अंत्योदयासाठी ‘सबका साथ, सबका विकास’
 महा MTB  12-Apr-2017


 
‘ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्था
 
समाजामध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लागावी हा ‘ध्येयपूर्ती सामाजिक संस्थे’चा प्रमुख उद्देश. त्या अनुषंगाने मग समाजातील तळागाळातील वंचित घटकांपर्यंत देशविकासाचे किरण पोहोचविणे, जातपात, धर्म, प्रांत, लिंग यापलीकडे जाऊन ‘सबका साथ, सबका विकास’ हे प्रत्येक सरकारी योजनांचे स्वरूप असते. पण आर्थिक घोटाळे करणार्‍या झारीतल्या शुक्राचार्यांमुळे त्या योजनांचे स्वरूप लोककल्याणी राहत नाही. त्यामुळे सरकारी योजना जशाच्या तशा लोकांमध्ये पोहोचविणे आणि त्यांचे स्वरूप अंत्योदयी करणे हा ‘ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेचा उद्देश आहे, असे गार्गी रावतेंनी सांगितले.
 
''आमचा विश्वास नाही या सरकारवर, या योजनांवर, कशावरच आम्हाला भरवसा नाही. कधी कधी तर वाटतं, का आम्ही या देशाचे नागरिक आहोत? म्हणून मग आम्हाला कसल्याच फंदात पडायचं नाही...’’  समोरची ती व्यक्ती तळमळून बोलत होती. साधारण २००९ची गोष्ट असावी. बाबासाहेबांच्या समाजाचा आहे म्हणून अभिमान बाळगणारी ती व्यक्ती या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, त्या घटनेद्वारे असलेले लोकशाही सरकार यावर विश्वास नाही, असे सांगत होती. ’मी या व्यक्तीला बहुतेक कडवट अनुभव आले असावेत म्हणून की काय, आपण या देशाचे नागरिक आहोत की नाही, असा प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात उभा राहिला होता. असा प्रश्न का बरं उभा राहिला असेल त्याच्या मनात? ती अत्यंत ‘नाही रे’ गटातली व्यक्ती. सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तरावर कमालीची उपेक्षा अनुभवलेली... ती व्यक्ती आणि संबंधित इतर लोकांना भेटल्यावर मला वाटत राहिले की, असे का व्हावे? देश, देशाला चालविणारे सरकार याबद्दल जर लोकांना असेच वाटत राहिले तर हे अराजकता माजण्याचे प्रमुख कारण होऊ शकेल. देश, सरकार आणि ‘नाही रे’ गटातील गरजू यांना जोडणारा मध्यममार्ग, एक सेतू असायलाच हवा, असे मला सातत्याने वाटू लागले. यातूनच मग केवळ अंत्योदयासाठी मी आणि माझ्या सहकार्‍यांनी ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेची निर्मिती केली.’’ ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेच्या निर्मितीमागचा उद्देश सांगताना अध्यक्ष गार्गी रावतेेंनी वरील अनुभव कथन केला. ‘अंत्योदय’ शब्द एकून अर्थातच मला पंडितजींचा एकात्ममानववाद आठवला. तसे म्हटल्यावर गार्गी म्हणाल्या, ’’हो, अगदी बरोबर, माझ्या संस्थेच्या उद्दिष्टांवर पंडित दीनदयाळ उपाध्यायजींच्या एकात्ममानववादाचा खूप प्रभाव आहे. मला माझ्या देशाबद्दल खूप प्रेमआहे. त्याचे कारण कदाचित माझी वाचनाची आवड असेल. लहानपणीच मी धर्मवीर सावरकरांचे ’माझी जन्मठेप’ वाचले. त्याचा माझ्या मनावर इतका परिणामझाला की, सामान्य घरची मुलगी असूनही मनात त्या ओळी सूर्यबिंदूसारख्या उमलत असतात, ’तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण.’ स्वामी विवेकांनंदांची जीवनगाथा, विचारही मनात कोरले गेले. त्यामुळे धर्माची संकल्पना मला स्पष्ट होत गेली. एकात्ममानववादावर भाष्य करणारे पुस्तक मी वाचले आणि मनात आले की, विकास विकास कोणाचा विकास? समाजाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अत्यंत हीनदीन स्थितीतल्या व्यक्तीपर्यंत जर विकासाचा संदर्भ पोहोचला, तरंच खर्‍या अर्थाने समाजकल्याणाचे यश आहे. या दिवसापासून माझे आणि पर्यायाने ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेचे ध्येय म्हणजे अंत्योदय आहे, तोही ‘सबका साथ, सबका विकास’ या अंतःप्रेरणेतून!’’


