श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र, लोणावळा
 महा त भा  17-May-2017

 

परउपकारे करीन मी सेवा| दीनदयाळा हाच माझा ठेवा|

श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र नाव ऐकताक्षणीच स्वामींचे, ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठिशी आहे,’असे म्हणत अभय देणारे स्वामी समर्थ डोळ्यांसमोर उभे राहतात. मूर्तिमंत स्वामी समर्थांचा साक्षात्कार देऊन श्रद्धाशील मनाला आध्यात्मिकतेतून मानव सेवेची चिंंतनकृती करायला लावणारे श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र... केंद्राचे स्थान तपोभूमी नांगरगाव-लोणावळा जरी असले तरी आध्यात्मिक, सामाजिक कामाला मात्र भूभागाची सीमा नसते हेच खरं..


तसे पाहायला गेले तर धार्मिक केंद्रे, मंदिर म्हटले की, डोळ्यासमोर भजन, कीर्तन, सामूहिक प्रार्थना, व्रतवैकल्ये, भाविक, पूजापाठ, प्रसाद, भाविकांच्या दर्शनासाठीच्या लागलेल्या लांबच लांब रांगा मनात नसतानाही डोळ्यसमोर उभ्या राहतात. इतके तर जरूर वाटते की, या केंद्रांचा उपयोग त्या त्या संतांना, धर्माला मानणार्‍या भाविकांना. त्याचा इतरांना फायदा काय? पण या सर्व नकारात्मक बाबींना छेद देत श्रद्धा आणि वास्तविक जनकल्याणाचे ध्येय साधत लोणावळ्याला एक धर्म केंद्र उभे राहिले आहे. त्याचे नाव आहे श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र. आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी मानले जाते. ’भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ म्हणत भक्तांना तारणार्‍या अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचे नाव लगेच मुखात येते. स्वामी समर्थांच्या अमृतविचारांवर जीवन जगणार्‍या साधकांची संख्या खरंच अगणित आहे. स्वामींना मानणार्‍या भाविकांनी एकत्र येऊन २००१ साली तपोभूमी, नांगरगाव, लोणावळा येथे ’श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र’ उभारले. स्वामी कृपेने आणि स्वामी इच्छेने केंद्राचे संस्थापक होते सुनील साळवी, संजीव चंदने, अभय वैद्य आणि महादेव टिकम. स्वामी समर्थांचे भक्त हा एकमेव भक्ती आणि शक्तीदुवा या चौघांमध्ये होता. या चार स्वामी भक्तांना अंतःप्रेरणा मिळाली की, धर्म आणि समाज यांना जोडणारा पूल तयार करण्यासाठी आपल्या यथाशक्तीने प्रयत्न करा. त्या प्रेरणेचे मूर्त स्वरूप आहे ’श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र.’

