पुस्तक परिचय- कहाणी एका जिद्दीची...
 महा MTB  25-Apr-2017

 
’इसिस’... केवळ इराक आणि सीरिया नाही, तर अमेरिकेपासून ते रशियासारख्या देशांनाही न जुमानणारी ही इस्लामिक दहशतवादाची पिल्लावळ. ‘इस्लामीकरण,’ ‘जिहाद’ आणि ‘अल्ला’च्या नावाखाली धार्मिक भावनांचा बाजार मांडून ‘इसिस’ने चालविलेल्या या क्रूर खेळाने आजतागायत हजारोंचे प्राण कुर्बान केले. त्यात इतर धर्मियांबरोबर त्यांच्या धर्मांधळ्या भूमिकेविरोधात आवाज उठविणार्‍या मुस्लीम बांधवांचाही समावेश आहेच. धर्मसत्तेचा अहंकार, पैशाची मिजास आणि दहशतीचे काळे बळ वापरून ‘इसिस’ने इराक आणि सीरिया हे देशच्या देश बेचिराखकेले. या देशातील नागरिकांना या क्रौर्यकांडातून जीवावर बेतून पलायन करणे किंवा बगदादीला अल्लाचा ‘खलिफा’ मानून त्याची गुलामी करणे, असे दोनच पर्याय उरले. या दहशतीच्या गर्तेत काहींनी जीवनत्याग करून आपली धर्मनिष्ठा प्राणपणापर्यंत जपली, तर काही जिवंत राहण्याखातर धर्मपरिवर्तन करून ‘इसिस’च्या कृष्णकृत्यांत ‘जन्नत’च्या शोधार्थ भरकटले. ‘इसिस’ने केवळ शहरांचीच राखरांगोळी केली नाही, तर तेथील संस्कृतीवरही कधीही न भरणारे असे खोलवर घाव केले. अशा या ‘इसिस’च्या नरकातून कशीबशी सुटका करणार्‍यांच्या करुणकथा कालांतराने जगासमोर आल्या आणि ही दहशतवादी संघटना आहे की, राक्षसी सौदेबाज; असा प्रश्न पडावा इतक्या या घटना, त्या व्यक्तींवर गुदरलेले प्रसंग भीषण, भयाण आणि मन सुन्न करणारे आहेत.
 
‘इसिस’ने उद्ध्वस्त केलेल्या उत्तर इराकमधील कोचो गावच्या १८ वर्षीय फरीदाची अशीच एक कहाणी ‘द गर्ल हू बिट इसिस’ या पुस्तकातून जगासमोर आली. जर्मन पत्रकार आणि लेखिका ऍन्ड्रिया हॉफमन यांनी ‘इसिस’च्या मगरमिठीतून स्वत:ची आणि तिच्या मैत्रिणींची मोठ्या धैर्याने सुटका करणार्‍या फरीदाची (पुस्तकात मूळ नायिकेचे खरे नाव बदललेले असून इतर पात्रांची नावे मात्र सत्यपरिस्थितीवर आधारित आहेत.) ही चित्तथरारक कथा वाचकांसमोर मांडली आहे. या कथेचा एकूणच साचा आणि गाभा अशा पद्धतीने शब्दबद्ध करण्यात आला आहे की, जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात, कुठल्याही भाषेत जरी हे पुस्तक वाचले तरी त्याचे संदर्भ, ती भावनाविवशता आणि मानवी मनाचा कल्लोळ स्तब्ध केल्याशिवाय राहणार नाही.
 