 
पुस्तके वाचणे ही चांगल्या समाजमनाची गरज आहे, पण त्याचबरोबर माणसं त्यांच्या संवेदना वाचता यायला हव्यातच. ते वाचन सर्वात महत्त्वाचे. जुनी खेळणी, जुने कपडे घेऊन काही व्यक्ती, संस्था गरजू लोकांना त्याचे वाटप करतात. ’ध्येयपूर्ती’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून १५ ऑक्टोबर, ’वाचक दिन’ रोजी परिसरातील लोकांचा एक स्नेहमेळावा घेतला गेला. तिथे लोकांना आपल्या आपल्या जगण्याबद्दल बोलावे अशी एकच अट. मेळाव्यामध्ये लोक आपल्या आयुष्याबद्दल भरभरून बोलले. मला खात्री आहे, त्यापैकी ९९ टक्के लोक आत्मचरित्र लिहिणारच नाहीत, पण जगासमोर प्रकट व्हायचे त्यांना माध्यममिळाले. ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेचा हा अभिनव उपक्रमखराच वाखाणण्याजोगा होता. कारण आपल्या नजरेत दुसर्‍याचा कणभर असलेला संघर्ष, त्या दुसर्‍या व्यक्तिच्या दृष्टीने मात्र स्वत:चा संघर्ष हिमालयाएवढाच असू शकता. हे लोकांचे वैयक्तिक जगणे, त्या जगण्यातले मुख्य संदर्भ, संघर्ष एकमेकांच्या समोर उलगडले गेले तर कितीतरी गैरसमज, विनाकारण एकमेकांसंबंधी असलेले आकस मिटतील. कुटुंबातली, समाजातली नाती विश्वासावर उभी राहतील.