अंतःप्रेरणा जरी असली तरी माणसाचे अनुभव माणसाला कर्म करण्यास प्रेरित करत असतात. त्यामुळे केंद्राचे संस्थापक आणि मानद सचिव असलेले अभय वैद्य यांना विचारले की, ’’अंतःप्रेरणेच्या बरोबरच असे काय होते की, तुम्ही स्वामीभक्तांनी केंद्राची स्थापना केली?’’ यावर त्यांच्याशी बोलताना कळले की, त्यांच्या आईचे माहेर अक्कलकोट. दोन शतकांपूर्वी अक्कलकोट सोलापूर येथे स्वामी समर्थांचा मानवरूपात निवास होता. त्यावेळी अभय यांच्या आईचे आजोबा भवानराव यांनी प्रत्यक्ष स्वामींची सेवा केली होती. अभय यांना स्वामीभक्तीचा असा वारसा लाभलेला. या वारशाला राष्ट्रनिष्ठेचे अनुष्ठान मिळाले ते रा.स्व.संघाच्या संघ शाखेत. पुढे अभय यांनी ११ मारूती, अष्टविनायक, मुंबई ते द्वारका यात्रा पायी केल्या. पायी यात्रांचे बहुतेक कुणाला नावीन्य वाटणार नाही. सुरुवातीला मलाही तसेच वाटले. पण नाही, या यात्रांमधून जे अनुभवले त्याचा खारीचा वाटा म्हणून श्री स्वामीराज जनकल्याण केंद्राचे उपक्रम म्हणावे लागतील. कारण पायी यात्रा करताना अभय आणि त्यांच्या सहकार्‍यांना जाणवले की, व्यक्ती म्हणून प्रत्येकाचे जगणे, वागणे, गरजा वेगळ्या असतील, पण एक भारतीय नागरिक म्हणून सगळ्यांना बांधणारा दुवा एकच आहे तो म्हणजे धर्मश्रद्धा. कोणत्याही रूढी परंपरेच्या पलीकडे माणूस फक्त माणूस असतो. त्याला भूक लागली की भाकरीच हवी असते आणि तहान लागली की पाणीच हवे असते. स्वामी समर्थांचे वचन होते की, ’’अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान.’’ या वचनाचा प्रत्यय अभय यांना या यात्रांमधून येत गेला. यात्रा करताना ठिकठिकाणच्या छोट्यामोठ्या धर्मकेंद्रांच्या भेटी होत होत्या. या सर्व धर्मकेंद्रांना, मठांना, मंदिरांना भेटून अभय आणि सहकार्‍यांना खात्रीच झाली की, धर्म ही जगण्याची प्रेरणा आहे. धर्मश्रद्धा माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते आणि त्यासाठी बांधील करते. समाजबांधवांचे जगणे जर खर्‍या अर्थाने मानवी मूल्यांचे जगणे करायचे असेल, तर धर्मशिक्षणाशिवाय श्रद्धाशील संस्कारांशिवाय पर्याय नाही. त्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे. लोक एकत्र कसे येतील? आवाहन करून? मदतीचा हात पुढे करून? नाही तर भारतीय समाजमन एकत्र होते ते धर्माने, श्रद्धेने. या श्रद्धेचे केंद्र म्हणून श्री स्वामीराज जनकल्याण केंद्राची स्थापना झाली. केंद्र समर्थांनी दिलेल्या श्रद्धशील, परंतु तितक्याच व्यावहारिक विचारांवर काम करते.

परस्परे विश्वासती ते कार्यसिद्धी पावती तेणे अनुभूताती

या न्यायाने केंद्राचे अध्यक्ष भास्कर कशाळीकर, मानद सचिव अभय वैद्य, खजिनदार रोहिदास कोरगांवकर, स्वीकृत मानद सदस्य नागेश करंबेळकर, वसंतराव गोगटे, विश्वस्त सदस्य महादेव टिकम, प्रकाश देशपांडे, राजेंद्र पालव, प्रशांत कुलकर्णी, विष्णू हिरे, प्रमोद गोरे, वंदना टिळक, डॉ.अर्चना कोटलवार, मधुकर पवार केंद्राचे उपक्रम सेवाभावी श्रद्धाशील वृत्तीने राबवतात. लोणावळा हे नाव येताच ‘पिकनिक’ हा शब्द आठवतो. गेल्या काही दशकात लोणावळा परिसराचे सांस्कृतिक मापदंड झपाट्याने बदलले आहेत. त्याचे वाईट परिणाम समाजावर होताना दिसतात. केंद्रातर्फे तिथेे महिला, बालक आणि युवकांचे एकत्रीकरण केले जाते. स्वतःचा आणि परिसराचा विकास करण्याची त्यांना प्रेरणा मिळेल, असे विविध उपक्रम राबविले जातात. केंद्रातर्फे वर्षभर २३ उत्सव आयोजित केले जातात. (वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, त्रिपुरी पौर्णिमा, स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा हे प्रमुख दिवस) या उत्सवात परिसरातील सर्वच गावांना, पाड्यांना सहभागी केले जाते. अन्नदान हा नित्याचा उपक्रम असला तरी उत्सवाच्या प्रसाद दानाला विशेष महत्त्व म्हणून परिसरातले झाडून सगळे लोक एकत्र येतात. सगळ्यांनाच काही ना काही समस्या असतात. या समस्यांवर आशेसारखा दुसरा दिलासा नसतो, प्रार्थनेसारखे बळ नसते. केंद्रातर्फे दररोज सकाळ-संध्याकाळ सामूहिक प्रार्थना होते. दर महिन्याच्या तिसर्‍या रविवारी नामांकित डॉक्टर्सच्या सहकार्याने आरोग्य शिबीर भरवले जाते. त्यात आलेल्या रुग्णांना सर्वप्रकारे मदत केली जाते. केंद्र ज्या स्थानी आहे त्याच्या भोवतालचा परिसर तसा आर्थिकदृष्ट्या मागासच. आपले गाव, पाडा सोडून कधीही बाहेर न गेलेले गावकरी. त्यांना बाहेरच्या जगात खूप काही चांगले आणि सकारात्मक आहे, हे अनुभवाला आणण्याची गरज आहे. कारण गावकर्‍यांच्या मते गावाबाहेरचे जग म्हणजे लोणावळ्याला पिकनिकला मौजमजा करायला आलेले लोक. या पार्श्वभूमीवर, गावातल्या युवा पिढीची मनोभूमिका सकारात्मक व्हावी, देव, देश, धर्म आणि समाजासाठी आपण ऋणी आहोत, हे जाणून घेण्यासाठी केंद्रातर्फे इथे निरनिराळी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. त्यात फक्त धर्म हाच विषय नसतो, तर मानवी जगण्यात आजच्या क्षणाला जे काही महत्त्वाचे आहे, त्याला केंद्रबिंदू मानून मार्गदर्शन शिबिरे ठेवली जातात.


