आयुर्वेदिक रेसिपी- नारिकेल क्षीरिणी
 महा त भा  16-May-2017

 

पौष्टिक खिरीं

 

नारिकेल क्षीरिणी (नारळाची खीर)

संदर्भ : क्षेमकुतूहल

 


 

आपण नेहमीच्या ठरलेल्या खिरी म्हणजेच शेवया, रवा व तांदळाची खीर करून कधीतरी कंटाळतो. भारतीय पाकशास्त्रात अशा कितीतरी रेसिपीज आहेत ज्या काळाच्या ओघात कुठेतरी हरवल्या. माझा प्रयत्न नेहमी हाच असेल की, ह्या व अशा अनेक पाककृती आपल्यासमोर आणाव्या व त्या सर्वांनी घरी बनवून ह्या पदार्थांचा व त्याच्या अनेक फायद्यांचा लाभ घ्यावा.

आयुर्वेदात 'स्वरूप गुण' संकल्पनेनुसार नारिकेल म्हणजे नारळ हा डोक्याच्या कवटीच्या आकाराचा असल्यामुळे "महामेध्य" म्हणजे बुद्धिवर्धक आहे. त्याचा दुसरा महत्वाचा गुण म्हणजे तो "संतर्पक" आहे म्हणजे शरीराची झीज भरून काढून मेदाचे पोषण करतो. 

नारळाचा सर्वात जास्त प्रमाणात वापर हा दक्षिण व पश्चिम भारतात केला जातो. जिथे जे उगते तेच खावे ह्या नियमानुसार असे करणे बरोबरच आहे. कारण असे केल्याने त्या अन्नातून आपल्या शरीरासाठी श्रेयस्कर असे सर्व काही मिळते.

 

साहित्य :-

१ लिटर दूध

१ मध्यम आकाराचा ओला नारळ (खवलेला)

१/३ कप साखर

३ चमचे देशी गाईचे तूप

४ वेलदोडे

६-७ बदाम

४-५ केशराच्या काड्या 

वाढणी :- ४

 

कृती :-

१. सर्वप्रथम एका कढईत १ चमचा तूप गरम करून घ्यावे. त्याबरोबर दुसऱ्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवावे. तुपावर १०-१५ मिनिटे खोबरे किंचित सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे. खोबरे परतताना सारखे ढवळावे जेणेकरून खोबरे कढईला लागणार नाही. 

२. खोबरे चांगले परतले की दुधात घालावे.

 

 त्याचबरोबर बदाम व १-२ केशराच्या काड्या घालाव्या. खीर उकळून घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहावी. पातेल्याच्या बुडाला खीर लागू नये ह्यासाठी मंद आचेवरच खीर शिजवावी. 

३. साधारण अर्ध्या तासानंतर खीर घट्ट व्हायला लागली कि त्यामध्ये राहिलेले तूप, साखर व वेलची कुटून त्याची पूड करून घालावी. चांगली घट्ट झाली कि गॅस बंद करून थोडा वेळ खीर झाकून ठेवावी जेणेकरून वेलचीचा वास उडून जाणार नाही व खीर छान मुरेल.

 

४. थोडीशी गार झाली की, काचेच्या "bowl" मध्ये घालून वरून कापलेले बदाम व केशर घालून सर्व्ह करावी.

  

फलश्रुती (फायदे) :-

 

१. पुष्टिकर- नारळ व दुधाचे मिश्रण हे अतिशय पौष्टिक असल्यामुळे दुबळेपणा असणाऱ्यांना ही खीर नियमित खायला द्यावी.

२. वातनाशक- खिरीच्या गुण-धर्मामुळे ही खीर वातनाशक आहे म्ह्णून वात प्रकृतीच्या व्यक्तींसाठी हितकारक आहे.

३. धातुवर्धक- अन्य खिरींसारखी ही खीर देखील शरीरातील धातूंचे पोषण करून त्यांच्या वाढीस मदत करते.

४. रक्तपित्त- रक्तपित्तासारखा उष्ण विकार असणाऱ्यांनी ह्याचे सेवन जरूर करावे म्हणजे औषधाबरोबर आहार सुद्धा रोगाचा नाश करण्यास मदत करतो.

 

कोणी खाऊ नये किंवा प्रमाणात खावी :-

गुरु, स्निग्ध व शीत असल्यामुळे नारळाची खीर कफवर्धक आहे त्यामुळे कफाचा फार त्रास असणाऱ्यांनी मात्रेत खावी.

 - वैद्य विशाखा मोघे