पंजाबमध्ये एक ‘हाती’ सत्ता
 महा MTB  11-Mar-2017

पंजाब निवडणूक निकाल २०१७ विश्लेषण


 

एक्झिट पोलच्या आकडेवारीला धुळीस मिळवत कॉंग्रेसने पंजाबची सत्ता एका दशकभरानंतर पुन्हा काबीज केली आहे. एकूण ११७ जागांपैकी तब्बल ७० पेक्षा जास्त जागांवर दणदणीत विजय मिळवत कॉंग्रेसने बहुमताला लागणारा ५९ चा आकडाही सहज पार केला. खरंतर यंदाची पंजाबमधील लढत ही अकाली दल-भाजप युती, कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिहेरी असेल, असेच चित्र सर्वत्र रंगवले गेले असले तरी जसजशी मतमोजणी सुरू झाली, तसतसा थेट सामना हा कॉंग्रेस आणि ‘आप’मध्येच रंगला. कॉंग्रेसच्या विजयाची कारणमीमांसा करण्यापूर्वी ‘आप’ आणि अकाली-भाजप युतीने पंजाबमध्ये सपाटून मार का खाल्ला, याचे विश्र्लेषण करणे संयुक्तीक ठरेल.

‘झाडू’ चालला, पण स्वच्छता नाहीच!
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आमआदमी पक्षाचे पंजाबमधून ४ खासदार निवडून आले आणि त्यानंतर अरविंद केजरीवालांचा एक पाय कायमच दिल्लीत आणि दुसरा पंजाबात राहिला. पक्षबांधणी, संघटनेवर भर देत केजरीवालांनी पंजाबमधील दुखर्‍या नसींना थेट हात घातला. ड्रग्जच्या नशेत आकंठ बुडालेली ७० टक्क्यांहून अधिक तरुणाई, वाढलेली बेरोजगारी आणि सत्ताधार्‍यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप या तीन प्रमुख मुद्द्यांसह ‘आप’ मैदानात उतरली खरी.... जोरही लावला, चौकसभा, तळागाळातील मतदारांशी वैयक्तिक संपर्क, मागासवर्गीयांमधील वाढती लोकप्रियता यामुळे ‘आप’ची सरशी होईल, असा प्राथमिक कयास बांधला गेला पण पक्षांतर्गत हेवेदावे, दिल्लीत बसून पंजाब चालवणारे ‘बाहरवाले’, ‘पंजाबी नाही हरियाणवी केजरीवाल’ आणि तिकीटवाटपात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप मुख्यत: ‘आप’च्या पराजयाला कारणीभूत ठरले. त्यातच ‘आप’चे पंजाबचे निमंत्रक भगवंत मान यांना अकाली दलाचे उपमुख्यमंत्री सुखविर सिंग यांनी जलालाबाद मतदारसंघातून १८ हजार ५०० मतांनी पराभूत करत धोबीपछाड दिला आहे.
त्यातच दिल्लीकरांना दिलेल्या आश्वासनांवर केजरीवालांनी मारलेल्या झाडूनेही ‘आप’च्या अश्वमेधाला लगामघातला. एकूणच, खलिस्तानवादी चळवळीला छुपे समर्थन देणारे केजरीवाल नकोच, त्यापेक्षा कॉंग्रेसच बरी, हा पंजाबी मतदारांनी दिलेला कौल म्हणूनच बरेच काही सांगून जातो.

‘बादलच बाधले’
या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला ‘ऍन्टिइन्कम्बन्सी’चा जोरदार फटका बसला. थेट ५६ जागांवरून अकाली पडझड होत केवळ १५-१७ जागांवर विजय मिळवत पंजाबच्या मतदारांनी सत्तेपासून बादल यांना दूर राहण्याचाच जनादेश दिला आहे. त्यामुळे बादल कुटुंबीयांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, ड्रग्जचे रॅकेट नियंत्रण करण्यामध्ये मिळालेली असफलता आणि दोनदा सत्ता उपभोगूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत झालेली विकासकामे त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. हे बादल गरजले, पण बरसले मात्र नाहीत. त्यातच कृषिप्रधान पंजाबमध्ये नोटाबंदीनंतर उफाळून आलेला नाराजीचा सूरही भाजपच्या विरोधात गेला. त्यामुळे भाजपच्या जागांचीही १२ वरून ३ जागांवर घसरण झाली आहे. तेव्हा, अकाली दलासह भाजपलाही पंजाब निवडणुकीच्या निकालांवर आत्मपरीक्षण करावे लागणार असून पंजाबी जनतेचा विश्वास संपादित करावा लागेल. त्यामुळे ‘मोदींची जादू चालली नाही’ यापेक्षा ‘बादलच युतीला बाधले,’ असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

कॅप्टनने ‘हात’चे राखले!
२००२ ते २००७ या काळात पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले कॅ. अमरिंदर सिंग हे कॉंग्रेसच्या कालच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अमृतसर मतदारसंघातून अरुण जेटलींचा पराभव करून स्वत:ची ताकद सिद्ध केली होतीच. त्यातच ऐन निकालाच्या दिवशी, ११ मार्चलाच त्यांनी वयाची पंचाहत्तरीही पूर्ण केली. त्यामुळे पंजाबच्या जनतेकडून बहुमताचा मिळालेला हा तोहफा अमरिंदर सिंग तसेच कॉंग्रेसला दिलासा देणारा ठरला आहे. त्यातच भाजपमधून ‘आप’मध्ये डोकावून आलेले नवज्योत सिंग सिदूही अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडून आल्याने मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार म्हणून त्यांनीही ‘हात’ वर केला आहे. तरीही कॅ. अमरिंदर सिंग यांची विश्वासू प्रतिमा, ड्रग्ज आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची त्यांनी दिलेली आश्वासने यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांची दावेदारीच हल्लीच पक्षात आलेल्या सिदूंपेक्षा कधीही उजवी ठरते.
त्यामुळे एकूणच पंजाबवासीयांनी दिलेला हा एकतर्फी कौल त्यांची नाराजी स्पष्टपणे दर्शविणारा असून ‘कामं दाखवा अथवा श्राद्ध घाला’ या युक्तीला साजेसाच म्हणावा लागेल.

-विजय कुलकर्णी