खाद्यभ्रमंती- मेथीचे स्टफ पराठे
 महा MTB  02-Feb-2017
मेथीचे स्टफ पराठे-
 
हे स्वादिष्ट आणि पौष्टिक स्टफ पराठे सकाळी सकाळी मस्त ब्रेकफास्ट म्हणून आपण खावू शकतो अथवा डब्यामध्ये पूर्ण जेवण म्हणून सुद्धा देऊ शकतो...
 
मला ठाम विश्वास आहे कि तुम्हाला सुद्धा तुमच्या कुटुंबियांसाठी ही हेल्दी रेसिपी नक्कीच आवडेल...

सकाळी हे सगळ करायला घाई होऊ शकते असं जर आजकालच्या धामधुमीच्या आयुष्यात वाटतं असेल तर यातलं सारण रात्री करून फ्रीज मध्ये ठेवू शकतो आणि कणिक सुद्धा अशीच तयार करून ठेवू शकतो...

सकाळी उठायचं...मस्त फ्रेश व्हायचं...सुर्यनारायणाच दर्शन घ्याच आणि १५ मिनिटात हा मस्त लज्जतदार आणि जबरदस्त पौष्टिक ब्रेकफास्ट तयार करायचा....


 
गरमागरम पराठे आणि सोबत मस्त घट्ट कवडे दही, लोणी अथवा साजूक तूप अथवा लोणचे यांसोबत इतके मस्त लागते की कुठल्याही जंक फूडची आठवण आपल्याला कधीच होणे शक्यच नाही. 
 
तेव्हा चला तर मग...
 
करुया मस्त मेथीचे स्टफ पराठे...
 

साहित्य

 • गव्हाचे पीठ  - २ कप (३००  ग्राम)
 • सोयाबीन पीठ - २ चमचे (आवडत असल्यास आणि तेही इतक्याच प्रमाणात...आणि हो सोयाबीन चे पीठ आपल्याला बाजारातून विकतच आणावे लागते...त्यामुळे हे पीठ भाजून नंतर दळलेल्या सोयाबीनचे आहे ना हे कन्फर्म करा आणि नंतरच घ्या)
 • मेथी - २५० ग्राम निवडलेली पाने
  (छान ताज्या हिरव्या लहान पानांची जुडी घ्या..निवडताना जास्त जाड/मोठ्या काड्या घेऊ नका पण छोट्या छोट्या काड्या घ्यायला काहीच अडचण नाही...उलट चांगले......शरीराला मस्त फायबर मिळते यामधून)
 • तेल - ३-४  टेबल स्पून (पराठे तव्यावर भाजताना साजूक तूप घ्यायला हरकत नाही...आम्ही गायीचे घरी लोणी कढवून तयार केलेलं तूप वापरतो...डॉक्टर ला विचारा...रोज किमान एक चमचा तूप खायला हरकत नाही...रादर...खावेच...असे डॉक्टर हल्ली नक्की सांगतात)
 • हींग - १  चिमुट 
 • हळद - अर्धा चमचा 
 • शेंगदाण्याचा कुट - २ चमचे
  (शेंगदाणे  न खाण्याचे काही पथ्य असेल तरी या मेथीच्या पराठ्यात बिनधास्त हा शेंगदाण्याचा कुट घाला...काहीही अपाय होत नाही एवढ्या सगळ्या सारणात दोन चमच्यांनी..त्याउलट शेंगदाण्यामुळे पालेभाज्या छान अंगी लागतात)
 • जीरं  - ३ चमचे  
 • हिरवी मिरची  - २ (तुकडे करून - जास्त तिखट मिरची घेऊ नका )
 • लाल तिखट  - १/२  चमचा 
 • आले - साधारण १ इंच तुकडा (तिखट सातारी आले नको )
 • लसूण - ६ मध्यम पाकळ्या 
 • लिंबाचा रस - ३ चमचे 
 • साखर - २ चमचा 
 • मीठ  - ३/४ चमचे 
 • चिरलेली कोथिंबीर - ४ चमचे 

पाककृती

देठा सकट मेथी पाने निवडून व पाण्याने दोनदा चाळणीत स्वच्छ धुऊन घ्या, नंतर पाणी पूर्ण निथळून  देठासकट पाने बारीक चिरून घ्या. जेवढी पाने बारीक चिराल तेव्हढी नंतर सारण भरून कणिक लाटताना सोप्पे जाते आणि पाने आणि देठ दाताखाली ही येत नाहीत. 
 
 
भांड्यामध्ये गव्हाचे पीठ, सोयाबीन पीठ , दिड चमचे मीठ आणि 2 चमचे तेल नीट मिक्स करा.

