‘द ब्लॅक टायगर’
 महा MTB  13-Apr-2017

 
 
सध्या कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणामुळे भारत-पाक संबंधांमध्ये कमालीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कुलभूषण यांच्यावर पाकने भारताची गुप्तहेर संघटना ‘रॉ’साठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण, यापूर्वीही असे कित्येक संशयित भारतीय गप्तहेर किंवा प्रत्यक्ष पाकच्या तावडीत सापडलेल्या ‘रॉ’च्या गुप्तहेरांना पाकिस्तानचे अनन्वित अत्याचार सोसून तुरुंगातच आपले प्राण गमवावे लागले. त्यापैकीच एक भारताचा सुपुत्र म्हणजे रवींद्र कौशिक ऊर्फ ‘ब्लॅक टायगर’ची ही शौर्यगाथा... 
 
’सर्जिकल स्ट्राईक’च्या वेळी चुकून सीमा पार करत पाक हद्दीत गेलेल्या चंदू चव्हाणचे सुदैव की, त्याला परत मातृभूमीचा चरणस्पर्श लाभला. म्हणा, त्यानेही अशी जीवंत घरवापसीची अपेक्षाच केली नव्हती आणि त्याचे कारणही अगदी साहजिकच आहे. ते म्हणजे, पाकच्या तुरुंगात मरणयातनांपेक्षा भयंकर भोगाव्या लागलेल्या नरकयातना... पण दैवाचा खेळ आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या कणखर भूमिकेमुळे चंदू चव्हाण अवघ्या पाच महिन्यांत मायदेशी परतला. पण असे कित्येक निर्दोष भारतीय नागरिक, मच्छीमार, सैनिक वर्षानुवर्षे पाकचे शारीरिक-मानसिक अत्याचारिक क्रौर्य तोंड दाबून सहन करत आहेत. पाकी तुरुंगात मृत्यूच्या प्रतीक्षेत ते आजही खितपत पडून आहेत. २०१६ साली पाकने भारताला सुपूर्द केलेल्या एका यादीनुसार, एकूण ५१८ भारतीय नागरिक पाकच्या ताब्यात असून त्यापैकी ४६३ हे केवळ मच्छीमार आहेत, ज्यांनी अनावधानाने पाकच्या सागरी सीमेत प्रवेश केला व संशयित भारतीय दहशतवादी/गुप्तहेर म्हणून त्यांना काळगोठरीत डांबले गेले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सरबजीत’ या हिंदी चित्रपटाने पाकच्या तुरुंगात अखेरच्या घटका मोजणार्‍या भारतीयांची व्यथाही सर्वदूर प्रकट केली होती आणि आता कुलभूषण यांना सोडविण्यासाठीही भारत सरकारने कठोर भूमिका घेत सर्वतोपरी प्रयत्नांची हमी दिली आहे. पण, ८०च्या दशकात एका जाबॉंज भारतीय गुप्तहेराला मात्र ‘‘क्या भारत जैसे बडे देश के लिए कुर्बानी देनेवालो कों यही मिलता है,’’ असा प्राणांतिक सवाल करत पाकमध्येच अखेरीस मृत्यूला कवटाळावे लागले. तो वीर योद्धा म्हणजे ‘रॉ’चा ‘ब्लॅक टायगर’ ऊर्फ रवींद्र कौशिक ऊर्फ नबी अहमद शकीर...
 
 नियती तुम्हाला कुठून कुठे घेऊन जाते, याचा काही नेमनाही. हेच राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये ११ एप्रिल, १९५२ साली जन्मलेल्या रवींद्रबाबत म्हणावे लागेल. लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचा, अभ्यासातही अव्वल आणि शरीराने चपळ असलेल्या रवींद्रला अभिनयाची आत्यंतिक आवड. त्यातच अभिनय अधिकच खुलवणारा त्याचा तेजस्वी चेहरा आणि सुडौल शरीरयष्टी. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये सरस ठरलेल्या रवींद्रचा असाच एक नाटकाचा प्रयोग लखनौमध्ये रंगला होता. विषयही अगदी देशभक्तीने ओतप्रेत भरलेला. त्या नाटकात रवींद्र सैन्य अधिकार्‍याची भूमिका रंगभूमीवर साजेशी साकारत होता. ‘’कुठल्याही किमतीत, चीनला आपल्या देशाची माहिती देणार नाही...’’ ही त्याची संवादफेक इतकी परिणामकारक होती की, तिथे उपस्थित भारतीय गुप्तहेर संघटनेच्या (रॉ) अधिकार्‍यांनी रवींद्रमधील एक राष्ट्रप्रेमी, चाणाक्ष, चतुर गुप्तहेर तिथेच हेरला आणि या रंगभूमीवरच्या रवींद्रची मन थक्क करणार्‍या प्रवासाची ती खरी सुरुवात ठरली.
 
