विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाक्प्रचार
 महा त भा  12-May-2017

 

मेधाकाकू: काय अवंती...काय चाललय सध्या वाचनाच्या ऐवजी...!!...काहीतरी लिखाण चाललेल दिसतय मला...!!...

 

अवंती: अगं मेधाकाकू अगदी बरोबर ओळखलेस. आता चित्रकलेच्या परीक्षा देते आहेच त्या बरोबरच दिप्तीताईने एक आवडीचे काम दिलाय मला ...फक्त या सुट्टीपुरते...!!..अगं ती आर्किटेक्ट आहे आणि मला त्या विषयाची खूप उत्सुकता आहे, म्हणून तिने आपल्या गावातल्या चार जुन्या बंगल्यांच्या गमती-जमती सांगितल्या आणि आता मी त्याचा अभ्यास करते आहे ..... मात्र फक्त फोटो फीचर करत्ये. मेधाकाकू,  त्या एका बंगल्याचे मालक आहेत ना ते आजोबा एकदम कडक आहेत असे वाटले होते मला पहिल्यांदा त्यांना भेटले तेंव्हा, पण थोडा धीर करून मी त्यांच्याशी बोलले आणि मग समजले की ते फार मोठे अधिकारी होते लष्करात आणि त्यांनी बांगला देशच्या स्वातंत्र्य लढ्यात झालेल्या पाकिस्तान विरुद्ध युद्धात भाग घेतला होता...!!.. आणि एकदम बोलता बोलता त्यांनी पटकन एक म्हण सांगितली आणि मी पार हरखून गेले....ऐक ती म्हण....       

कान द्यावा पण कानू देऊ नये.

 

मेधाकाकू: अरेच्या...बघ ...याला म्हणतात योगायोग...तू बंगल्याविषयी अभ्यास करायला गेलीस आणि तिथेही म्हणी तुझ्या मागोमाग आल्या..!..किती मस्त. मग काय अर्थ आहे त्या म्हणीचा, त्या आजोबांनी सांगितलेला...!!!  

 

अवंती: यस...मेधाकाकू...मी काल तिथे गेले तेंव्हा ते पाच-सहा वर्तमानपत्रे घेऊन वाचत बसले होते आणि लेफ्टनंट फयाजच्या हत्येची बातमी वाचत होते आणि ते सुद्धा एके वेळी JAKLI म्हणजे जम्मू अँड काश्मीर लाईट इन्फंट्री या रेजिमेंटचे अॅडजुट्ण्ट म्हणजे प्रशासकीय सहायक होते आणि त्यांना काश्मीर आजही स्मरणात आहे. काय स्पष्ट बोलतात ते आजोबा..आणि अगदी मनापासून अर्थही सांगितला त्यांनी म्हणीचा....!! ते म्हणाले कानू म्हणजे कायदे-कानू या जोड शब्दातला कानू. कानू म्हणजे देशाचा नागरिक म्हणून संविधानाने देशाचा नागरिक म्हणून दिलले आपले हक्क. पण या हक्काच्या आधी नागरिक म्हणून जबाबदारी प्रथम येते आणि कानू त्या नंतरच प्राप्त होतात. राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यात  काहीतरी मतभेद असणारच आहेत, त्यामुळे एखाद्या वरिष्ठ चारित्र्यवान विरोधकाने किंवा अभ्यासू आणि जाणकार पत्रकाराने कधी एखाद्यावेळी कान पिळला तरी हरकत नाही. पण सध्याची परिस्थिती, कान पिळण्याच्या पलीकडे, फारच गंभीर झालेली दिसत्ये. राज्यकर्त्यांना विरोध करताना सतत हिंसाचाराचा वापर आणि भारतीय नागरिक असून राष्ट्राभिमानाचा - राष्ट्रभक्ति भावनेसह आणि सहिष्णुता – धर्माभिमान यासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झालेला विपर्यास हे याचे मूळ कारण आहे. पण आपला हक्क कधीही कोणाच्या स्वाधीन करू नका आणि याच ‘कानूवर’ सध्या सतत हिंसक हल्ले होत आहेत आणि सध्या काश्मिरात असेच काहीसे घडते आहे, असेच ही म्हण आपल्याला सांगत्ये.   

 

मेधाकाकू: तुझा हा अनुभव फार विलक्षण आहे अवंती आणि सामान्य नागरिकाला  अंतर्मुख करणारा आहे.

 

अवंती: अगं मेधाकाकू हे इतकेच नाही पुढे ऐक. आजोबांनी सांगितलेला पुढचा वाकप्रचार फारच गंभीर करणारा होता. त्यांचा जन्म विदर्भातील एका छोट्याशा गावात झाला आणि त्यांना लहान वयातच ऐकलेला तिथला एक प्रचलित वाकप्रचार स्मरणात आहे. तो असा....

  

अंगा वेगळा घाय तुया लागे मला काय.

‘अंगा वेगळा घाय’ म्हणजे दुसर्‍याला झालेली शारीरिक जखम किंवा मानसिक वेदना. दुसर्‍यांना होणार्‍या कुठल्याही त्रासाची दखल न घेणार्‍या, सहानभूती नसलेल्या व्यक्तीचे वर्णन यात केले असावे. आजोबा म्हणाले...काश्मिरातले आपले लष्कर आणि सैनिक यांच्यावर होणारे दगडफेकीचे हल्ले आणि लेफ्टनंट फयाजची क्रूर हत्या आणि यावर व्यक्त होणारी मते आणि प्रतिक्रिया, जणूकाही या  वाकप्रचाराचीचं प्रचिती आहे.

 

मेधाकाकू: अवंती बघ, पुन्हा एकदा आपल्याला अनुभव मिळतोय की हा मराठी म्हणी आणि वाकप्रचारांचा भाषा अलंकार किती कालातीत आहे. आई+वडिलांच्या मायेच्या छत्रातून बाहेर पडून तू जाणीवपूर्वक घेत असलेला हा मोकळ्या जगाचा अनुभव फार विलक्षण आहे आणि तरुण वयातील असे अनुभव सर्वांनाच संपन्न बनवतो. असा अनुभव प्रत्येक तरुण-तरुणींनी घ्यायलाच हवा. या अनुभवी आणि शूर भारतिय सैनिकाशी झालेली तुझी भेट, मला फार भावली...!!- अरुण फडके