खाद्यभ्रमंती- कलर्ड ड्राय स्पाईस
 महा MTB  16-Feb-2017


फ्लॉवर म्हटलं की आपल्याला आठवते बहुतकरून फ्लॉवर बटाटा रस्सा किंवा कुर्मा...

अर्थात... आपल्या स्वयंपाकघरातला परंपरागत फ्लॉवर बटाटा रस्सा हा मस्त गरमागरम पोळी सोबत अथवा वाफाळलेल्या भातावर लोणच आणि पापडासोबत काय किलिंग लागतो हे सांगणे नलगे....

पण फ्लॉवर या अत्यंत बहुगुणी भाजीच्या सहाय्याने एक अत्यंत वेगवान तरीही लज्जतदार आणि पौष्टिक डिश तयार केली आहे मी.... आणि या डिशची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी मी फ्लॉवरसोबत या डिश मध्ये घातलं आहे गाजर आणि मटार...

ही भाजी तशी बऱ्यापैकी कोरडी होते...  पण मसाल्यांच्या मुक्त संचाराने सणसणीत लागते......

चला तर मग या जबऱ्या लज्जतदार, करायला अत्यंत वेगवान आणि तरीही भन्नाट पौष्टिक डिश करायला सुरुवात करूया मित्रांनो आणि मैत्रिणींनो............


साहित्य 

फ्लॉवर - अर्धा किलो (छान ताज्या पांढऱ्या रंगाचा आणि सध्या नजरेला सुद्धा सगळी फुले नीट छान मोकळी दिसतील असा फ्लॉवर निवडा...फ्लॉवर ताजा नसेल तर फ्लॉवर ची फुले मलूल होतात आणि क्रिस्प दिसत नाहीत)

गाजर - ३ मध्यम आकाराची (गाजरे फार मोठी घेऊ नका, जून असतात, मध्यम आकाराची छान लालबुंद ताजी गाजरे घ्या)

मटार - १०० ग्राम (पूर्ण वर्षभर ताजे मटार मिळणार नाहीत सो फ्रोझन चालतील)

तेल - ३ चमचे 

तमालपत्र - २ मध्यम आकाराची 

लवंग - ८ 

दालचिनी - एक इंची तुकडा 

वेलची - ६ 

काळी मिरी - १० 

लिंबू रस - ४ चमचे 

पांढरे तीळ - २ चमचे 

सुकी लाल मिरची - २ मध्यम आकाराच्या 

कसुरी मेथी - एक चमचा 

हिंग - चिमुटभर 

मीठ - २ चमचे 

साखर - चिमुटभर 

कोथिंबीर - २ चमचे बारीक चिरलेली 


पाककृती 


या डिशची आधी जरा तयारी करून घ्यावी लागते, जरा पेशंस ठेवून भाज्या नीट छान चिरल्या तर दिसतात हि छान आणि छान दिसल्यामुळे भूक हि भडकवतात छान...

१) गाजराचे उभे साधारण एक इंचाचे तुकडे करून घ्या. फ्लॉवरची सुद्धा मध्यम आकाराची फुले वेग-वेगळी करून घ्या आणि लगेच सगळी फुले पूर्ण पाण्यात बुडतील अश्या खोलगट भांड्यात घेवून त्यात चांगले २ चमचे मीठ टाकून पाण्यात नीट विरघळवून घ्या. असा हा फ्लॉवर चांगला २० मिनिटे तरी ठेवून द्या.(फ्लॉवर मध्ये कीड असण्याचा संभाव असतो. मिठ्याच्या पाण्याने कीड निघून जाते)
फ्रोझन मटार सध्या पाण्यात बुडवून ठेवा...