 
इतक्यात गार्गी म्हणाल्या, ’’आमची संस्था सरकारी योजना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमराबविते. आता आम्ही हा विषय का लावून धरला आहे, याचीही एक कथाच आहे. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी मुलगी शाळेतून घरी आली तीच उदास होऊन. असे का विचारल्यावर ती म्हणाली, तिची मैत्रीण शाळेत आली नाही, कारण शाळेची ङ्गी भरायला तिच्या आईबाबांकडे पैसे नाहीत. मुलीने हा विषय फारच मनाला लावून घेतला होता. दुसर्‍या दिवशी त्या मुलीच्या आईला भेटले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आईचा नाईलाज होता. ओळखीच्या एका ट्रस्टकडून मुलीच्या मैत्रिणीची ङ्गी भरून दिली. त्यानंतर माझ्याकडे अशाच प्रकारच्या अनेक केसेस येऊ लागल्या. चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावर राहणार्‍या महिलांचे माझ्याकडे येणे-जाणे सुरू झाले. अतिशय कणखरपणे जगणार्‍या या स्त्रिया, पण सगळ्यांचा प्रश्न आर्थिक विवंचनेचा. मुलांचा त्यातही मुलींचा शिक्षणाचा खर्च कसा उचलायचा? या महिलांनी मला सांगितले, ’’ताई, एकदा बुद्धविहारात या, आम्ही सगळ्याजणींना जमवतो. तुम्ही समोरासमोर बघाल, ऐकाल तेव्हाच तुम्हाला कळेल.’’ बुद्धविहारात जाण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. आपल्याला महिलांनी इतक्या विश्वासाने बोलावले आहे, तर आपणही अभ्यास करून जावा. त्यासाठी मी समाजासाठीच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक योजना वाचल्या. वाचून अक्षरशः डोळे उघडले. वाटले, अरे समाजासाठी इतक्या योजना असताना या पी. एल. लोखंडे चेंबूरच्या किंवा उपनगरातील समाजबांधवांना या योजनांचा लाभ का मिळाला नाही? मी या योजना नीट समजून घेतल्या, जवळजवळ तोंडपाठच केल्या आणि गेले बुद्धविहारात. तिथे महिलांनी स्थानिक समाजसेवकांनाही बोलावले होते. मी सरकारच्या योजना सांगितल्या, कशा मिळवायच्या हेही सांगितले; इतकेच नव्हे तर संस्था सर्वतोपरी मदत करेल, अशी हमीही दिली. मला माहिती होते, त्या परिसरात ङ्गी भरता येत नाही म्हणून कितीतरी विद्यार्थी घरी बसले होते. मला वाटले, माझ्या बोलण्यानंतर या विद्यार्थ्यांचे पालक समोरून आपल्याला योजना मिळवण्यासंबंधी विचारतील. पण तसे झाले नाही. ज्या महिलांनी मला बोलावले होते, त्यांना विचारले, ’’कुणालाच या सरकारी योजनेची मदत का नको आहे?’’ यावर महिला म्हणाल्या, ’’ते पुरुषमंडळी बायाबापड्यांना गिनत्यात का? ते पैसे थोडीच कोणाच्या हातात येणार आहेत. त्यामुळे सहसा कोणी तयार होत नाही.’’ यावर एकजण म्हणाली होती, ’’मॅडम, इथे समाजसेवक नेतेमंडळी गरिबांना मदत करतात. पण सरकारी योजनेतून मदत मिळवून देत नाहीत त्याला हेच कारण आहे की, मदत डायरेक्ट गरीबाला मिळते, त्यात यांना कमिशन घेता येत नाही. हे नेतेमंडळी या त्या शेटलोकांकडून गरीब मुलाच्या नावाने दान घेतात, त्यातले आपल्याला ठेऊन काही भाग गरीबाला देतात. हा पण एक धंदाच हाय ना? सरकारी योजना का राबवल्या जात नाहीत यासाठी मला चांगलाच धडा मिळाला. त्यामुळे ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्था सरकारी योजना गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी कामाला लागली. पुढे परिसरातल्या महिलांनी गार्गींकडे इच्छा व्यक्त केली, ’’ताई, आम्हाला बचतगट बनवायचा आहे. गार्गी म्हणतात, ’’बचतगट ही संकल्पना मला १९९० पासून माहिती होती. पण त्यातल्या पैशाच्या अफरातफरीच्या कथा फारच ऐकल्यामुळे आम्ही ‘बचतगट’ या संकल्पनेपासून संस्थेला दूरच ठेवले होते. यावर चर्चा सुरू असताना माझे पती विरोचन मला सहज म्हणाले की, ’’संस्थेला लोकांसाठी कामकरायचे आहे, त्यासाठी लोकांची गरज आणि कल ओळखून संस्थेने कामाचे स्वरूप बदलायला हवे. विरोचन स्वतःही महिला आणि बाल कल्याण क्षेत्रात गेली कित्येक वर्षे कामकरीत आहेत. त्यामुळे बचतगट तयार करायचे ठरवले. आमचा ’उत्कर्ष’ नावाचा पहिला बचतगट तयार झाला. पहिला बचतगट सुरू करताना आम्हाला तीन महिने लागले. १० महिलांपैकी कुणाचा फोटोच नाही, तर कुणाकडे वैयक्तिक कागदपत्रच नाहीत. पण पहिला बचतगट बनवताना आम्ही खूप काही शिकलो. त्यामुळेच की काय, आज आमच्या ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेचे २५३ बचतगट आहेत. या बचतगटांना आम्ही अनुदान मिळवून देतो, प्रशिक्षण देतो. आजपर्यंत कुकींग, रिटेल, ऍम्ब्रॉयडरी, फ्लॉवर मेकिंग, फोरव्हिलर ड्रायव्हिंग असे प्रशिक्षण आम्ही बचतगटांना दिले. बचतगटांच्या माध्यमातून संस्थेने चालवलेला सगळ्यात आठवणीत राहणारा उपक्रमम्हणजे बॅड टच, गुड टच प्रशिक्षण. आम्ही ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बचतगटांच्या महिलांना ‘बॅड टच गुड टच’चे प्रशिक्षण कसे द्यावे याचे प्रशिक्षण दिले. या बचतगटांनी परिसरातील शाळांना संपर्क केला. तिथल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर बचतगटाच्या महिलांनी ‘बॅड टच, गुड टच’चे मार्गदर्शन केले. इथे तीन गोष्टी झाल्या. शाळेत जाणार्‍या मुलींना हा विषय माहिती झाला, दुसरे म्हणजे बचतगटाच्या महिला ज्या अनुदान, प्रशिक्षणाच्या परिघात होत्या त्यांना समाजभान आले. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे, पालकांमधल्या ६० टक्के महिलांनी स्वतःहून मनोगत व्यक्त केले की, आमच्या लहाणपणी आमच्यासोबत असे घडले होते. मला वाटायचे की, हा त्रास फक्त मला एकटीलाच झाला असेल, पण अज्ञानामुळे हा फुकटचा त्रास लहानपणी बहुतेकींनी एकदा न एकदा सोसलेला आहे. त्यामुळे काही चूक नसताना आम्ही मानसिक त्रासातून गेलो. पण आमच्या लेकींना या त्रासाचा लवलेशही होऊ देणार नाही. काय अनुभव होता म्हणून सांगू? एक स्त्री म्हणून आपले जगणे सगळ्या स्तरातील स्त्रियांशी समांतर पातळीवर जगतेे, हे त्या दिवशी प्रत्येकीने मान्य केले. गार्गी मनापासून बोलत होत्या.
 
