खाद्यभ्रमंती- जीरा – चिकन
 महा MTB  07-Apr-2017


रामराम मंडळी, आज जरा हटके पदार्थ बघूया आणि तो ही सामिष, नॉन-व्हेज

साहित्य

जिरं – चार चमचे

जीरा पावडर – ३ चमचे

धना पावडर – ४ चमचे

गरम मसाला – ४ चमचे

लाल तिखट – १ चमचा

तेल – ४ चमचे

लसूण पाकळ्या – ८ ठेचलेल्या

आलं – एक इंची लांब तुकडा

काळी मिरी – १ चमचा

वेलची – ८


कोथिंबीर – २ चमचे चिरलेली

हिरव्या मिरच्या – ४ उभ्या चिरलेल्या आणि बिया काढलेल्या

दही – ४ एक वाटी घट्ट

बुंदी – ४ चमचे

चिकन – ४ लेग पिसेस

मीठ – स्वादानुसार

साखर – चिमुटभर

पाणी – ४ चमचे

 

पाककृती

१) एक चमचा जिरं आधी जाड बुडाच्या तव्यावर मंद विस्तवावर (ड्राय रोस्ट)भाजून घ्या आणि बाजूला ठेवा.


२) त्याच पातेल्यात आता २ चमचे तेल घालून मंद विस्तवावर गरम झाल्यावर उरलेलं जिरं घालून २ मिनिटे परता. आता त्यात ठेचलेला लसूण, आलं आणि मिरच्या घालून ३ मिनिटे परता, विस्तव मंदच हवा; आता काळी मिरी आणि वेलची घालून ३ मिनिटे परता.


३) आता चिमुटभर साखर आणि अर्धा चमचा मीठ घाला आणि १ मिनिटभर परता आणि आता यात जीरा पावडर, धना पावडर आणि लाल तिखट घालून अजून २-३ मिनिटे मंद विस्तवावर परता.


४) आता चिकनचे रसरशीत तुकडे या मसाल्यात अलगद सोडा आणि सर्वबाजूंनी या मसाल्याचे कोटिंग या तुकड्यांवर व्यवस्थित लागेल असे वरखाली हे तुकडे नीट परतून घ्या. लेग पिसेस मोठे असतील तर अर्धे करून घ्या. आता झाकण लावा आणि साधारण ३० मिनिटे हे चिकन मंद विस्तवावर शिजू द्यायचे आहे.


दहा मिनिटे झाली की झाकण उघडून पाण्याचा हबका पिसेस वर मारा आणि पुन्हा झाकण बंद करून शिजू द्या, आता पाच मिनिटे झाली की पुन्हा एकदा चिकन वरखाली करून घ्या म्हणजे खाली लागणार नाही. आता दोन चमचे तेल, शक्य असल्यास ब्रशने, चिकन पिसेसच्या सर्व बाजूस लावा आणि पुन्हा एकदा झाकण बंद करून चिकन पिसेस पुढील पंधरा मिनिटे शिजू द्या.५) आता ४ चमचे गरम मसाला चिकन पिसेसला सर्वबाजूंनी (कोटिंग) लावायचा आहे. अलगद लावा, घाई नको, नुसता वरून भुरभुरून पसरला तरी चालेल. आणि आता अजून फक्त पाच मिनिटे हे सगळ मस्त शिजू द्या.

६) दह्यात मस्त बुंदी भिजवा, वरून लाल तिखट आणि गरम मसाला पसरा आणि चवीनुसार मीठ घाला...

आता प्लेटिंग करा,
प्लेट मध्ये पसरलेल्या चिकन वर कोथिंबीर मस्त पसरा....

दहीबुंदी डीप म्हणून वापरा आणि चिकन या दहीबुंदी सोबत लावून खा मस्त...

झाली आपली डिश तयार...

चला तर मंडळी,

करून बघुया या रविवारी ही भन्नाट डिश...

भातावर अथवा पोळी सोबत सुद्धा भन्नाट लागेल ही डिश 

- मिलींद वेर्लेकर