वेध - सर्वसामान्यांचा रोखठोक अपमानच 
 महा MTB  24-Apr-2017

 
तुम्ही सगळ्या सरकारी सवलती घेणार आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील आनंद मात्र हिरावून घेणार. लोकशाहीत सर्वसामान्यांना थोडा तरी आनंद उपभोगू द्या,’’ शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला, ’’महामार्गालगत ५०० मीटरपर्यंतच्या दुकानात दारूविक्री करू नये.’’ यावर अनेक मतमतांतरे झाली तरी या वर संजय राऊतांचे वरील मत विशेष आहे. संजय राऊतांनी मांडलेल्या मतांना विशेष मानावे का? यावर अनेकांची विशेष मते असू शकतात. असो, हायवेलगतच्या ५०० मीटर्स अंतरावर दारूविक्रीबंदीच्या निर्णयावर ते न्यायाधीशांना म्हणाले, ’’तुम्ही सगळ्या सरकारी सवलती घेणार.’’ हे त्यांचे वाक्य कबूल आहे. दर्जा आणि पदानुसार न्यायाधीशांना सरकारी सवलती मिळतातच पण... पुढे राऊत म्हणतात, ’’सर्वसामान्यांच्या आयुष्यातील आनंद मात्र हिरावून घेणार. लोकशाहीत सर्वसामान्यांना थोडा तरी आनंद उपभोगू द्या.’’ महामार्गालगत ५०० मीटर्सवरच्या दारूविक्रीबंदीवर राऊतांनी हे मत मांडले. हे ऐकून वाटते की, संजय राऊतांच्या मते सर्वसामान्य लोक पक्के तळीरामआहेत. ’एकच प्याला’साठी त्यांनी आयुष्य समर्पित केले आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती एकच प्याल्यात बुडालेली आहे.आपणच महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहोत, आपण सांगू ती महाराष्ट्राची संस्कृती आणि आपण ठरवू ते महाराष्ट्राचे संस्कार(असे का कोण जाणे) मानणार्‍या राजकीय पक्षाचे संजय राऊत प्रतिनिधी आहेत. त्यामुळे संजय राऊतही महाराष्ट्राच्या संस्कृतीशी परिचित असावेत, असे आपल्यालाही का कोण जाणे वाटते. त्यात महामार्गालगत ५०० मीटर्सवरची दारूची दुकाने बंद झाल्यामुळे सर्वसामान्य लोक आनंदाला मुकत आहेत, असे त्यांना वाटले तर कठीण आहे. राऊतांनाही माहिती असेलच की, महाराष्ट्राच्या जनतेने तळीरामसंस्कृतीला कधीही आपले मानले नाही. सांस्कृतिक महाराष्ट्राच्या गोष्टी बाजूला ठेवूया, पण संजय राऊतांना सर्वसामान्यांच्या आनंदाचा शोध दारूच्या दुकानात लागावा हे मोठे सांस्कृतिक दुर्दैव आहे. आनंद, मानसिक सुख याची व्याख्या कोणीही सांगू शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी सर्वसामान्यांच्या आनंदाची व्याख्या दारूत शोधून सर्वसामान्यांचा मात्र रोखठोक अपमानच केला आहे.

 
तळीरामांची तळी उचलायची की...
सटाण्यामध्ये दारूमुळे संसाराची दशा झालेल्या भगिनींनी दारूचे दुकान पेटवले, ही घटना खूप काही सांगून जाते. मुंबईपुरते बोलायचे ठरवले तर दारूमुळे मुंबईच्या वस्त्या विधवाविलाप वस्त्या झाल्या आहेत हे नक्की. वस्तीतल्या १० महिलांपैकी ७ जणींचे पती दारूमुळे वयाच्या चाळीशीतच तिच्यावर मुलाबाळांचा बोजा ठेऊन मरतात. या महिलांचे वास्तव वर्तमान आणि भविष्य एकच असते आणि आहे ते म्हणजे या स्त्रियांना त्यांची चूक नसताना त्यांच्या वाट्याला आलेले दुर्दैवी लाचारीने भरलेले नरकमय आयुष्य. दुसरीकडे महामार्गावर दारूमुळे होणारे अपघात आणि त्यांची संख्या पाहिली तर चिंता वाटते. परिवहन खात्याच्या २०१५ सालच्या अहवालानुसार २०१४ मध्ये रस्त्यावरील अपघातात १ लाख ४६ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच्या तिप्पट लोक जखमी झाले होते. त्यामध्ये असा दावा केला जातो की, ८० टक्के अपघात दारूच्या नशेमुळे होतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील ५०० मीटरलगतच्या दुकानांमध्ये दारूविक्री करण्यास बंदी घातली आहे, हे स्पृहणीयच आहे. पण कायदा वाकवणार्‍यांनी कायद्याच्या चौकटीतच राहून दारू कशी उपलब्ध करता येईल याची तजवीज केलीच असेल, यात शंका नाही. यावर काहींचे म्हणणे असते की, दारूड्यांना कोणी आमंत्रण देत नाही की, दारू प्यायला या. आपल्या मर्जीने लोक दारू पितात. या म्हणण्यात काही तथ्य असले तरीही दारू पिणारे कोण आहेत? ते शत्रूराष्ट्राकडून आलेले शत्रू आहेत का? की ते दारू पिऊन आपले आणि आपल्या संबंधित कुटुंबीयांचे अपरिमित वाटोळे करतात आणि आपण हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहायचे. नाही, ते आपलेच आहेत. त्यामुळे पुढे होऊन दारूबंदीचे स्वागत करायलाच हवे. त्याही पुढे जाऊन दारूबंदीपेक्षाही लोक दारूला स्वतःहून नकार देतील, अशी सुस्थिती निर्माण करायला हवी. तूर्तास दारूबंदीमुळे महसूल घटला, त्यामुळे पेट्रोलचा भाव वाढला, कर वाढला असे लंगडे ढोल पिटून काय हशील आहे? आपले आपणच ठरवूया की तळीरामांची तळी उचलायची की आयाबहिणींचा संसार वाचवायचा.
 
- याेगिता साळवी