 
असो, विषयांतरासाठी गार्गीला विचारले, ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेचे सध्या कोणते कामसुरू आहे? यावर गार्गी उत्साहात म्हणाल्या, ’’माझ्या एका परिचिताने मला सांगितले की, सरकारने ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट’ नावाची योजना सुरू केली आहे. त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. त्या माध्यमातून या व्यक्तीने ‘स्किल डेव्हलपमेंट’चे कोर्सही सुरू केले. पण थोड्याच अवधीत ते बंद पडले. पुढे भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आणि खर्‍या अर्थाने लोकपुरुष असणारे मोदीजी पंतप्रधान झाले. त्यांनी ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट’ ही नुसती योजनाच न ठेवता त्याचे स्वतंत्र खाते तयार केले. चेंबूरची रहिवाशी म्हणून माझे एक निरीक्षण होते. आमच्या चेंबूर नाका परिसरात लोहार, घिसाडी समाजाची घरे अजूनही पारंपरिक व्यवसाय करतात. त्यांच्या कामात सफाई आणि कौशल्य आहे. त्यांचे कामकितीही चांगले असले तरी सरकारी योजनेतून व्यवसाय वाढीसाठी त्यांना मदत होत नाही, म्हणजे प्रॅक्टिकली त्यांच्याकडे तसे कौशल्य आहे याचा कागदोपत्री सरकारी शिक्षणाचा पुरावा नाही. त्यामुळे त्यांच्या सोन्यासारख्या कौशल्याला फारसा वाव मिळालाच नाही. हे तर फक्त चेंबूरपुरते दृश्य होते. संस्था म्हणून संपूर्ण मुंबईचा आढावा घेताना आम्हाला जाणवले की, मुंबईभर बहुसंख्य लोकांची अवस्था हीच आहे. जर प्रधानामंत्री कौशल्य विकास योजना खर्‍या तळमळीने राबवली, तर कितीतरी हातांना काममिळेल आणि कामाला दाममिळेल. सर्व स्तरावरील समाजासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना पोहोचविणे यासाठी संस्था सध्या कामकरीत आहे. बचतगट, मित्रमंडळ, धार्मिक कल्याणकारी संस्था यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेवर आम्ही मार्गदर्शक शिबिरे आयोजित करतो. नुकतेच मराठी व्यापार मंडळातही या विषयावरचे मार्गदर्शन झाले. समाजासाठी काहीतरी करण्याची ज्यांची इच्छा आहे अशा संस्थांनी पुढे येऊन कौशल्य विकास योजनेचे केंद्र सुरू करावे यासाठीही आम्ही संस्थांना मार्गदर्शन करतो. एखाद्या संस्थेने केंद्र सुरू करायचेच ठरवले तर त्या संस्थेला संपूर्ण मदतही करतो. याबरोबरच संस्था मुद्रा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही कामकरते. मुद्रा योजनेची ‘ङ्गंड टू अनङ्गंडेड पीपल’ ही संकल्पना गरजू, होतकरू अतिलघु उद्योेजकांच्या नजरेतून पाहिले की, मुद्राचा लाभ गरजूंना भेटलाच पाहिजे, असे कुणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही.’’

