बॉलीवूडचा ‘अक्षय’वीर
 महा MTB  11-Apr-2017

 
 
 जम्मू-काश्मीरच्या सीमेवर दहशतवाद्यांशी प्राण पणाला लावून लढणारा सैनिक असो वा छत्तीसगड-झारखंडसारख्या नक्षलग्रस्त भागात माओवाद्यांशी कडवी झुंज देणारे सीआरपीएफचे जवान, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी मदतीवर सर्वस्वी अवलंबून राहावे लागते. काही स्वयंसेवी संस्था मदतीचा हात पुढे करत असल्या तरी खरं तर जवानांच्या हौतात्म्यासमोर ही चलनी मदत कितीही केली तरी तुटपुंजीच! पण देशाचे एक सजग, सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक देशवासीयाला अशी शहीद जवानांना, त्यांच्या कुटुंबीयांना मदत करता यावी, म्हणून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने जानेवारीमध्ये एक अभिनव संकल्पना देशासमोर मांडली. अक्षयच्या मनात अशा एका वेबसाईट आणि ऍपच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते, ज्याच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देशातील नागरिक कुठल्याही लालफितशाहीत न अडकता थेट मदत करू शकतील. अक्षयकुमारच्या या अनोख्या संकल्पनेची गृहमंत्रालयाने तत्काळ आणि गांभीर्याने दखल घेतली आणि ‘भारत के वीर’ या संकेतस्थळ आणि ऍपचे रविवारी गृहमंत्री राजनाथ सिंग व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरणही करण्यात आले. अवघ्या अडीच-तीन महिन्यांत गृहमंत्रालयाच्या या तत्परतेमुळे अक्षयकुमारची ही शहिदांना समर्पित संकल्पना प्रत्यक्षात आकारात आली आणि देशवासीयांना शहिदांच्या कुटुंबीयांना मदतरूपी श्रद्धांजली अर्पित करता येणार आहे.
 
यावेळी बोलताना अक्षयने अभिनेता म्हणून कुठलाही बडेजाव न बाळगता, ‘‘मी आज या कार्यक्रमाला अभिनेता म्हणून नाही, तर सैन्य अधिकार्‍याचा मुलगा म्हणून उपस्थित आहे,’’ असे भावनोद्गार काढले. अक्षयकुमारच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘भारत के वीर’ या संकेतस्थळावर आणि ऍपवर शहीद सैनिकांची, त्यांच्या कुटुंबीयांची माहिती, संपर्क क्रमांक, पत्ता, बँक खाते क्रमांकासह सर्व अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याआधारे आपण सहज शहीद जवानांच्या कुटुंबीयांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवू शकतो. जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंतचा मदतनिधी शहिदांच्या कुटुंबीयांना देता येणार असून, ही देणगी आयकर कायद्यान्वये करमुक्त असणार आहे. तेव्हा, अक्षयने शहिदांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हा राजमार्ग सामान्यांसाठी खुला केला असला तरी तुमच्या-आमच्यासारख्या देशप्रेमाने भारलेल्या प्रत्येकाने जमेल तितकी, झेपेल तितकी मदत या देशसेवेसाठी सर्वस्व गमावलेल्यांना करायलाच हवी. 
 

 
दिलदार ‘खिलाडी’ कुमार
 
माध्यमांमध्ये बरेचदा बॉलीवूड सेलिब्रिटींचे नकारात्मक चित्रण चटकदार मनोरंजनासाठी ‘गॉसिप’च्या गोंडस नावाखाली सर्रास खपवले जाते. ‘कॉन्ट्रोवर्सी’ला चढा टीआरपी, ही माध्यमांतील काही चाणाक्ष चाणक्यांनी ठरविलेली आणि अवलंबलेली ‘पेज-थ्री’ची निवडक बाजारनीति. पण हल्ली हा मीडिया ट्रेंड बर्‍यापैकी बदललेला आणि सामाजिकतेची दखल घेण्याकडेही कललेला दिसतो. सेलिब्रिटी म्हणजे केवळ ‘गर्ल, ग्लॅमर आणि गेम’ याचे आलिशान रसायन नसून त्यापलीकडेही जाऊन सामाजिक जाणीव जोपासणारे काही कलाकारही असतात आणि त्यांची ही दुसरी बाजू समाजासमोर ठेवून त्याचे लोकांनी अनुकरण करावे, आदर्श घ्यावा, ही त्यामागची प्रेरणा. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची शेतकर्‍यांच्या मदतीसाठी गावपातळीवर पोहोचलेली ‘नामफाऊंडेशन’ असो वा आमीर खानची महाराष्ट्रात जलसंधारणाचे कार्य स्पर्धात्मक ऊर्जेतून रुजविणारी ‘पानी फाऊंडेशन’, दोन्ही मोहिमांना कलाकारांच्या एकूणच प्रतिष्ठेचा चांगलाच फायदा झाला व लोकांचाही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘खिलाडी कुमार’ अर्थात अक्षय कुमारनेही आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान राखत शहीद सैनिकांच्या मदतीसाठी अशीच तत्परता दाखविली आहे आणि केंद्रातील सरकारच्या सैनिकांप्रती, त्यांच्या कुटुंबीयांप्रतीच्या आदरभावामुळे ‘भारत के वीर’ खर्‍या अर्थाने एक ‘मॉडेल’ ठरेल, यात शंका नाही. हे ऍप लॉंच होण्यापूर्वीही अक्षयने सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या १२ सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येक ९ लाख याप्रमाणे १.०८ कोटींची मदत केली होती. तेव्हा, केवळ सैनिकांचा प्रश्न नाही तर इतरही अनेक ज्वलंत विषयांवर अक्षय आपली परखड मते वेळोवेळी मांडत असतो. मग तो बंगळुरूमधील महिलेच्या छेडछाडीचे प्रकरण असो वा दिल्लीमध्ये होणार्‍या महिलांवरील अत्याचाराच्या घटना. कारण, आपण जे बोलतो, जसे वागतो, त्याचे आजचे पिढी अनुकरण करते, हे अक्षयला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे त्याची सकाळी लवकर उठण्याची सवय असो वा व्यायामामधील नियमितता, तीही खरेच वाखाणण्याजोगी आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांची कमाई करणारे अक्षयकुमारसारखे काही कलाकार न चुकता आपला आयकरही वेळच्या वेळी सरकारी तिजोरीत जमा करतात. अक्षयनेही २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा २९.५० कोटींचा आयकर जमा करून सामान्य करदात्यांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यातच ‘रुस्तम’ या चित्रपटासाठीही सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुस्काराने खिलाडी कुमारला सन्मानित करण्यात आले आहे. तेव्हा, या खिलाडीच्या दिलदारपणा आणि राष्ट्रप्रेमाला सलाम!
 
 
-विजय कुलकर्णी