खाद्यभ्रमंती- फरसबी-मेथी-पनीर मसाला
 महा MTB  09-Mar-2017


नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो....


का कुणास ठाऊक... बऱ्याच जणांना फरसबी ही जबऱ्या बहुगुणी भाजी विशेष आवडत नाही... कदाचित या भाजीला स्वतःची चव नसल्याने असेल पण आवडत नाही हे नक्की... पण मला मात्र ही भाजी प्रचंड आवडते...

याचं सोप्प कारण म्हणजे या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स आहेत आणि ही भाजी खालील गोष्टींनी भरलेली आहे.

ही सगळी व्हीटामीन्स तुम्हाला इतक्या प्रचंड प्रमाणावर मिळवायची असतील तर ही भाजी मी सांगतो त्या पद्धतीने करा आणि बघा घरचे सगळे ही भाजी अशीच करा आणि वारंवार करा असं सांगतात का नाही ते मैत्रांनो...

चला तर मग सुरुवात करूया.... एका जबऱ्या डिशच्या प्रीपेरेशनला...

एक नम्र सुचना – मी केलेल्या कुठल्याच डिशेस कृपया शक्यतो डब्यात घेऊन जाऊ नका कारण डब्यात या छानच लागतील नक्कीच नो डाऊट पण या भाज्या तुम्हां सर्वांसाठी मी फार वेगळ्या पद्धतीने डीझाइन केल्या आहेत आणि त्यामुळे या भाज्यांची गम्मत ही गरमागरम डिश डायनिंग टेबलावर संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून धम्माल करत माझ्या या सगळ्याच डिशेसचा आनंद घेण्यात आहे.

साहित्य - 

पाव किलो फरसबी - (फरसबी विकत घेताना शक्यतो ५ इंचापेक्षा कमी लांबीची छान ताजी, कोवळी आणि शक्यतो घट्ट आणि चकचकीत फरसबी निवडावी, भाजीवाला ओळखीचा असेल तर (एखाद्याच फरसबीचे) टोक मोडून पाहावे, एका झटक्यात कटकन मोडणारी फरसबी उत्तम... चिवटपणे मोडता मोडली नाही तर ढुंकून ही अजिबात पाहू नका)

टोमॅटो - ४ ताजे लालबुंद रसरशीत – चांगल्या मोठ्या आकाराच्या फोडी, बारीक अजिबात नको, मोठ्या फोडी छान दिसतात  (धारदार सुरीने तुकडे करून घ्या...रस गळता कामा नये, भाजीत रस गळला तर भाजीत पाणी जास्त होवून भाजीचे फर्म स्ट्रक्चर बिघडू शकते) 


धने पूड – दोन चमचे – ताजी करून घ्या शक्य असल्यास...भन्नाट चव येते भाजीला

जिरे पूड - दोन चमचे - ताजी करून घ्या शक्य असल्यास...भन्नाट चव येते भाजीला

तूप  - २ चमचे (फार विचार करू नका, मी गाईचे साजूक तूप वापरतो , बिनधास्त वापरा , झाला तर फायदाच होईल आणि सोबतच अप्रतिम चव येईल डिशला)

कांदे - ४ मध्यम आकाराचे , मोठ्या फोडी केल्यात तरी चालतील, मिक्सर मध्ये पेस्ट करायची आहे   

हळद - पाव चमचा 

लाल तिखट - १ चमचा (उत्तर भारतात फरसबी जास्त होत असल्याने जर छान लाल रंगाचे देगीतिखट वापरू शकलात तर डिशलाबहार येईल)

कोथिंबीर - ६ मोठे चमचे निवडून बारीक चिरलेली 

मेथी – १ जुडी बारीक चिरून घ्या (छोट्या पानांची मेथी मिळाली तर बेस्ट, अगदीच नाही तर ५ चमचे कसुरी मेथी वापरा बिनधास्त, छान लागते, फक्त डिश मध्ये टाकताना बऱ्यापैकी शेवटी टाकायची ही म्हणजे करकरीत छान लागते)

