युवराजांच्या अप्रगल्भतेवर शीला दीक्षितांचा ठप्पा
 महा MTB  24-Feb-2017

मुंबई महानगरपालिकेच्या आणि एकूणच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनंतर भारताची राजकीय वाटचाल ही मोदींच्या ‘कॉंग्रेस मुक्त भारता’कडे अधिक तेजीने होताना दिसतेय. त्यामुळे देशभरात ‘कॉंग्रेसचे भवितव्य कोणाच्या हाती’ आणि हा भारतावर सर्वाधिक काळ सत्ता गाजविणारा पक्ष असा किती काळ गांधी घराण्याच्या एकाधिकारशाहीखाली दबलेला राहणार, याचे उत्तर खुद्द नेतृत्वाकडेही नाही. त्यातच कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीचे मुख्यमंत्रिपद तीनवेळा भूषविलेल्या शीला दीक्षित यांच्या एका विधानाने कॉंग्रेसचे बोट त्यांच्याच हाताखाली दाबले गेल्यासारखी काहीशी विचित्र स्थिती उद्भवली आहे. एका मुलाखतीत दीक्षितबाई स्पष्टपणे बोलून गेल्या की, ‘‘राहुल गांधींकडे अजून पंतप्रधान पदासाठी लागणारी प्रगल्भता नाही, कारण ते त्यांच्या चाळीशीत आहेत. आपण त्यांना वेळ द्यायला हवा.’’ दीक्षितबाईंचे हे विधान सत्यवचन असले तरी ते आधीच मरगळलेल्या कॉंग्रेसला डिवचणारे मात्र नक्कीच आहे. तेव्हा, प्रश्न हाच पडतो की, आज २०१७ साली कॉंग्रेसचे युवराज प्रगल्भ नाहीत, मग २०१४ साली त्यांनी पंतप्रधानपदासाठीची आवश्यक प्रगल्भता कुठून उसनी आणली होती का? तेव्हा दीक्षितबाईंना राहुल गांधींमध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची नेतृत्वकुशल छबी दिसली, की त्या विजयश्रीच्या स्वप्नोत्सवात आधीच रममाण झाल्या होत्या? त्यांनी असे तोंडावर बोट नाही, तर हात दाबून गप्प राहणेच तीन वर्षे का बरं पसंत केले?

कॉंग्रेसमध्ये अख्खी हयात लोटलेल्या आणि सत्तेची फळं चाखलेल्या अशा या दीक्षितबाई मात्र हे सपशेल विसरल्या की, याच राहुल गांधींचे पिताश्री राजीव गांधी हे आतापर्यंत देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होऊन गेले. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर १९८४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे राजीव गांधींकडे वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी दैवाने आली. पण तरीही न डगमगता, पक्षाच्या संपूर्ण सहकार्याने राजीव यांनी कॉंग्रेस पक्षाचा हात खिळखिळा होऊ दिला नाही. पक्षबांधणीचा वेग वाढविला आणि कॉंग्रेस गावागावांत रुजविण्याचे म्हणूनच श्रेय त्यांच्या कुशल रणनीतीचे. त्यातच त्यांचे पुत्र राहुल गांधी जे सध्या ४६ वर्षांचे असले तरी आजीच्या, वडिलांच्या कार्यकर्तृत्वाची साधी सरही त्यांच्या अंगी नाही. त्यांचे वडील चाळीशीत पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात, तर राहुल मात्रे खांदे उडवत संसदेत डुलक्या काढण्यात गर्क असतात. त्यामुळे खरं तर दीक्षितबाईंचा राहुलच्या वयाचा आणि प्रगल्भतेचा ‘एक्सक्यूज’ न पटणारा आणि हास्यास्पद आहे. म्हणजे, एखाद्या व्यक्तीचे यश तुम्ही त्याच्या वयाच्या तुलनेत मोजूच शकत नाही आणि बाहेरचे दाखले कशाला, खुद्द गांधी घराण्यातही तशी बोलकी उदाहरणे जगजाहीर आहेतच की... त्यामुळे एकीकडे थोबाडात मारायची आणि नंतर गालही आपुलकीने चोळायचा, असा हा दीक्षितबाईंचा दिल्लीचा दिलदारपणा जरा अजबच म्हणावा लागेल.

दीक्षितबाईंना जर ४६ वर्षांचे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि भावी अध्यक्ष अप्रगल्भ, बालिश वाटत असतील, तर पक्षाचे भवितव्य किती अंधारात आहे, हे वेगळे सांगणे नकोच. त्यातच राहुल गांधी चाळीशीत म्हणून बच्चे, तर मग ४५ वर्षांच्या, राहुलपेक्षा केवळ एका वर्षाने लहान त्यांच्या भगिनी प्रियांका गांधींविषयी दीक्षितबाईंना असेच काही वाटते का, याचेही त्यांनी उत्तर एकदाचे देऊन मोकळे व्हावेच.

