वेध- धार्मिक ध्वनिप्रदूषण
 महा MTB  18-Apr-2017
 
 
आठवड्याच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने ‘अजान’साठी वापरल्या जाणार्‍या लाऊडस्पीकर विरोधात ‘राग’ आळवून केली. ट्विटरवर सेक्युलर, लिबरलांची ई-फौज सोनूवर अपेक्षेप्रमाणे तुटूनही पडली. खरं तर सोनूने उपस्थित केलेला मशिदीच्या भोंग्यांचा आणि त्यामुळे उद्भवणार्‍या ध्वनिप्रदूषणाचा विषय सर्वार्थाने योग्य असला तरी असे नाजूक विषय सार्वजनिक व्यासपीठावर चर्चेसाठी आणताना भान हरपूनही चालत नाही. पण सोनूचे नेमके तेच झाले. मुद्दा योग्य असला तरी त्याचे कायदेशीर सूर काही लोकांना गवसले नाहीत आणि सोनूचेही ‘संघीय’, ‘हिंदुत्ववादी’ असे अनाठायी लेबलीकरण करून गळे काढण्यात आले. भोंग्यांविरुद्धच्या या टिवटिवानंतर सोनूने या प्रकाराला चक्क गुंडागिरीच्या गर्दीत बसवल्यामुळे एखाद्या समाजाच्या भावना सहज दुखावल्याही जाऊ शकतात आणि हल्ली त्या खरोखरी दुखावल्या नसल्या तरी ऑनलाईन विरोध, शिवीगाळ, धमक्या, अपमान या माध्यमांतून त्याची झाकी दिसते आणि जाणवतेही. इथेही तसेच झाले.
 
म्हणजे, सोनू निगमने चर्चेत आणलेला मशिदीवरील भोंग्यांचा विषय तसा अजिबात नवीन नाही किंवा त्यावर एवढा आगडोंब उठविण्यासारखेही काही गंभीर नाही. शिवसेनेनेही १९९२-९३ साली अशीच मागणी केली होती. ‘जर पहाटे मशिदीवरील भोंग्यांतून ‘अजान’ चालते, तर आम्हीही मंदिरांत आरत्या करू,’ असा एकूणच तो राजकीय विरोधाचा सूर होता. पुढे २०१४ साली मुंबई उच्च न्यायालयात एका नवी मुंबईच्या रहिवाशाने दाखल केलेल्या यासंबंधीच्या खटल्याचा निकाल देताना न्यायालयानेही अशाप्रकारे कर्णकर्कश धार्मिक प्रार्थनांवर आक्षेप घेत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कुठल्याही प्रकारच्या लाऊडस्पीकर्सवर बंदीही घातली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवावरही ही नियमावली लागू झाली. फक्त शेवटचा एखादा दिवस गरबा काय तो १२ वाजेपर्यंत चालतो. त्याचबरोबर दिवाळीतही मोठ्या आवाजाचे फटाके रात्री १० नंतर फोडल्यास पोलीस आजही अनेक ठिकाणी हटकतात. मग जर सहिष्णू हिंदू आपल्या सण-उत्सवांमध्ये या कायदेशीर नियमांचे पालन करत असतील, तर मशिदीवरील भोंग्यांनाही ते विनासायास करणे अपेक्षित आहे. पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. बर्‍याचदा मशिदींकडे अशा लाऊडस्पीकर्ससाठीचा परवानाही नसतो. पण तरीही धार्मिक भावभावनांच्या बुरख्याआड अजूनही ‘अजान‘चा ‘आवाज’ केला जातोच.
 
 
‘आवाज’ कोणाचा?
 
२०१६ साली प्रसिद्ध झालेल्या केंद्रीय प्रदूषण महामंडळाच्या एका अहवालानुसार, भारतात मुंबई शहरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण हे सर्वाधिक असून दिल्ली, लखनौ, हैदराबाद यांसारख्या शहरांचा त्यामागोमाग जास्त ‘आवाज’ आहे. रस्त्यावरील वाहनांचा आवाज, विमानांच्या उड्डाणावेळीचा आवाज, चालू बांधकामे तसेच औद्योगिक क्षेत्रातील मोठे मशीन्स ध्वनिप्रदूषणात भर घालतात. म्हणूनच औद्योगिक, व्यावसायिक, रहिवाशी आणि सायलन्स झोनसाठी डेसिबलची नियमावली ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० नुसार वेगवेगळी निर्धारित आहे. त्यातही सकाळ आणि रात्रीच्या वेळी हे प्रमाण वेगळे आहे. म्हणजे, औद्योगिक क्षेत्रात सकाळी आणि रात्री आवाजाची मर्यादा ७० डेसिबलपेक्षा अधिक असू नये, व्यावसायिक क्षेत्रात हीच मर्यादा सकाळी ६५ आणि रात्री ५५ डेसिबल इतकी आहे, तर रहिवासी क्षेत्रात ही मर्यादा सकाळी ५५ तर रात्री केवळ ४५ डेसिबल इतकी आहे. रुग्णालये, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था व इतर शांतता क्षेत्र म्हणून घोषित परिसरात १०० मीटरच्या क्षेत्रात आवाजाची मर्यादा ही सकाळी ५० आणि रात्री केवळ ४० डेसिबल इतकी निहीत करण्यात आली आहे. या नियमांचे पालन करण्याची, त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही राज्यांच्या प्रदूषण महामंडळांची आणि स्थानिक प्रशासनाची आहे. परंतु, दुर्देवाने आपल्याकडे हे आवाजाचे मोजमापन होत असले तरी त्यामध्ये घट होताना काही दिसत नाही. राहता राहिला प्रश्न, धार्मिक स्थळांचा आणि भोंग्यांचा, तर मंदिरांवर अशाप्रकारे भोंगे बसवून मोठमोठ्याने आरत्यांचा रतीब घातला जात नाही. गुरुद्वारा, चर्चेसही आवाजाच्या नियमांतच त्यांच्या धार्मिक प्रार्थना, कार्यक्रमपार पाडतात. पण प्रश्न जेव्हा मशिदींवरील भोंग्यांचा येतो, तेव्हा ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने कायद्यान्वये चर्चा न करता, त्याला लगेच धार्मिक रंग देऊन त्याचा बागुलबुवा उभा केला जातो. ‘बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य’ असा संघर्ष रंगवून समाजात धार्मिक तेढ अधिक गहिरी करण्याचे सध्या जोरदार प्रकार सुरू आहेत. त्याच्यात अशा मुद्द्यांमुळे अधिकच भर पडते. तेव्हा, मंदिर असो वा मदरसा, शहरातील प्रत्येकाला जर सुसह्य आणि शांतताप्रिय जीवन जगायचे असेल तर आवाजाच्या मर्यादांवरील या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केल्याशिवाय गत्यंतर नाही; अन्यथा ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक स्वास्थ्याबरोबरच शारीरिक स्वास्थ्यालाही आपण धोक्यात घालू. तेव्हा, ‘आवाज कोणाचा’ असा प्रश्न पडताच, आता उत्तर हे केवळ ‘कायद्याचा’ असेच हवे!
 
- विजय कुलकर्णी