मीठ - चवीनुसार (साधारण दोन चमचे)

हिंग - चिमुटभर (रेडीमेड हिंग आणण्यापेक्षा खडा हिंग आणा... भन्नाट  स्वाद आणतो हा हिंग प्रत्येक पदार्थाला)

साखर – चिमुटभर

पांढरे तीळ – २ चमचे

लसूण – सहा मध्यम पाकळ्या ठेचलेल्या  

लिंबू रस – चार चमचे

आणि..... तुमच्या पूर्ण कुटुंबाची अपॉईंटमेंट...
कारण ही डिश सगळ्या जणांनी एकत्र आस्वादणे म्हणजे भन्नाट आनंद आहे.... believe me...

पाककृती - 


१) बाजारातून आणलेली छान कोवळी छोटेखानी फरसबी मस्त स्वच्छ धुवून घ्या आणि साध्या पाण्याने भरलेल्या कुंड्यात ५ एक मिनिटे बुडवून ठेवा.

२) ५ मिनिटानंतर बाहेर काढून एखाद्या चाळणी मध्ये ठेऊन द्या.

३) फरसबीचे देठ धारदार सुरीने कापून टाका आणि शक्य असेल तर बाजूला असणारा धागा काढून टाका. फरसबी वापरताना मी अख्या शेंगा वापरल्या होत्या, दिसायला छान वेगळ्या दिसतात आणि व्यवस्थित शिजतात काळजी नको. तुम्हाला अख्या शेंगा आवडत नसतील तर अर्ध्या करा, नो इशुज

४) आता एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा आणि उकळायला लागल्यावर त्यात या फरसबीच्या शेंगा साधारण ५-७  मिनिटे पर्यंत उकळू द्या (ब्लांच) , जास्त नको, फक्त पाच-सात मिनिटे, शक्यतो वर झाकण ठेवा , थोडी वाफ बाहेर पडू द्या, आणि पाच मिनिटे झाली आणि शेंगा हात लावून पाहिल्यावर शिजलेल्या वाटल्या म्हणजेच नरम झाल्या की लगेच या शेंगा परत चाळणीत लगेच काढून घ्या, ओव्हर कुक होऊ देऊ नका शक्यतो कारण छान कोवळा हिरवा रंग कमी होतो बाकी काही नाही.


५) मिक्सरच्या मोठ्या भांड्यात कांदा, धने-जिरे पूड, मीठ, तिखट, हळद, लसूण, पांढरे तीळ, किंचित साखर आणि अर्धा ग्लास पाणी घालून ४०/५० सेकंद फिरवून घ्या, याची आपल्याला जाडसर पेस्ट करायची आहे सो पाणी अंदाजाने घ्या, जास्त पातळ पेस्ट नको आहे, जाडसर पेस्ट छान लागेल.


६) जाड बुडाच्या भांड्यात २ चमचे तूप घ्या आणि ते साधारण तापल्यावर त्यात आधी चिमुटभर साखर घाला (हे केल्याने ग्रेव्हीला छान तिखटसर तर्रीदार रंग येतो मात्र फार तिखट होतही नाही डिश) आणि किंचित परता आणि आता लगेच चिमुटभर हिंग टाकून किंचित परतल्या सारखं करून मिक्सरमध्ये जाडसर वाटलेली पेस्ट यावर रिती करा आणि साधारण पाच मिनिटेपर्यंत मंद विस्तवावर परता.
आळस नको, परतत रहा.

(आता इथून पुढे ज्या क्रमाने पदार्थ दिले आहेत त्याच क्रमाने टाकत रहा आणि मध्ये मध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे परत परतत राहा...
घाई होते आहे म्हणून सगळ एकत्र सरकवून एकदम परतू नका...
अपेक्षित स्वाद आणि लज्जत यायची असेल तर पेशंस हवाच हवा, काय म्हणता?)

