हे राम...! बुरे तेरे काम...
 महा MTB  08-Mar-2017


 

रामायणातील मर्यादापुरुषोत्तमश्रीरामहा अखंड पौरुषत्वाचा परमोच्च बिंदू मानला जात असला तरी कलियुगातील या बॉलीवूडच्या रामूमुळे मात्र खरंच ‘हे राम...!’ असेच चिंताजनक उद्गार निघावेत. हे ‘राम’ म्हणजे बॉलीवूड चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते रामगोपाल वर्मा. ‘सत्या’, ‘सरकार’, ‘जंगल’, ‘कंपनी’, ‘एक हसिना थी’ असे यांचे काही गाजलेले मोजके सिनेमे, तर ‘शोले’चा रिमेक करताना पोळून काढणारी ‘आग’ही याच रामूची! त्याचे सिनेमे कसेही असोत, चालो, पळो अथवा पडो, त्याचे इथे फार कुणाला काही देणेघेणे नाही, पण जेव्हा रामूची हीच सडकी वृत्ती ट्विटरवरच्या १४० शब्दांतून वाह्यात शेरेबाजी करते तेव्हा मात्र या रामाला रावणाची उपमा दिली तरी कमीच, असेच नाईलाजाने म्हणावे लागेल.

Embeded Object

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, असेच एक खोचक, तिरकस, अभद्र ट्विट रामूने केले. या ट्विटमध्ये रामू बेशरमपणे म्हणतो, ‘‘सनी लिओनप्रमाणे जगातील प्रत्येक महिलेने पुरुषांना आनंद द्यावा.’’ रामूच्या या असभ्य ट्विटनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल! रामूची चांगलीच झाडाझडती ट्विटरवर घेण्यात आली. कारण, महिला दिनाच्या निमित्ताने किमान एक दिवस तरी तुम्हाला महिलांचा सन्मान करता येत नसेल (एरवी अशांकडून अपेक्षाच नाही म्हणा!) तर अशा निर्लज्ज टिपण्ण्या करून अपमान, अवमानाचा एवढा सोस तो का? त्यातही ‘सनी लिओन देते तो आनंद’ असे म्हणून तिचा अनावश्यक उद्धार कशासाठी? ती भूतकाळात पॉर्न स्टार असली तरी तीही एक महिला आहे आणि आज बॉलीवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून तिने नाव, इज्जत, शौहरत कमावली आहे. त्यामुळे ‘सॉफ्ट टार्गेट’सारखा सनीचा वापर करून महिलांना केवळ शारीरिक सुखासाठी एक उपभोग्य वस्तूंमध्ये तोलण्याचा रामगोपाल वर्मा तुम्हाला अधिकार दिलाच कोणी? तुमच्यासारख्या भावनाशून्य नरांना केवळ आणि केवळ महिलांकडून अशा भौतिक, शरीर अपेक्षा असतील. कारण रामू, तुम्हाला प्रेमकरण्यासाठीचे काळीजच नसावे कदाचित आणि असलेच तरी त्यावर वासनांधतेची जळमटं साचून फक्त शारीरिक उपभोगाची लाळ टपकत असावी. भावभावनांचे काडीमात्र भान नाही की सामाजिक बांधिलकीसाठी ‘सिनेमा’ या व्यापक माध्यमाचा वापर करण्याचे लोकसंस्कारही नाहीत. त्यामुळे स्वत:चे असे दूषित, कलुषित विचार जगजाहीर करून अजून किती छी! थू! करून घेणार हा राम?

सोशल मीडिया आणि खासकरून ट्विटरचा असा कुप्रसिद्धीसाठी वापर करून घेण्यात हे सेलिब्रिटी लोक तसे अगदी तरबेज. त्यांची पुस्तकं, सिनेमा प्रकाशित-प्रदर्शित होण्यापूर्वी असंच काहीतरी अनावश्यक, निरर्थक बरळायचं आणि फुकटच्या प्रसिद्धीचं सोनं लुटायचं, ही त्यांची ट्रेंडिंग खोड. हा रामूही त्याच गोटातला धोंडा. आज जरी सनी लिओनच्याच नावाचा असा वापर करून असे आपत्तीजनक ट्विट त्याने केले असले तरी उद्या सिनेमे चालत नाहीत, म्हणून तिच्या घरचे उंबरठे झिजवून लाळघोटेपणा करायलाही तो कमी करणार नाही. पण रामूचे म्हटल्याप्रमाणे हे ‘फर्स्ट टाईम’ नाही बरं का... यापूर्वीही रामूने असेच ट्विटरवर दिवे लावून स्वत:ची नाचक्की करून घेतली आहेच बरेचदा.
असाच एकदा ट्विटरवर रामूने एका महिला पत्रकाराचा अमानवीय अपमान केला होता. त्याच्या ‘वीरप्पन’ या सिनेमाची नकारार्थी समीक्षा प्रसिद्ध केली म्हणून, त्या महिला पत्रकाराचा फोटो बेशरमपणे ट्विट करून त्याखाली, ‘‘तुझ्या चित्रपट समीक्षेनुसार, ‘वीरप्पन’ हा चित्रपट तुझ्या चेहर्‍याइतकाच सुंदर आहे,’’ अशी भोचक प्रतिक्रिया देऊन नंतर माफी मागण्यासही नकार दिला होता. म्हणजे, नकार पचवायची मुळात मानसिकताच नाही आणि उलट महिला पत्रकाराचे असे हे सार्वजनिक खच्चीकरण. रामूला कसं हे सगळं अगदी चित्रपटातल्या पटकथेसारखं वाटतं की, तो ‘ऍक्शन’ म्हणाला आणि पात्रांचा त्याच्या दिग्दर्शनानुसार अभिनय सुरू. पण रामूबाबा, ही ‘रिअल’ लाईफ आहे आणि तुमची ‘रिल’ लाईफ नाही, हे विसरू नका.

पत्रकार, इतर अभिनेता-अभिनेत्री सोडाच, या रामूने तर एरवी बॉलीवूडचे आराध्य दैवत असलेल्या ६४ कलांचा अधिपती श्रीगणेशाच्या देवत्वावरच शंका उपस्थित करण्याचे राक्षसी धाडस केले होते. गणेश चतुर्थीनिमित्त केलेल्या एका ट्विटमध्ये रामूने अक्कल पाजळली होती की, ‘‘जो मुलगा आपले स्वत:चे शीर वाचवू शकला नाही (गणपती), तो काय इतरांची डोकी वाचवणार?’’ एखाद्या बिनडोक, अज्ञानी आणि अविचारी माणसाकडूनच या असल्या अनाठायी शंका विचारल्या जात असतील, तर त्यांच्या चित्रपटांकडून अजून अपेक्षा ती काय बरं करायची प्रेक्षकांनी? त्यामुळे रामूसारखे पिसाट दिग्दर्शक असोत वा कायमच जीभ सैल सोडलेल्या शोभाबाई, यांना समाजाने अद्दल घडविण्याचा मार्ग म्हणजे यांच्या साहित्यावर, सिनेमावर सरसकट बहिष्कार टाकणे. त्यानेही म्हणा यांना फारसा फरक पडणार नसला तरी, अशा बुद्धिभ्रमझालेल्यांचे कुठल्याही कला-साहित्यकृतींचे दर्शनही नको आणि त्यांचे खिसे भरणेही नको!

- विजय कुलकर्णी