कथानकाची सुरुवात फरीदाला ‘इसिस’ने ताब्यात घेण्यापूर्वीच्या तिच्या रमणीय आठवणींच्या संपन्न प्रदेशात होते. कोचो या उत्तर इराकमधील यझिदीबहुल भागात फरीदा, तिचे इराकी सैन्यात कार्यरत वडील, उत्तमस्वयंपाकी आई आणि चार भाऊ असा हसताखेळता परिवार. यझिदी म्हणजे अशा धर्माचे अनुयायी जे मुस्लीमनाहीत, ज्यू किंवा ख्रिश्चनही नाहीत आणि इराकच्या उत्तर भागात एका निसर्गसंपन्न प्रदेशात गुण्यागोविंदाने नांदतात. त्यांची भिन्न संस्कृती, भिन्न विचार, पण तरीही कमालीची सहिष्णुता आणि धर्माबद्दल अपरिमित आदर. इराकमध्ये अल्पसंख्य (७० हजार ते पाच लाख लोकसंख्या) असले तरी ‘इसिस’च्या उत्थानापूर्वी बर्‍यापैकी सुरक्षित आणि सुसज्ज जीवनाचे हे यझिदी उपभोगते. फरीदालाही स्वत:च्या यझिदी धर्माचा मोठा अभिमान, पण इतर धर्मियांबद्दल तितकीच प्रेमआणि आपुलकी. गणितात हुशार असलेल्या फरीदाला मोठं होऊन गणिताची शिक्षिका बनण्याचं स्वप्न... त्याचबरोबर स्वयंपाकाची, निसर्गात बागडण्याचीही अतीव आवड. वडिलांनी सुरक्षेच्या कारणास्तव शिकवलेल्या बंदुकीचा नेमही १८ वर्षीय फरीदा अचूक घेते आणि नंतर ‘इसिस’च्या तावडीत असताना त्याचा ती बेधडकपणे यशस्वी प्रयोगही करते. मित्रमैत्रिणींमध्ये रमणारी, भावांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारणारी अशी ही फरीदा तितकीच धार्मिक, सांस्कृतिक परंपरांची पाईक. कुटुंबाबरोबर सूर्याला नित्यनेमाने नमस्कार करण्याची त्यांची प्रथा, त्यांच्या यझिदी देवाची (मेलेक टॉस) महती आणि संस्कारांना संकटसमयीही फरीदा त्याज्य करत नाही. त्यामुळे एकीकडे ‘इसिस’चा धर्मवेडेपणा, तर दुसरीकडे शांततापूर्ण जीवन जगणार्‍या यझिदींची धर्मश्रद्धा पुस्तक वाचताना वेळोवेळी अधोरेखित होते. पुस्तकाच्या पहिल्या भागात फरीदा आणि तिच्या कोचोमधल्या सुखी, समृद्ध जीवनाचे दर्शन सुखावून जाते. मात्र, ‘इसिस’ची काळी सावली सीरियासारखा बहुतांश देश गिळंकृत करत इराककडे कूच करते आणि बघता बघता कुर्दबहुल शहरेही आपल्या कवेत घेऊन इस्लामीकरणाचा हा नंगा नाच सुरू होतो. ‘इस्लाम स्वीकारा, अन्यथा मृत्यूला कवटाळा’ या ‘इसिस’च्या धमकीला न जुमानता फरीदाचे कोचो गाव यझिदी धर्मपालनावर ठामराहते. परिणामी, त्यांना नि:शस्त्र करून, लूटमार करून गावातील पुरुषांना, महिलांना आणि मुलींना वेगळे करून त्यांची फाटाफूट केली जाते आणि सुरू होतो फरीदाच्या आयुष्यातील नरकयातनांचा प्रवास...


 
कुटुंबीयांपासून दुरावल्यानंतर फक्त तिची मैत्रिण इवीन फरीदाबरोबर अखेरच्या क्षणांपर्यंत जीवाभावाची मैत्री निभावते. पुस्तकातील अशा कित्येक प्रसंगांतून फरीदा-इवीनचे अतूट मैत्रीचे शब्द-नि:शब्द करणारे बंध मैत्रीतील ममतेची महती पटवून देतात. खरं तर फरीदा व इतर कोवळ्या वयाच्या यझिदी मुली या ‘इसिस’साठी केवळ उपभोगाचे आणि बाजारात देहविक्रीसाठीचे एक साधन ठरतात. दलालांकडून एखाद्या वस्तूप्रमाणे या निरागस मुलींची एका मालकाकडून दुसर्‍या मालकाकडे विक्री केली जाते. विकणारे आणि विकत घेणारेही शरीरसुखासाठी पिसाटलेले ‘इसिस’चे विकृत सैनिक. एकीकडे धर्माच्या नावाखाली युद्धात गैरमुस्लिमांचे रक्त सांडणारे आणि अत्याचारापूर्वी त्याच अल्लाचे नाव घेऊन अशा कोवळ्या कळ्यांना खुडणारे हे ‘इसिस’चे पाशवी राक्षस आणि त्यांचे रांटी, अमानवी वर्तन वाचताना मनात संतापाची लाट उफाळून येते. ‘इसिस’च्या या धर्मराख्यांकडून शारीरिक, मानसिक आणि भावनिक अत्याचारांनी या यझिदी मुलींचे झालेले असे हे खच्चीकरण फरीदाच्या आखोदेंखी अनुभवांवरून लेखिकेने हुबेहूब चितारले आहे. इराकमधील रक्काच्या देहविक्री बाजारातील फरीदाचा धीटपणा असो वा अत्याचारी मालकाच्या घराच्या खिडकीचे पुर्जे ढिले करून पळ काढण्याचे केलेले कित्येक निष्फळ प्रयत्न, तिची प्रसंगावधानता, गणिती बुद्धी आणि हुशारीची दाद द्यावी तितकी कमीच! अशा बिकट परिस्थितीही धीर न सोडता फरीदा आशेचे किरण सदैव मनी बाळगत सुटकेसाठी जीवावर बेतून सर्वतोपरी प्रयत्न करते. आपली अब्रू वाचविण्यासाठी फरीदाची पिंजर्‍यातल्या पोपटासारखी होणारी तडफड मन विचलित करून जाते, पण हार न मानण्याची जिद्द आणि स्वातंत्र्याची अभिलाषा तिला ध्येयपूर्तीकडे एक एक पाऊल पुढे नेत असते. त्यातच फरीदाला असलेला एपिलेप्सीचा त्रास आणि तिचे काही क्षणांपुरते स्वत:लाही मानसिकदृष्ट्या सावरता न येणे, या गोष्टी तिच्या कशा पथ्यावर पडतात आणि प्रसंगी जीवावरही बेततात, याचे अचूक अनुभवचित्रण लेखिकेने केले आहे.
 
