आयुर्वेदिय पाकशास्त्र- द्राक्षादि पानक
 महा त भा  02-May-2017

 

उन्हाळ्यातील सरबते (पानक)

 

द्राक्षादि पानक -  द्राक्षांचे सरबत

संदर्भ: सुश्रुत संहिता


द्राक्षा फलोत्तमा

आयुर्वेदाने द्राक्षांना सर्व फळांमध्ये उत्तम सांगितले आहे. म्हणूनच द्राक्षांना अतिशय पथ्यकर मानले जाते. "द्राक्षा" असें संस्कृत नाव असलेल्या ह्या फळाचे फायदे सांगावे तेवढे कमीच.

द्राक्षांचे आंबट-गोड चवीनुसार दोषांवर होणारे परिणाम बदलतात. आजकाल बाजारात उपलब्ध असलेली द्राक्षे व त्यावरचा जाड पांढरा थर पाहून हे फळ खावे की नको असा प्रश्न पडतो. सुदैवाने काही ठिकाणी कीटकनाशकांची गरजेपेक्षा जास्त फवारणी न केलेली द्राक्षे व अन्य फळे अजूनही उपलब्ध आहेत. अशा फळांचीच कायम निवड करावी.


 

द्राक्षे ही पचायला थोडी जड असून त्यांचे वीर्य हे शीत (coolant) आहे. ह्या गुणांमुळे द्राक्षे वात-पित्त दोषांचे शमन करतात. अपक्व/कच्ची द्राक्षे मात्र उष्ण गुणामुळे पित्त दोषाचे संतुलन बिघडवून रक्त व त्वचेची दुष्टी करतात. पूर्णतः पिकलेली द्राक्षे गोड असल्यामुळे तृष्णा (तहान) भागवतात व शरीरात रक्तस्त्राव (bleeding disorders) होत असल्यास त्याचे नियमन करण्यास मदत करतात.

द्राक्षादि पानकासाठी पक्व द्राक्षेच वापरावी. द्राक्षादि पानकाची ही आगळी-वेगळी रेसिपी वाचून आपणास हे पानक नक्कीच करून बघावेसे वाटेल.

 

साहित्य :-


 

द्राक्षे - २५० ग्रॅम

पिकलेले लहान केळे - १

ओल्या नारळाचे खोबरे - ५-६ लहान तुकडे

गूळ - चवीपुरता

नागकेशर चूर्ण - चिमूटभर

दालचिनी - १ लहान तुकडा

तमालपत्र - १

मिरे - १

वेलची - १

भीमसेनी कापूर चूर्ण - चिमूटभर

 

वाढणी :-

 

कृति :-

१. सर्वप्रथम द्राक्षे स्वच्छ धुवून घ्यावीत.

२. केळे व खोबऱ्याचे लहान तुकडे करून घ्यावेत.

३. मिक्सरच्या भांड्यामध्ये द्राक्षे, केळे व खोबऱ्याचे तुकडे, नागकेशर चूर्ण, दालचिनी, तमालपत्र, मिरे, व वेलची घालून मिश्रण वाटून घ्यावे.

४. वाटलेले फळांचे मिश्रण गाळून पूर्ण द्रव भाग निघेपर्यंत चांगले कुस्करून घ्यावे म्हणजे फळांचा रस हा खालील भांड्यात एकत्र होईल.


 

५. अशा या जल विरहित द्राक्षादि पानकात चिमूटभर कापराची पूड टाकून, चांगले ढवळून ग्लासमध्ये सर्व्ह करावे.

 

 

विशेष टिप्पणी :-

१. द्राक्षं व केळ्याचा नैसर्गिक गोडवा सरबतासाठी पुरेसा आहे. तरी गरज भासल्यास गुळाचा छोटा तुकडा मिश्रण वाटताना टाकू शकतो.

२. कापूर हा अगदी चिमूटभर वापरावा अन्यथा पानक कडू होईल.

 

फलश्रुती (फायदे) :-

१. उन्हाळ्यामधील वाढलेले पित्त व त्यामुळे होणारा सर्वांग दाह पानकाने शांत होतो.

२. या पानकाने तोंडाला चव येते.

३. रक्तपित्तासारख्या रक्तस्राव होणाऱ्या विकारांमध्ये द्राक्षादि पानकामुळे उपशय मिळतो.

४. मद्याची धुंदी उतरवण्यास द्राक्षादि पानक देता येते.

 

द्राक्षादि पानक हे मुलांना इतके आवडेल कि ते कदाचित पूर्ण उन्हाळा तुम्हाला दररोज हे पानक करून द्यायचा हट्टच धरतील. Aerated cold drinks पेक्षा हे पानक करून देणे कधीही श्रेयस्कर होय! मुलांचे व स्वतःचे आरोग्य जपणे हे मुख्यतः स्त्रियांच्या हातात असते म्हणून स्त्रियांनी आपण मुलांना काय-काय खायला-प्यायला घालतो ह्या गोष्टींवर नेहमीच काटेकोरपणे लक्ष द्यावे.

 

अशा प्रकारे उन्हाळ्यातील सरबते हा विषय इथेच संपवून पुढच्या आठवड्यापासून नवीन पाककला प्रकार घेऊन येत आहे.

 -  वैद्य विशाखा मोघे