जस्टीनच्या गाण्यांवर थिरकणार तरुणाई
 महा त भा  10-May-2017


 

ग्रॅमी अवॉर्ड विजेता आणि जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या भारतातील पहिल्या कॉन्सर्टसाठी आता केवळ एक दिवस बाकी राहिला असून, त्याची सज्जता पूर्ण झाली आहे. १० मे रोजी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर हा कार्यक्रम रंगणार आहे. जस्टीनचे सहकारी यापूर्वीच मुंबईत दाखल झाले असले, तरी तो केव्हा आणि कसा येणार? याचीच आतुरतेने चाहते प्रतीक्षा करीत आहेत.


जस्टीनची गाणी विशेषतः तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. तो पहिल्यांदाच भारतात येऊन लाईव्ह कॉन्सर्ट करणार असल्याचे म्हटल्यावर त्याचे तमाम चाहते सुखावले आहेत. जस्टीनकडे डिजीटल मीडियातील एक सक्सेस स्टोरी म्हणून पाहिले जाते. त्याचा २०१० मध्ये एक अल्बम रिलीज झाला आणि तो रातोरात स्टार झाला. त्याचा भारतातील पहिला कॉन्सर्ट बुधवारी होत आहे. तो आणि त्याचे २५ सहकारी रात्री आठ वाजता स्टेजवर येतील आणि ९० मिनिटांपर्यंत परफॉर्म करतील. या कार्यक्रमात ते ‘पर्पज’ अल्बममधील गाणे व त्यावरील नृत्यही सादर करतील. याशिवाय ‘बेबी’ व ‘बॉयफ्रेंड’ ही प्रसिद्ध गाणीदेखील सादर करणार आहेत. अभिनेता सलमान खान, जॅकलिन फर्नांडीस, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक कलाकार हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, या कॉन्सर्टला हजेरी लावता येणार नसल्याने जळगावमधील कुंदन तळेलेसारखे अनेक ‘बिलिबर’फॅन्स हिरमुसले आहेत. तो व त्याच्या मित्रांनी मार्चपासून प्लान केला होता. तिकीटही मिळवले होते. पण काही कारणांनी कुंदनचे जाणे रहीत झाले आहे.

 

८६ कोटीहून अधिक फॉलोअर्स

बेबी... बेबी... हे गाणे जर कोणी ऐकले असेल, तर त्याला जस्टीन बिबर कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अवघ्या २३ वर्षांच्या जस्टीन बिबरचा जन्म कॅनडात १ मार्च १९९४ रोजी झाला असून, तो तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचीच झलक त्याच्या ट्विटर अकाऊंवर पाहायला मिळते. त्याचे ८६ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. 


भारतीय खाद्यपदार्थांचा चाहता


जस्टीनला भारतीय जेवण खूप आवडते. त्यासाठी खास राजस्थानच्या राजघराण्यांचे आचारी बोलाविण्यात आले आहेत. त्याच्या कॉन्सर्टसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जस्टीन करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्येही सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच तो व त्याचे सहकारी दिल्ली, आग्रा व जयपूरला भेट देतील, असाही अंदाज आहे.