आज ठरणार राज्यातील नवे कारभारी
 महा MTB  23-Feb-2017

 

गेल्या मंगळवारी झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह गेल्या मंगळवारी राज्यातील १० महानगरपालिका तसेच २५ जिल्हा परिषद आणि २८३ पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले होते. आज सकाळी १० वाजल्यापासून महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी मतमोजणी सुरू होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व पक्षांचे भवितव्य स्पष्ट होईल. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षांसह नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, अकोला, अमरावती या १० महानगरपालिकांच्या एकूण १ हजार २६८ जागांसाठी ९ हजार २०८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या ६५४ जागांसाठी २ हजार ९५६ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. याचबरोबर पंचायत समित्यांच्या १ हजार २८८ जागांसाठी ५ हजार १६७ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. आजची लढत हि राज्यातील अनेक पक्षांच्या प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. 


राज्यातील २५ जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. तर १० महापालिकांसाठी २१ तारखेला मतदान घेण्यात आले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुमारे ७० टक्के मतदान झाले आहे, तर राज्यातील १० महापालिकांसाठी ५६.३० टक्के एवढे मतदान झाले आहे. राज्यातील सर्व ठिकाणी मतदानाचा आकडा ५० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणाला पसंती दिली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.