अखेरीस ‘इसिस’च्या मिलिटरी कॅम्पमध्ये सर्व धैर्यानिशी फरीदा तिच्यासह इतर पाचजणींसह पळ काढते. यासाठी फरीदाने केलेले काळ-वेळ-परिस्थितीचे सुयोग्य नियोजन आणि एकूणच त्या यझिदी मुलींचा स्मार्टनेस त्यांना ‘इसिस’च्या तावडीतून सुरक्षित कुर्दांच्या छावणीपर्यंत कसा घेऊन जातो, हा काळजाचा ठोके चुकवणारा जीवन-मरणाचा प्रवास फरीदाच्या धाडसी वृत्तीची साक्ष देतो. फरीदासह तिच्या सोबतच्या इतर यझिदी मुलींच्या स्वभाववैशिष्ट्यातील बारकाव्यांवरही लेखिकेने चपखल भाष्य केले आहे. कोचो व कुर्दांची इतर गावे उद्ध्वस्त असल्यामुळे इराक सरकारने उभ्या केलेल्या छावणीतले अनुभवही तेथील सामाजिक रुढीपरंपरांचा पगडा ठळकपणे अधोरेखित करतात. ‘इसिस’च्या तावडीतून जीव वाचवून आलेल्या, पण अबू्र गमावून बसलेल्या या यझिदी मुलींप्रती समाजाच्या तिरस्कारयुक्त नजराही फरीदा व तिच्या मैत्रिणींना अधिक विचलित करुन जातात. तरीही ‘इसिस’च्या कैदेतून सुखरूप बचावलेल्या आई आणि भावंडांना जिवंत भेटल्याचा आनंद, तर दुसरीकडे आपल्या लाडक्या वडिलांना कायमस्वरूपी गमावलेल्या फरीदाला पुढील शिक्षणासाठी जर्मनीमध्ये जाण्याची संधी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मिळते आणि ती सर्वार्थाने त्या संधीचे सोने करते. कितीही बिकट प्रसंग आले, तरी आयुष्य चालत राहिले पाहिजे, या उक्तीनुसार फरीदा आपल्या मातृभूमीला अखेरचा सलामकरते आणि इराकपेक्षा पूर्णत: भिन्न, मोकळ्या-ढाकळ्या जर्मनीत तिचा पुढचा प्रवास सुरू होतो. अशी ही फरीदाच्या अपार जिद्दीची कहाणी खरंच प्रचंड प्रेरणादायी असून एकूणच कथानकाची मांडणी, शांतीप्रिय यझिदी संस्कृती, मुस्लिमांशी त्यांचे मतभेद आणि ‘इसिस’चे मन पिळवटून टाकणारे अत्याचार पराकोटीच्या संकटातही निकराने लढण्याच्या तीव्र भावनेचा एक आदर्श प्रस्थापित करतात. पुस्तकाची ओघवती आणि तितकीच सोपी इंग्रजी भाषाशैली वाचनाचा अनुभव अधिक खुलवते. हे पुस्तक सर्वार्थाने आपल्याला फरीदाच्या वेदनांच्या खोलात नेऊन सद्गदित करते. या पुस्तकाचे मुखपृष्ठही तितकेच बोलके आहे. हिजाब परिधान केलेली, चेहर्‍यावर हलके स्मित असलेली, अंगावर टीशर्ट आणि खाली जिन्स चढवलेल्या फरीदाचे ते प्रातिनिधिक चित्रण, तिला देश सोडावा लागला असला, तरी यझिदी संस्कृतीशी असलेली तिची एकनिष्ठता प्रतिबिंबित करते.  
 
पुस्तकाचे नाव : द गर्ल हू बिट इसिस
लेखक : फरीदा खलाफ, ऍन्ड्रिया हॉफमन
 प्रकाशन : पेंग्विन रँडमहाऊस
पृष्ठसंख्या : २२४
 
- विजय कुलकर्णी