त्यामुळे खरं तर हे विधान दीक्षितबाईंचे एकटीचे वैयक्तिक मत आहे, असे मानण्याचे अजिबात काहीच कारण नाही. कारण, कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची एक संपूर्ण फळी, ही याच मताची आहे, पण गांधी घराण्याविरोधात अवाक्षरही काढायचे त्यांचे धाडस अजिबात नाही. दीक्षितबाईंनी तसे धाडस केले, कारण कुठे ना कुठे त्यांचे वयोमान झाले असून सत्तेचा उपभोगही त्यांनी दाबून घेतला आहे. मुख्यमंत्री, त्यानंतर केरळच्या राज्यपाल आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंतचा चेहरा. कारण, सपाशी आघाडी करण्यापूर्वी स्वबळावर सत्तेची स्वप्न पाहणार्‍या कॉंग्रेसने विकासाचा आणि ब्राह्मण म्हणून शीला दीक्षितांचा चेहरा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे केला होता. उत्साही दीक्षितबाईंनीही या वयात मग प्रचारात उडी घेतली. पण त्यांचेच अप्रगल्भ युवराज यांना सुबुद्धी सुचून साक्षात्कार झाला आणि दीक्षितबाईंपेक्षा अखिलेशच्या विकासोन्मुख ब्रॅण्डचा अधिक फायदा कॉंग्रेसला होईल, याची खात्री पटताच सपाबरोबर त्यांनी आघाडी घोषित केली. आपसूकच, ज्येष्ठ दीक्षितबाई अडगळीत फेकल्या गेल्या आणि त्यानंतर त्या प्रचारासाठीही उत्तर प्रदेशच्या रणांगणात हात हलवतानाही नजरेस पडल्या नाहीत. तेव्हा, कुठे तरी उपाध्यक्षांची ही यूटर्न दीक्षितबाईंच्या जिव्हारी लागली असावी आणि आज, या घडीलाच त्यांना युवराज चाळीशीचे, अप्रगल्भ आणि एकदमकच्चा लिंबू वाटले असावेत.

‘मोदी लाटे’नंतर पार उद्ध्वस्त झालेली कॉंग्रेस अजूनही सावरलेली नाही. एकामागून एक आलेल्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसशासित राज्यांतही ‘कमळ’ फुलत गेले. त्यामुळे कुशल नेतृत्वाचा अभाव, मरगळलेले कार्यकर्ते आणि देशविघातक भूमिकांची तळी उचलण्याच्या ‘हात’च्या प्रतापामुळे देशभरातील किमान डझनभर नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. महाराष्ट्रातून दत्ता मेघे, रणजित देशमुख यांनी कॉंग्रेसमधून फारकत घेतली, तर राष्ट्रीय पातळीवर जी. के. वासन, क्रिश्ना तीरथ, चौधरी बिरेंद्र सिंग, जगमित सिंग ब्रार, अवतार सिंग भंडाना, जयंती नटराजन, एस. एम. कृष्णा आदी नेतेमंडळींनी हाताची साथ सोडून कमळच हाती घेतले.

त्यामुळे निष्ठावंतांनी फिरवलेली पाठ असो वा निवडणुकीमध्ये सपशेल झालेला पराभव, कॉंग्रेसला पुन्हा उभारी घेऊन नवसंजीवनी मिळणे आगामी काळात कितपत शक्य होईल, याबाबत साशंकता आहेच. त्यातच मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळापैकी निम्मी कारकीर्द यशस्वीरित्या संपूनही कॉंग्रेस अजून २०१४च्या ऐतिहासिक पराजयातून उभीच राहू शकलेली नाही. त्यामुळे २०१४ ते २०१७ हा काळ कॉंग्रेसच्या घसरणीतील सर्वात दुर्दैवी आणि सातत्याने अपयश पचवायलाच शिकणारा राहिला असून २०१९ मध्येही हीच स्थिती कायमराहिल्यास ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ ही केवळ एक घोषणाच राहणार नाही, तर मोदींचे ते स्वप्न सत्यातही उतरायची आता लक्षणे आहेत.

तेव्हा अप्रगल्भ, बेभरवशाचे आणि युवराजांचे संदर्भहीन नेतृत्वच कॉंग्रेसला त्याच्या अस्ताकडे हळूहळू ढकलत आहे. त्यामुळे वेळीच गांधी घराण्याने या बुडत्या जहाजाला किनारा दाखविला नाही, तर पक्षबुडी अटळ आहे.

विजय कुलकर्णी