विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार - भाग १८
 महा त भा  19-May-2017


 

मेधाकाकू: काय अवंती... आजीकडून आंब्याच्या वड्या करायला शिकलीस की नाही अजून... मला सकाळपासून तुमच्या घरातून येणारा आंब्याचा मंद सुगंध जाणवतोय..!! 

 

अवंती: हो मेधाकाकू... अगं आजी किती छान समजाऊन सांगते सगळे आणि किती बारीक लक्ष असते तिचे. प्रत्येक गोष्टीवर. शतकानू शतके एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे येणारी अनुभवसिद्ध बुद्धिसंपदा आहे ही...!!

 

मेधाकाकू: हो... खरे आहे.... माझे लग्न झाल्यावर मी या घरात राहायला आले तेंव्हापासून आजी माझ्यामागे खंबीरपणे उभ्या आहेत..!! अवंती, गेले चार दिवस दिसली नाहीस म्हणून आज मीच अभ्यासाची तयारी करून आल्ये. असे बघ गेली दोन तीन वर्षे शेती आणि शेतकर्‍यांच्या संदर्भात विरोधकांनी वेगळ्याच धोरणाचा वापर सुरू केलाय...!! निव्वळ विरोधासाठी विरोध याच एका उद्देशाने.. सध्याच्या सरकारने शेती आणि शेतकर्‍यासाठी राबवलेल्या प्रत्येक योजनेला हिंसेचा वापर करून विरोध करणे चालू केले आहे... भडक विधाने करून प्रत्येक योजनेबद्दल शेतकर्‍यांना अयोग्य दिशेला नेण्याचे काम विरोधी पक्ष नित्यनेमाने करत आहेत...!! शेतकर्‍यांच्या संदर्भात गेली कित्येक शतके प्रचलित एक वाकप्रचार आता आपण पाहूया...!! तो असा बघ ....              

 

प्रेत झाकून ठेवावे आधी पेरणीस जावे...!!

आपल्या देशातला शेतकरी सहनशील-समजूतदार आहेच, त्याही पुढे जाऊन तो पक्का व्यवहारीसुद्धा आहे...!! थोडे अतिशयोक्तीने का होईना, या वाकप्रचारात त्याचा हा व्यवहारी – धोरणी स्वभाव आपल्या लक्षात येतो...!! वैयक्तिक अडचणींना बाजूला ठेऊन आपला शेतकरी शेतीचे नियोजित काम निसर्गाच्या बदलणार्‍या ऋतुबरोबर जुळवून घेत गेली कित्येक शतके करत आलाय. मात्र ही पारंपरिक शेतीसंदर्भातील बुद्धीसंपदा जतन करण्याचे ऐवजी, विरोधी पक्ष त्यांना संपावर जाण्यासाठी भडकवत आहेत...! हे धोरण राज्याला आणि देशाला आर्थिक संकटाकडे नेऊ शकते...!!

अवंती: अगं मेधाकाकू... गेल्या आठवड्यात तर फारच विचित्र आंदोलने झाली त्यावेळी तूर डाळ आणि कांदे फेकून निषेध व्यक्त केला गेला. स्वत:चे नुकसान करून घ्या हा नवा संदेश का आणि कोण देताय ते समजून घ्यायलाच हवे...!! 

 

मेधाकाकू: अगदी योग्य निरीक्षण आहे तुझे अवंती. आपल्या राज्यात सध्या जे सरकार सत्तेवर आहे त्यांना त्यांच्या एका मित्र पक्षाचा पाठिंबा आहे आणि मंत्रिमंडळात त्यांचे प्रतींनिधी सुद्धा आहेत..!! मात्र त्यांची उफराट्या व्यवहाराची पद्धत कशी आहे बघ.

 

एका ताटी जेवणे आणि घास मोजणे...!!

ही मंडळी सत्तेमध्ये राहूनही, प्रत्येक सरकारी निर्णयाला सतत विरोध करत राहिली आहेत. आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात अशा प्रकारचा व्यवहार नव्याने सुरू झालाय. कुठल्याही नीती अथवा धोरणा शिवाय असे व्यवहार सतत करणे आणि सत्तेतील मुख्य पक्षाने ते सहन करणे... या दोन्ही परिस्थिति सामान्य जनतेची सतत दिशाभूल करण्यापलीकडे काही वेगळे होताना दिसत नाहीये...!!       

एका आधणाने तुरी शिजत नाहीत...!!

अवंती, अगदी याच भाषेत बोलायचे म्हटले तर ही म्हण पांच शब्दात आपला मुद्दा अगदी चपखल मांडते. समाजामध्ये शेतीविषयक प्रगतीचे विचार मांडताना, नवी धोरणे आखताना आणि मुख्य म्हणजे मागील सरकारच्या भ्रष्ट कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढताना, नव्या धोरणांना अमलात आणायला वेळ लागणारच आहे. कुटुंबासाठी दररोज स्वयंपाक करणारी, रोजच्या कुटुंब व्यवहारांची व्यवस्था पाहणारी प्रत्येक घरातली चतूर गृहिणी सुद्धा जाणते.

 

“एका आधणाने तुरी शिजत नाही”....!!            

आखलेली धोरणे, योग्य रीतीने राबवली तर परिस्थिती बदलता येते मात्र त्याला वेळ लागणारच आहे हे सामान्य नागरिक जाणून आहे. परंतु विरोधी पक्षांना, ‘विरोधासाठी विरोध’ याच्या पलीकडे मार्ग सापडताना दिसत नाहीये...!!

अवंती: सही है मेधाकाकू, आजच्या गप्पा मस्त रंगतदार झाल्या की...!! पण हा शेवटचा वाकप्रचार फार गमतीचा दिसतोय मला... काय अर्थ आहे याचा..!!!

 

कणिंग गेली तळा आणि बारीक निरीक दळा...!!   

मेधाकाकू: अवंती, माला सुद्धा हसायला येतंय, हे वाचून...!!...आधीच्या भ्रष्टाचारी सरकारच्या सत्तेतिल व्यवहारांचा वरचाच मुद्दा पुन्हा एकदा..!! घरातली गृहिणी चतूर आहेच पण ज्या घरातला घरधनी बेजबदार असतो त्याची ही गोष्ट असावी. वरच्या ओळीतला शब्द कणिंग म्हणजे दळण्यासाठी जात्यात घातलेले मूठभर धान्य. घरातल्या आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता घरात तेवढेच शिलाक धान्य शिल्लक आहे. जणू काही आपल्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे प्रतीक. अशी परिस्थिती निर्माण करणारे काका व पुतणे मात्र आज मोठ्या रुबाबात, सध्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्यकारभार कसा करावा याचा उपदेश उठता-बसता देत असतात... जसे मूठभर धान्य दळायला बसलेल्या गृहिणीला, ते धान्य कसे दळायचे त्याचा सल्ला देणारा बेजबाबदार घरधनी जणू... !!

 

अवंती: मेधाकाकू, हे सगळं ऐकत्ये मी आणि समजतय मला. यातली रूपके आणि तुलना, फक्त आजच्या परिस्थितीवर टिप्पणी करून थांबत नाहीयेत. ह्या म्हणी दैनंदिन वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक व्यवहारची शिकवणी आहेत...माझ्यासाठी...!!!

 

- अरुण फडके