   ‘रॉ’च्या अधिकार्‍यांचा गुप्तहेर म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव रवींद्रनेही फारसा विचार न करता देशप्रेमाखातर, मातृभूमीच्या सेवेसाठी स्वीकार केला. बीकॉमपूर्ण झालेल्या रवींद्रला मग दिल्लीत गुप्तहेरांसाठीच्या दोन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागले. कारण, त्याला शत्रूराष्ट्र पाकिस्तानमध्ये लपून गुप्तहेर म्हणून भारतीय सैन्याला महत्त्वपूर्ण ठरेल, अशा संवेदनशील माहितीचा पुरवठा करायचा होता. हे कामआपल्या जीवावरही बेतू शकते, याची पूर्ण कल्पना असूनही रवींद्रने आपले सर्वस्व या प्रशिक्षणासाठी समर्पित केले. दोन वर्षांत तो सफाईदार ऊर्दू शिकला, मुस्लीमधर्मग्रंथाचे त्याने रीतसर अध्ययन केले, पाकिस्तानमधील शहरे, लोकजीवन याची त्याने इत्यंभूत माहिती आत्मसात केली. त्यातच श्रीगंगानगरचा रहिवासी असल्यामुळे पंजाबीवरही रवींद्रचे प्रभुत्व होतेच, जी पंजाबी पाकिस्तानच्या बहुतांश भागात बोलली जाते. पण हे वरवरचे पॅकेजिंग पाकमध्ये गुप्तहेर म्हणून कातडी वाचविण्यासाठी खरं तर पुरेसे नव्हते. कारण, शत्रूला फसवणे, त्याच्या डोळ्यात धुळफेक करणे इतके सहज-सोपे नाही, याची ‘रॉ’च्या अधिकार्‍यांनाही निश्चितच पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे सरडा जसा परिसरानुरूप रंग बदलतो, तसा गुप्तहेरही त्या-त्या देशाच्या रंगात इतका मिसळला पाहिजे की, त्याच्याकडे सहजासहजी संशयाची सुई फिरता कामा नये. म्हणूनच, ऊर्दू ‘जुबान’सह रवींद्रचे ‘जिस्म’ही इस्लाममान्य झाले पाहिजे म्हणून त्याची सुंता करण्यात आली. पाकी हिरव्या रंगात हा छद्मी गुप्तहेर पूर्णत: तयार झाला आणि वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी अबुधाबी, दुबईमार्गे रवींद्रने मोठ्या धीराने पाकचा उंबरठा ओलांडला.

 
  पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्यावर त्याने इस्लामधर्म स्वीकारला. आपली ‘भारतीय’ ही ओळख केवळ मनाच्या एका बंद कुपीत कैद केली. नावही बदलले. रवींद्रचा नबी अहमद शकीर झाला. अमानत, या एका स्थानिक शिंप्याच्या मुलीच्या प्रेमात तो पडला. प्रेमाचे रूपांतर लग्नातही झाले. पुढे पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. कराची विद्यापीठातून ‘कायदा’ या विषयात रवींद्रने पदवी संपादित केली. त्याआधारे पाकिस्तानी सैन्यात सुरुवातीला कारकुनी नोकरी मिळविली आणि नंंतर पाक सैन्याच्या अकाऊंट्‌स खात्यापर्यंत थेट मजल मारली. सर्व काही ठीक होते. पाक सैन्यासंबंधी संवेदनशील माहिती भारतीय लष्करापर्यंत वेळोवेळी पोहोचविण्याची कामगिरी नबी फत्ते करत होता. १९७९ ते १९८३ अशी जवळजवळ पाच वर्षे नबीने पाकी सैन्याच्या हालचाली व सामरिकदृष्ट्या महत्त्वाची ‘जान’कारी (कदाचित जीवावर बेतून मिळवितात अशी ती माहिती!) भारतात अविरतपणे बिनदिक्कत पोहोचविली. त्याच्या या आव्हानात्मक कामात कधीच कुठली चूक झाली नाही की, पाकिस्तानात त्याच्या हालचाली कुणालाही संदिग्ध वाटल्या नाहीत. पाक सैन्यात साधी कारकुनी करणार्‍या नबीची कामगिरी इतकी उल्लेखनीय होती की, मेजरच्या हुद्द्यापर्यंत त्याने बढती मिळविली. कोणालाही कानोकान जरी खबर लागली असती की, पाक सैन्याचा हा मेजर मूळचा भारतीय गुप्तहेर आहे, तर त्याचे क़त्ल-ए-आममुक़र्रर होते. दुर्दैवाने, ती वेळ १९८३ साली आलीच. इनायत मसिहा या ‘रॉ’च्या एजंटला भारतीय सीमेतून पाकमध्ये घुसखोरी करताना पकडण्यात आले आणि तिथेच माशी शिंकली. इनायतला अटकेत घेऊन त्याची कडक चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशीअंती रवींद्र कौशिक ऊर्फ नबीचे भारतीयत्व उघडे पडले. इनायत ‘मसिहा’ नाही, तर नबीची ‘मौत’ ठरला. इनायतकडून मिळालेल्या पुख्ता माहितीच्या आधारे नबीला संपवणे पाकींसाठी अवघ्या काही क्षणांचा खेळ होता. पण त्यांना नबीचा असा क्षणीक अंत मंजूर नव्हता. म्हणून, इनायतचाच वापर करून नबीला भेटण्यासाठी एका पार्कमध्ये बोलविण्यात आले आणि तिथेच भारतासाठी हेरगिरीच्या आरोपाखाली नबीला रंगेहाथ अटक करण्यात आली. म्हणजे, खरं तर भारताच्याच एका अक्षम्य चुकीमुळे रवींद्रचा नाहक बळी गेला. पण म्हणतात ना, गुप्तहेर म्हणून जीवाचा धोका एकदा पत्करल्यानंतर देशासाठी तुम्ही परकीयांच्या भूमीत हेरगिरी करताना जाळ्यात अडकलात, तर तुमचा मायदेशही ‘तो आमच्या देशाचा हेर नव्हेच किंवा आमच्या देशाचा नागरिकच नाही’ असा दावा करून स्वत:ला विभक्त करतात. रवींद्रच्या बाबतीत तसे सुदैवाने झाले नाही. त्याला भारतात आणण्यासाठी राजनैयिक पातळीवर प्रयत्नही झाले, पण ते सर्व असफल ठरले. तत्कालीन गृहमंत्री एस. बी. चव्हाण आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना रवींद्रला भारताचा ‘ब्लॅक टायगर’ संबोधले, पण या सच्च्या ढाण्या वाघाला मायभूमीत आणण्यास मात्र ते असमर्थ ठरले.
 
