शाश्वत शेतीसाठी पाणी देण्यास शासन कटीबद्ध आहे - जलसंपदा मंत्री
 महा MTB  27-Apr-2017

 

राज्य शासनाने शेतकरी हा केंद्र बिंदू मानून राज्याचा अर्थसंकल्प तयार केला आहे. शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीसाठी पाणी देण्यास शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज केले. धोम बलकवडी प्रकल्पातील पाणी पूजन व उजवा कालव्यामधील अंतिम टप्प्यातील कालव्याच्या कामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे होते. अंतिम टप्प्यातील काम हे येत्या ३ ते ४ महिन्यात पूर्ण होईल, असे सांगून जलसंपदा मंत्री पुढे म्हणाले, या कामासाठी निधी पूर्णपणे उपलब्ध झाला आहे. या अंतिम टप्प्यातील कामांवर शासनाचे लक्ष असून हे वेळेत पूर्ण केले जाणार आहे. तसेच राज्यातील इतर अपूर्ण प्रकल्पांसाठीही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

Embeded Object

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पाण्याबरोबरच खतांचाही पुरवठा करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यासाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते. शेतकऱ्यांना ऊसाचे पिक घ्यायचे असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. यामुळे उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता टिकून राहते, असे ते यावेळी म्हणाले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, या भागात काही महिन्यात पाणी येईल. शेतकऱ्यांनी ऊस पीकाच्या मागे न लागता अन्य पिके घ्यावी. ऊस पीक घ्यावयाचे असल्यास ठिबकचा वापर करावा. पाण्याच्या अति वापरामुळे शेती नापीक होत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्या अभावी तुमच्या पुढच्या पिढीला स्थलांतर करु लागू नये.