धर्म, संस्कृती, इतिहास, ज्ञान, कला, विज्ञान, वास्तव यावर आधारित व्याख्याने असतात. परिसरातील विद्यार्थ्यांना विनाशुल्क शालेय साहित्याचे वाटपही केंद्र करते. तसेच दरवर्षी गुरुपौर्णिमेला ८० टक्क्यांंच्या पुढे गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही केंद्र करते. हुशार होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधीच्या अडचणी केंद्र सोडवते. असो, आपण पाहतो की, आज वस्त्या-वस्त्यांमध्ये अनेक पंथांच्या सामूहिक प्रार्थना घेतल्या जातात. आपल्या बांधवांना धर्मभावनेने प्रेरित करण्यासाठी केंद्रातर्फेही स्वामींचे सेवेकरी मुंबईत काही ठिकाणी दररोजच्या सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करतात. केंद्रातर्फे मुंबईमध्ये दादरचे विठ्ठल मंदिर, अंधेरीचे राम मंदिर आणि चेंबूर हायस्कूल इथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस अन्नपूर्णा स्तोत्राचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रत्येक सहभागी भाविकास दररोज ओंजळभर तांदूळ देवीच्या मूर्तीसमोर वाहायचे असतात. त्याचप्रमाणे दत्त जयंतीत दत्तांना गहू वाहण्याचा संकल्प केला जातो. या माध्यमातून हजारो किलो तांदूळ- गहू भाविक देवाला वाहतात. केंद्रातर्फे या गहू, तांदुळाचे वाटप वनवासी पाडयांमध्ये, गरजू लोकमध्ये करण्यात येते. दत्तजयंतीला तर भाविक सवाष्णींना आणि ब्राह्मणांना पूजतात, त्यांना यथाशक्ती दान देतात. केंद्रातर्फे भाविकांना आवाहन केले जाते की, जे दान तुम्ही करणार आहात ते गरीब गरजू लोकांना, समाजबांधवांना करा. त्या आवाहनानुसार भाविक अन्न, नवे कपडे, नवी भांडी दान करतात. या वस्तू केंद्रातर्फे समाजासाठी कामकरणार्‍या संस्थांना दिल्या जातात. केंद्रातर्फे चालवला जाणारा हा उपक्रमखरंच आगळावेगळा आणि धर्म समाजाची नाळ पक्की करणारा आहे.


