मसाला मशरूम विथ कोकोनट ग्रेव्ही
 महा MTB  30-Mar-2017

 

माझ्या एका ‘दूरच्या’ मैत्रिणीने परवा मला फोन केला. भलतीच प्रेमात होती, ”काय फोटो काढतोस, काय डिशेस करतोस, भारीच आहे राव.”

“प्रयत्न करतो गं, काहीतरी नवनवीन करून स्वतःला तरतरीत ठेवायचा.” शक्यतोवर नम्रपणे उत्तर द्यायचा मी प्रयत्न करत होतो.

“तुला सांगू का मिलिंद, तुझ्या ब्लॉग पहिला मी रविवारी, सगळ्या डिशेस मस्त आहेत, पण जरा किचकट आहेत, म्हणजे आम्हा बायकांच्या नवऱ्यांसाठी, तू कसं करतोस, ‘गार्गी आज उशिरा आली ऑफिसातून, थकली होती मग आज संध्याकाळची भाजी मीच केली, तिला मदत म्हणून’, हे जमत नाही रे असलं सगळ्याच नवऱ्यांना, आता तू सगळ करतोस, आमच्या नवऱ्यांना साधा कांदा नाही चिरता येणार, म्हणून मला तुला आता एक सांगू का, आमच्या नवऱ्यांना सहज करता येतील अशा काही रेसिपीज तयार कर, याचे दोन फायदे, नवऱ्यांना हव्या तेव्हा या डिशेस आमच्यासाठी करता येतील, आमच्यासाठी काही केल्याचं त्यांना समाधान (इथे जराशी कुत्सितपणे हसली ती बहुधा); आणि दुसरं आणि महत्वाच म्हणजे जेव्हा आम्हां बायकांना खरंच जरा विश्रांतीची गरज असते तेव्हा हे पुरुष आम्हांला थोडा आमचा स्वतःचा निवांत वेळ देऊ शकतील. बघ बाबा, कर काहीतरी.”

मी सर्दच झालो होतो ते सगळ ऐकून, आता त्या माझ्या मैत्रिणीच्या हाकेला धावून जायचा 'कृष्ण'निर्णय मी घेतला..... 

आणि म्हणून आज ही एकदम सोप्पी डिश आणली आहे... मित्रांनो आणि त्याच्या बायकांनो तुमच्या नवऱ्यांसाठी....

अक्षरशः एकदम फास्ट होते ही डिश आणि चवीला म्हणाल तर...आहाहाहा

चला तर मग बघूया ‘मसाला मशरूम विथ कोकोनट ग्रेव्ही’

साहित्य

पांढरे बटण मशरूम – २०० ग्रॅम ( पांढरे स्वच्छ शक्यतो ताजे टवटवीत दिसणारे मशरूम घ्या, कळपात डाग पडलेले किंवा पडायला सुरुवात झालेले मशरूम शिळे असतात आणि या दिश्ची वाट लावू शकतात.)

नारळाचं दुध – २०० ml ( आजकाल बाहेर पॅक मिळतं हे दुध रेडीमेड परंतु सगळ तुम्हाला घरीचं करायचं असेल तर मध्यम नारळ खवायचा, मिक्सरला अर्ध्या वाटीपेक्षा जरा कमी पाणी घालून जाडसर फिरवायचा आणि नंतर स्वच्छ फडक्यात घालून व्यवस्थित पिळून याचं दुध काढायचं, जास्तीच दुध फ्रीज मध्ये टिकतं आणि नंतर हव तेव्हा वापरता येतं)लाल मिरच्या
– ६ , स्वच्छ धुवून घ्या, देठ काढून आतल्या पांढऱ्या बिया काढून या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या (शक्यतो काश्मिरी मिरच्या घ्या, या मिरच्या दिसायला मस्त लालेलाल असतात पण जास्त तिखट नसतात, कलर मस्त देतात डिशला आणि आगही लावत नाहीत. ही डिश करण्यापूर्वी या मिरच्या घरात शिल्लक नाहीत हे लक्षात आल्यावर गाडीवर टांग मारून या मिरच्या घेऊन आलो मी, आळस केलंत तर डिश छान होणार नाही... बायकोची शाबासकी मिळवायची आहे ना मग आळस नको रे मित्रांनो )

लसूण – ८ मध्यम पाकळ्या

एकदम लहान कांदे – ६ ( हे लहान कांदे मद्रास सांभार कांदे म्हणून ओळखले जातात, हे मिळाले नाहीत तर आपण नियमित घरी वापरणारे कांदे घेतले तरी चालतील, पण सगळ्यात लहान साईझ घ्या, चवीला छान गोडसर असतात, पांढरे कांदे असतील तर सर्वोत्तम)

जिरं – २ चमचे

कोथिंबीर – ४ चमचे चिरलेली

साजूक तूप – ३ चमचे ( ही डिश मला आठवतंय सरसोच्या तेलात मागे मी केली होती तेव्हा ही छानच झाली होती पण हे तेल आपण नियमित वापरत नाही म्हणून काल मी साजूक तुपात केली होती, भन्नाट लागते, बिनधास्त करा.)