५) अग्नी कमीच ठेवा..... आता इथे या परतल्या जाणाऱ्या मिश्रणाला खमंग वास यायला सुरुवात होईल आणि मस्त अंगचे पाणी सुटायला सुरुवात होईल.... आता थोडे नीट लक्ष द्या रे..

६) आता मोठाले चिरलेले टोमॅटो या मिश्रणात घाला आणि २ मिनिटे परता... आता मेथी आणि कोथिंबीर सरकवा आणि चांगली ३-४ मिनिटे परता.... आता मगाशी ब्लांच करून ठेवलेली फरसबी या पातेल्यात घाला.... अग्नी मंदच आहे.... २ मिनिटेचं खालीवर करून छान परता..... आणि आता पाण्यात हात ओला करून या पाण्याचा हबका पातेल्यातल्या भाजीवर एक दोन वेळा मारा... (हबका म्हणजे पाण्यात हात बुडवल्यानंतर जेव्हढे पाणी हाताला लागून वर येईल तितकेच पाणी भाजीवर शिंपडा... असे दोन वेळा करा...भाजी छान चकचकीत होईल...सर्व्ह केल्यावर मस्त दिसेल... हबका एकाच ठिकाणी मारू नका... सगळ्या भाजीवर एकसारखे पाणी पसरले जाईल असे मारा).

आता या भांड्यावर झाकण न ठेवता तब्बल ४ मिनिटे काहीही न करता शांत राहा.

(एक ग्लास मस्त पाणी पिवून घ्या... मगा पासून पाणी प्यालं नाहीये... अधून मधून पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असते.)


आता घरातल्या सगळ्या मंडळींना सांगून या की पुढील पाच मिनिटांत जेवण सर्व्ह होणार आहे...

आता सगळ्यात शेवटी भाजीत पनीरचे आधीच करुन ठेवलेले चौकोनी तुकडे जागोजागी पेरा आणि भाजीतला मसाला या पनीरला व्यवस्थित चहूबाजूंनी घेरेल अशी भाजी वरखाली परतून घ्या.

३-४ मिनिटांनी आता भाजी एकदा परत परता... आणि आता लिंबाचा रस मस्त वर पसरून टाका आणि पुन्हा एकदा परता....

आता या भाजीचा गंध घरात पसरला आहे, घरच्यांना आता फार काळ थोपवणे शक्य नाही आता तुम्हाला..

७) आता ही तयार झालेली भाजी या पातेल्यातून दुसऱ्या एखाद्या सर्व्हिंग बाउल मध्ये त्वरीत काढून घ्या... 


पाणी घ्या...
सगळ्यांना घोटभर पाणी पिवून घ्याला सांगा...
आपल्या शास्त्रांमध्ये आचमनाला महत्व आहे....
सगळ्यांची ताटे घ्या...
आवडतं असेल तर सोबत लोणचं आणि पापड घ्या...

 

सगळ्यांना टेबलावर बोलवा...
मस्त प्लेटिंग मध्ये लोणचे, पापड घ्या...

आणि हात जोडून डोळे मिटून भोजन मंत्र म्हणून शांत चित्ताने , सुहास्य वदनाने भोजनाला सुरुवात करा....

भात आवडत असल्यास वाफाळलेल्या भातावर ही भाजी वरून पसरा... आणि विशेष न कालवता कोरड्या भातासोबत खावून बघा..... जबऱ्या लागते

 

एक विनंती... ही भाजी डब्यात घेवून जावू नका... गरमागरमच छान लागते...
आणि टीव्ही पाहात पाहात ही भाजी खावू नका...
एक घास घेतल्यावर जो काही स्वाद ही भाजी तोंडामध्ये तयार करते त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर टीव्ही बंद करा...आणि आता सावकाश जेवा......

वेडे व्हा.. वेडे करा

 

खुप खा... खूप जगा   

 

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा... आरोग्यदायी रहा.. खूष व्हा... मस्त जगा

 

- मिलिंद वेर्लेकर