केंद्राचे दुसरे वैशिष्ट्य असे की, माणूस जन्माने नव्हे तर चांगल्या कर्माने ब्राह्मणत्त्व मिळवू शकतो, या विचाराने केंद्रात साधक म्हणून, स्वामींचे पुजारी म्हणून धर्माला प्रमाण मानून स्वामी समर्थांवर श्रद्धा, निष्ठा असलेली व्यक्ती पुजारी होऊ शकतात, नव्हे आहेत. पूर्वापार चालत आलेल्या प्रथा केंद्राने बाजूला सारल्या आहेत. स्त्रियाही केंद्रात येऊन स्वामींची पूजा स्वहस्ते करतात. सेवेकरी म्हणून त्या निवास करू शकतात. यासंबंधी बुद्धधम्माची अनुयायी असलेल्या एका मुंबईकर तरुणीचे मनोगत असे की- ’’स्वामी समर्थांच्या या श्री स्वामीराज जनकल्याण केंद्रामध्ये सेवा करताना मला विशेष शांती मिळाली. श्रद्धेचा अर्थ कळला.’’ श्री स्वामीराज जनकल्याण केंद्राच्या भविष्यातील योजना म्हणजे केंद्राच्या वास्तूमध्ये परिसरातील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण सुरू करायचे. परिसरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे गुरुकुल निर्माण करायचे. त्यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे. परिसरातील महिला श्रद्धाशील आहेत, कष्टाळू आहेत, पण गरिबीमुळे कुटुंबकल्याण साधत नाही. यासाठी महिला-युवा सक्षमीकरणाच्या योजना राबवून महिला आणि युवकांना स्वावलंबी बनवणे. केंद्राचा पाया धार्मिकता आहे आणि कळस श्रद्धाशील समाजकल्याण आहे. श्री स्वामी समर्थ सेवाकार्य हे भक्ती, ज्ञान, आनंद, शांती, नम्रता, विवेक यांनी भरलेले आहे, हे निश्चित. ’लोक मानसी देव पाहतो भेटे तुज श्रीपती’ यानुसार धर्मश्रद्धेने समाजसेवेसाठी कटिबद्ध असलेल्या श्री स्वामीराज जनकल्याण केंद्राच्या भावी योजनांसाठी स्वामी समर्थांचा आशीर्वाद असणारच.

 

केंद्राचे विश्वस्त सदस्य महादेव टिकम हे केंद्रातील सर्व उपक्रमांची जबाबदारी लिलया पेलतात. ते म्हणतात, ’’ही तर स्वामींची इच्छा.’’ देने के लिये अन्न, लेने के लिये हरीनाम, करने के लिये लिनता, डुबाने के लिये अहंकार असे संत कबीर सांगून गेलेत. त्याचा प्रत्यय स्वामी सेवा करताना या केंद्रात जाणवतो.

सेवाकार्याच्या सहकार्यासाठी- 
भक्त सेवा योजना :

ज्या ज्या वस्तू भक्ताला गरजेच्या आहेत त्या दान देणे, अन्नदान योजना, अन्नप्रसाद योजनेत सहभागी होता येईल.

तहहयात अन्नदान योजना :
भक्त केंद्राकडे कायम स्वरूपी रु.१०,००० रक्कमठेव म्हणून ठेवू शकतात. इच्छित दिवशी इच्छित व्यक्तीच्या नावे अन्नदान केले जाईल व दात्याच्या हयातभर हे दान चालू राहील.

बाळ योजना :
बालकाच्या जन्मापासून दरवर्षी १११ रुपये भरून बालकाच्या नावे अन्नदान योजनेत सहभागी होता येईल.

समाजसेवा योजना :
दुर्बल व उपेक्षित घटकांकरिता शैक्षणिक, वैद्यकीय सेवा मोफत पुरविल्या जातात.

लहानपण प्रचंड कष्टात आणि संघर्षात गेलेले, पण अथक मेहनतीतून शून्यातून नशीब घडविणारे केंद्राचे अध्यक्ष स्वामीभक्त भास्कर कशाळीकर म्हणतात, ’’आम्ही निमित्त मात्र आहोत, जे काही होत आहे ते स्वामी कृपेने. श्री स्वामीराज जनकल्याण केंद्र हे धर्माचे आणि जनहिताचे केंद्र बनावे यासाठी अखंड प्रयत्नशील राहायचे आहे.’’

- योगिता साळवी