मीठ – स्वादानुसार

साखर – चिमुटभर

पाककृती

१) सर्वप्रथम मशरूम स्वच्छ धुवून त्याचे धारदार सुरीने आडवे मध्यम काप करून घ्या.


२) जाडसर बुडाचा पॅन विस्तवावर बऱ्यापैकी तापवा आणि आता यात साजूक तूप सोडा, पण तापलेला असल्याने तूप पटकन विरघळणार, आता लगेच विस्तव मंद करा आणि यात लगेच जिरं घाला, जरासं परता आणि आता यात आधी लसूण घालून जरासं परतून सगळ्या लाल मिरच्या घालून साधारण ४ मिनिटे परता.


३) आता याचा रंग बदलायला सुरुवात झाल्यावर सगळा कांदा घालून त्यावर एक चमचा मीठ घालून परता साधारण ४-५ मिनिटे... आता यात चिमुटभर साखर घालून पुन्हा मिनिटभर परता....


४) आता यात चिरलेले मशरूम घालून परतायला सुरुवात करा, साधारणत: कहाण विस्तवावरच ४/५ मिनिटे परतायला लागतील. सर्व मशरूमना कांदा-लसूण-मिरचीच्या मसाल्याचा रंग चढतो आणि अदभूत वास पसरायला सुरुवात होते घरादारात...

आता इथे या डिशला जरासे पाणी सुटणार आहे पण चिंता नको याचा अर्थ आहे की आत्तापर्यंतची डिश तुम्हाला परफेक्ट जमली आहे दोस्तहो....

आता घरात वर्दी द्या की पुढल्या १५ मिनिटांत आपल्याला जेवायला बसायचे आहे, पाने घ्या...  

५) आता यात विस्तव कमीच ठेवून नारळाचे दुध अलगद सोडा आणि आता मात्र तुम्हाला सतत परतायला लागणार आहे ही डिश हळुवारपणे मशरूम तुटणार नाहीत याची काळजी घेऊन.


सर्व दुध पॅन मध्ये ओतल्यावर लगेच विस्तव पूर्ण मोठा करा आणि व्यवस्थित दमदार उकळी येऊ द्या, या उकळीवर परतत परतत आपल्याला दुध आटवायाचे आहे... आणि लक्षात ठेवा... नारळाच्या दुधाचं आपल्या नेहेमीच्या दुधासारख नाहीये बरं... लगेच आळत हे दुध... तेव्हा उगाच आजूबाजूला जाऊ नको... डिशची वाट लागेल... कारण विस्तव मोठा आहे....

दुध बऱ्यापैकी आळल्यावर आता याची ठीक लालसर ग्रेव्ही होणार आहे, ही ग्रेव्ही सर्व मशरूमला व्यवस्थित चहूबाजूंनी लपेटून झाल्यावर आता विस्तव बंद करा, पॅन बाजूला काढून आता सर्व्हिंग डिश मध्ये ही डिश काढून घ्या आणि आता सगळ्यात शेवटी आता यावर मस्त चिरलेली फ्रेश कोथिंबीर हलक्या हातांनी भूरभूरवा....


सगळ्यांना हाक मारा... ’चला जेवायला’.... टेबलावर पाने घेतलेली आहेतच... गरमागरम पोळी सोबत भन्नाट लागते ही डिश आणि 'भात'प्रेमी असाल माझ्यासारखे तर भातावर ही डिश म्हणजे स्वर्गसुख यार निव्वळ स्वर्गसुख...

आणि हो एक काम करा... 'डिश'सोबत एक मस्त फोटो काढून घ्या मित्रहो... झुक्याच्या फेसबुकसाठी हो...
स्टेटस टाकायचं आहे ना ?

“मी विथ माय मसाला मशरूम विथ कोकोनट ग्रेव्ही”....

आता यावर अगदी किंचित पण मस्त चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घाला... थोडीशीच आणि आवडत असेल तर शेवटी लिंबू पिळा...
लिंबाच्या सान्निध्यात तिखटाचा स्वाद मस्त खुलतो नेहेमीच...
लक्ष्यात ठेवा.

आता वेळ आली आहे प्लेटिंग ची...

मस्त प्लेट्स घ्या...

गरमागरम सर्व्ह करा आणि मस्त फुललेल्या पोळ्यासोबत चेपा जोरदार...

फक्त भाता सोबत खाताना कदाचित किंचित मीठ अजून घ्यावे लागेल भातावर आणि यावर लिंबू पिळा... स्वर्ग... स्वर्ग... आणि निव्वळ स्वर्ग 
आणि गरमागरम पोळीसोबत मस्त जेवण सुरु करा...

अरे थांबा थांबा यार....

आचमन केलेत का ?

जेवणा पूर्वी २ घोट पाणी पिऊन घ्या...

हात जोडून देवाचे स्मरण करा... भोजन मंत्र म्हणा आणि..

आता करा सुरुवात...

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा

देव बरा करो.........

 

- मिलिंद वेर्लेकर