सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांची पदोन्नती
 महा MTB  27-Apr-2017

सोलापूर जिल्हा परिषदेचे लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची काल नांदेड जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली. गेल्या दोन वर्षांपासून डोंगरे सोलापूर जिल्हा परिषदेत काम करत होते. डोंगरे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाने परिसरात लोकप्रियता मिळवली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध महत्त्वपूर्ण कामे केल्याने आता त्यांच्या पदोन्नतीवर सोलापूर जिल्ह्यातील नेटकऱ्यांनी एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर दुसरीकडे हळहळही व्यक्त केली आहे.


 अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सोडून सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर स्वच्छता अभियानानिमित्त जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढणे, स्वच्छता गुढी उभारणे अशा कामात त्यांनी पुढाकार घेतला. आयएसओ शाळा, प्रगत शिक्षण अभियान, हवामान बदलासंबंधी कार्यशाळा, वित्त आयोग आणि विकास योजना समजावून सांगण्यासाठी घेतलेली कार्यशाळा अशा अनेक उपक्रमांमुळे डोंगरे कायमच जिल्ह्यातील जनतेच्या चर्चेचा विषय राहिले. सोलापूरातील नागरिकांनी त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यातही असेच उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा नांदेडकरांनीही व्यक्त केली आहे.