 रवींद्र कौशिकला आधी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पण पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने १९८५ साली त्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले. सियालकोट, कोट लाखपत, मियानवाली, मुलतान अशा पाकच्या अंधार्‍या कोठडींत रवींद्रने तब्बल १८ वर्षे जीवंत राहूनही मृत्यूचाच धावा केला. कारण, पाकिस्तानच्या तुरुंगांत रवींद्रला अनेक शारीरिक-मानसिक छळांना सामोरे जावे लागले. खरं तर ‘छळ’ या शब्दालाही लाजवेल, इतक्या अमानवी अत्याचारांच्या अमानुष कळा रवींद्रने केवळ आणि केवळ देशप्रेमासाठी सोसल्या. भारतात आपल्या कुटुंबीयांना गुप्तपणे पाठविलेल्या पत्रांतूनही रवींद्रच्या मरणयातनांमागची भावना पाकच्या क्रूरतेची राक्षसी जाणीव करुन देते. अखेर २६ जुलै १९९९ साली पाकच्या मुलतान तुरुंगात अस्थमा, क्षयरोगाने ग्रस्त असलेला रवींद्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावला. त्याचे पार्थिव शरीर भारताला सुपूर्द करण्याचे साधे सौजन्यही पाकने दाखविले नाही. तुरुंगाच्या मागील भागातच त्याचा वेदनांनी मुक्त, बधिर झालेला देह दफन करण्यात आला. त्याची पत्नी व मुलाचीही फारशी माहिती जगासमोर आली नाही. त्याच्या मुलाचा २०१२-१३ साली मृत्यू झाल्याची फक्त नोंद आहे. भारत सरकारने रवींद्रच्या मृत्यूनंतर त्याच्या भारतातील कुटुंबाला आधी पाचशे रुपये आणि नंतर दोन हजार रुपये इतके तुटपुंजे पेन्शन देऊन त्यांची बोळवण केली. त्यातच २००६ साली रवींद्रची आई अमलीदेवी यांचेही निधन झाले. अशा या रवींद्रची ऊर्फ ‘ब्लॅक टायगर’ची शौर्यगाथा भारतीय गुप्तहेर संस्थेत कामकरणार्‍या समस्त अधिकार्‍यांसाठी, गुप्तहेरांसाठी आजही तितकीच प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरते. २०१२ साली सल्मान खानचा प्रसिद्ध झालेला ‘एक था टायगर’ हा सिनेमाही रवींद्र कौशिक यांच्याच जीवनकथेवर आधारित असल्याचा दावा करत, त्यांच्या चुलत भावाने क्रेडिट न दिल्याचेही मीडियाला सांगितले होते.
 
पण या ‘टायगर’ने त्याच्या मृत्यूच्या केवळ तीन दिवस आधी पत्रातून व्यक्त केलेली खंत मात्र भारत सरकारची पाकच्या तावडीतील भारतीय कैद्यांना न सोडविण्याच्या सरकारी हतबलतेवर प्रश्नचिन्ह उपस्िथत करते. मृत्यूच्या छायेत आकंठ बुडालेला रवींद्र त्या शेवटच्या पत्रात उद्वविग्नपणे विचारतो, ‘‘जर मी अमेरिकन असतो, तर तीन दिवसांत माझी सुटका झाली असती ना...’’
 
रवींद्र कौशिकची ही वीरगाथा अजरामर झाली असली तरी कुलभूषण जाधव व त्यांच्यासारखे इतर अनेक पाकमधील कैदी आजही भारत सरकारच्या मदतीकडे आस लावून आहेत की, कदाचित त्यांच्या आयुष्याची पहाट ही मायभूमीत उजाडेल...
 
-विजय कुलकर्णी