आता आवश्यक तेव्हढे किंचित कोमट पाणी घालत कणिक मळून घ्या.
 
हा कणकेचा मऊ गोळा आता झाकून बाजूला तयार होण्यासाठी १५ एक मिनिटे ठेवून द्या.

 

पीठ नीट तयार होईपर्यंत मेथी पराठ्यात घालण्याचे सारण आता तयार करून घेऊया.

 
मिक्सर च्या छोट्या भांड्यात चिरलेली कोथिंबीर, २ चमचे जिरे, साखर, आले, मिरचीचे तुकडे , हळद, शेंगदाण्याचा कुट , लाल तिखट , मीठ आणि थोडेसे पाणी घालून बारीकसर फिरवून घ्या. 
 
 
एका नॉन स्टिक पॅन मध्ये  २ चमचे तेल घालून तेल तापल्यावर  त्यात उरलेले जिरे घाला, साधारण परतल्यावर हिंग घाला...एक चमचा साखर घालून आता किंचित हलवून घ्या.

आता मिक्सरच्या भांड्यातले ओल्या मसाल्याचे मिश्रण पॅन मध्ये घाला आणि चवीनुसार मीठ घालून किंचित परतून घ्या..
 
आता या पॅनमधल्या मिश्रणात बारीक चिरलेली मेथी घालून व्यवस्थित परता...किंचित पाणी सुटेल...अजून परतत रहा...जास्तीचे सुटलेले पाणी पूर्ण मुरेपर्यंत परता...
आणि आता सगळ्यात शेवटी लिंबाचा मस्त ताजा ताजा रस घालून अलगद हलवा...
हा रस या सारणात घातलात रे घातलात कि या सगळ्या प्रकारचा मस्त ताजा फ्रेश वास सुटतो...
तो दीर्घ श्वास घेऊन मस्त आतपर्यंत भरून घ्या...
एक छान स्माईल द्या...स्वतःलाच
आणि आता पुढे....
 
लिंबाचा रस घातल्यानंतर आता गॅस लगेच म्हणजे अगदी लगेचच बंद करा आणि हे संपूर्ण सारण एका वेगळ्या प्लेट मध्ये  थंड होण्यासाठी ठेवून द्या.
 
एव्हाना १५ मिनिटांनी आपले पीठ सेट होवून तयार झाले आहे. हाताला थोडे तेल लावून आपले हे तयार झालेले पीठ अजून एकदा मस्त मळून घ्या...म्हणजे पराठे लाटताना अडचण येणार नाही....
तवा अग्नीवर ठेवून जरा गरम करा...
 
मळलेल्या पिठातून थोडेसे पीठ लढून त्याची गोळी तयार करा...तुमच्या शेजारी एका पसरत थाळीमध्ये साधे कोरडे पीठ घ्या...या गोळीला आता या कोरड्या पिठामध्ये जरासे फिरवून साधारण ३ ते ४ इंचाचा एक गोल पराठा लाटून घ्या...
 
या लाटलेल्या छोट्या पराठ्यावर मगासच्या थंड करत ठेवलेल्या मिश्रणातले काही २-३ चमचे मिश्रण घ्या आणि आता हाताने पराठ्याला नीट मोदकाला करतो तसे बंद करून घ्या...
 
आता स्टफिंग भरलेल्या गोळीला हाताच्या बोटांनी अजून थोडे दाबत दाबत मोठे करून घ्या आणि नंतर लाटण्याने साधारण ५ ते ६ इंचाचा पराठा अलगद लाटून घ्या.
 
तवा आतापावेतो पुरेसा तापला असल्यास त्यावर थोडेसे तेल टाकून हा लाटलेला पराठा या तव्यावर अलगद ठेवून द्या आणि उलतण्याने मस्त तांबूस होईपर्यंत शेकून तयार करा. आवडत असेल तर सारण थोडे जास्त भरायला हि हरकत नाही...जितके सारण अधिक तितके पराठे जास्त छान लागतात हे नक्की.


 
घरात या जबऱ्या पौष्टिक आणि गरमागरम पराठ्यांचा आस्वाद घेणारे जितके लोक असतील तितल्या प्लेट्स घ्या....
मस्त फुललेले हे पराठे आता या प्लेट्स मध्ये टोमाटो , घट्ट कवडे दही, कोथिंबीर मिरचीची चटणी अथवा लोणच्या सोबत वाढा...
 
आणि खाणाऱ्या लोकांनी, विशेषतः मुलांनी कौतुकाने तुमच्याकडे पाहिल्यावर मस्त मुठभर मांस अंगावर चढतं का नाही पहा...
 

भरपेट खा...आरोग्यदायी रहा...खुश व्हा...मस्त जगा 
देव बरा करो.........

-मिलिंद वेर्लेकर