी किंवा घरात पूजा असताना देवाला नैवेद्य म्हणून सुद्धा आपण गव्हाची खीर बनवतो. गव्हाच्या खिरीची साधारण कृती ही तीच आहे मात्र आयुर्वेद "गव्हाच्या खिरीचे" काय फायदे सांगते हे आजच्या सदरात पाहूया.

 

साहित्य :-

 

१/२ कप गव्हाचे पीठ

१ कप दूध

१/२ कप साखर/गूळ

१/४ कप तूप

२ चमचे बदाम

२ चमचे काजू

वाढणी:- ३

 

कृती:-

 

१. एका कढईत तूप गरम करायला ठेवावे. तूप गरम झाले कि बदाम व काजूचे तुकडे त्यामध्ये खरपूस भाजून घ्यावे.

२. त्याच कढईत कणीक घालून तुपावर मध्यम आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजावी.

३. कणीक खमंग भाजली कि त्यामध्ये थोडे-थोडे करून दूध घालावे व दूध घालताना सतत ढवळत राहावे.

४. मिश्रण खिरीसारखे घट्ट होत आले कि लगेच साखर/गूळ घालून विरघळेपर्यंत ढवळावे.

५. तयार खीर "bowl" मध्ये घालून वरून भाजलेले बदाम व काजू घालून सर्व्ह करावी.

 

फलश्रुती (फायदे) :-

 

१.  गुरु व शीत :- अन्य खिरींप्रमाणे गव्हाची खीर सुद्धा थंड व पचायला जड आहे.

२. बलवर्धक :- गव्हाची खीर ही पौष्टिक असल्यामुळे ताकत वाढवते.

३. पित्तघ्न :- थंड असल्यामुळे साहजिकच पित्त कमी करणारी आहे.

४. मेदोवर्धक :- अति प्रमाणात खाल्ल्यास 'मेद' म्हणजे शरीरातली चरबी वाढवते.

५. शुक्रवर्धक :-  गव्हाची खीर कफवर्धक असल्यामुळे शुक्र धातूची वाढ करते.

 

विशेष टिप्पणी :-

खीर करण्यासाठी रवा किंवा दलिया सुद्धा वापरू शकतो. खीर किंचित रवाळ होईल व त्यामुळे वेगळी चव येईल. 

 

- वैद्य विशाखा मोघे