 
‘ध्येयपूर्ती’ संस्थेचा हा उपक्रमअतिशय काल सुसंगतच म्हणायला हवा. कारण आपला देश आज तरूणांचा देश म्हणून गणला जातो. मात्र बेकारी आणि त्यामुळे येणार्‍या नैराश्यामुळे तरूणाई होरपळली आहे. हातात कौशल्य आहे, पण कागदोपत्री पुरावा नाही, त्यामुळे त्यांना नोकरी किंवा इतर कोणताही लाभ मिळत नाही. नोकरी नोकरी नाही, असे रडत बसण्यापेक्षा, सरकारी योजनेतून आपले आवडते प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरीचा पर्याय उपलब्ध होतो. आर्थिक स्थिरता आली तर तरुणाईमध्ये थोडेसे का होईना, मानसिक स्थैर्य निर्माण होईल. सरकारी योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्याव्यतिरिक्त संस्था आणखी काय करते? यावर हसत गार्गी म्हणाल्या, ’’माझे सासर रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेल्या लोकांचा गड आहे. ते संस्कार माझ्यावरही झालेत. त्यातच राजकीय दृष्टीने नव्हे, तर वैयक्तिकरित्या मला असे वाटते की, भाजप सरकार आल्यानंतर सरकारी योजना या खर्‍या अर्थाने लोकाभिमुख झाल्या आहेत. या योजनांची ५० टक्के जरी कार्यवाही झाली तरी खरं सांगते, करोडो लोकांच्या दैनंदिन जीवनात खरंच सकारात्मक बदल होणार आहे. त्यामुळे ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्था ही सरकार आणि जनता यांच्यामधील सेतू म्हणूनच कामकरणार आहे.’’
 
बॅचलर ऑफ सोशल वर्क, मास्टर ऑफ आर्टस् इन पॉलिटिकल सायन्स, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अशा पदव्या संपादित करून उच्च विद्याविभूषित असलेल्या गार्गी रावतेंच्या ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेची ध्येयप्रेरणा उच्च आणि काळाची गरज असलेली होती. पंडित दीनदयाळ उपाध्यायजींच्या एकात्ममानवतावादाला पंतप्रधान मोदींच्या लोकाभिमुख योजनांमध्ये साकार करू इच्छिणार्‍या गार्गी रावते आणि ’ध्येयपूर्ती’ सामाजिक संस्थेला शुभेच्छा!
 
- योगिता साळवी