१० मिनिटांत नॉर्मल होतात 

२) एका जड बुडाच्या पातेल्यात ३ चमचे तेल घ्या आणि ते तापल्यावर त्यात हिंग टाकून हलके परतून घ्या. आता अग्नी कमी करून यात आधी लाल मिरची तुकडे करून घाला आणि मिरची काळी पडल्यावर पांढरे तीळ घालून व्यवस्थित परतून फुलू द्या. तीळ साधारण सोनेरी रंगाचे होऊ लागल्यावर आता यात तमालपत्र, दालचिनी तुकडे करून घाला आणि वेलची फोडून घाला. आता लवंग, काळी मिरी घाला आणि व्यवस्थित परतून घ्या. मसाल्याचे पदार्थ साधारण एक मिनिटभर परता... जास्त नको... वास निघून जातो....

हे मिश्रण साधारण कोरडे होताना दिसते आता लगेच यात मीठ आणि साखर घालून साधारण पाणी सुटून मिश्रण ओले होईपर्यंत परता...

३) आता यात आधी गाजरे टाकून चांगली ५ मिनिटे परतून घ्या...
आता यात फ्लॉवर ची सगळी फुले टाकून मस्त ५ मिनिटे परतून घ्या...
मसाला तयार झालेले तेल या सगळ्या भाजीला लागले पाहिजे...
सगळ्यात शेवटी मटार टाका आणि आता पुन्हा ३/४ मिनिटे परतून घ्या.
बास...
जास्त परतू नका...
या तिन्ही भाज्या आपण कच्याही खावू शकतो त्यामुळे या भाज्यांचा जबरदस्त क्रंचीपणा नष्टवायचा नसेल तर येवढीच शिजवा हि भाजी..............

४) आता यात लिंबाचा रस घाला आणि पुन्हा परतून घ्या...
लिंबू रस भाजीच्या काना-कोपऱ्यात छान लागू दे...
आता कसुरी मेथी घाला आणि पुन्हा वरून खाली आणि खालून वर हलवून घ्या....
आणि सगळ्यात शेवटी आता चिरलेली कोथिंबीर वर स्प्रीन्कला...

आता वेळ आली आहे भन्नाट प्लेटिंग ची 

मित्रांनो आणि मैत्रिणींनो...
जे अन्न आपण तयार करतो ते छान प्लेटिंग करणे खूप आवश्यक असते कारण हे छान सजवलेले अन्न आपल्या पोटात भुकेचा आगडोंब उसळवते आणि 'मग आणि मगच' हे अन्न आपल्याला छान पचते ज्याला आपण आपल्या भाषेत 'अंगाला लागते' असे म्हणतो....

चला... तर मग ... हाक मारा घरच्यांना...
अर्थात मसाल्यांच्या वासांनी आत्तापावेतो त्यांना कल्पना आलीच असेल की... "काहीतरी जबऱ्या शिजतंय..."

मस्त ही प्लेट टेबलाच्या मध्यभागी ठेवा...
ताटात  गरमागरम पोळ्या घ्या...
अथवा वाफाळलेला भात घ्या...
वर ही भाजी घ्या...

ही भाजी खाताना मध्ये मध्ये मसाल्याचे पदार्थ येतील दातांखाली...
माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे कि किमान 'थोडे' तरी हे मसाल्याचे पदार्थ या डिश सोबत खा...

हे पदार्थ फक्त वासांसाठी आणि केवळ चवीसाठी नसतात तर या प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाचे काही ना काही फायदे शरीराला नक्की होत असतात...

चला तर मग...
ताट वाढले आहे...
एक घोट पाणी पिऊन घ्या...
आपला नेहेमीचा भोजन मंत्र म्हणा...
आणि होऊ द्या सुरु.....आक्रमण

एक विनंती...
ही भाजी डब्यात घेवून जावू नका...
गरमागरमच छान लागते...
आणि टीव्ही पाहात पाहात ही भाजी खावू नका...
एक घास घेतल्यावर जो काही स्वाद ही भाजी तोंडामध्ये तयार करते त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर टीव्ही बंद करा...
आणि आता सावकाश जेवा......
वेडे व्हा.. वेडे करा
खुप खा.. खूप जगा   
 
रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....

भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा

-मिलींद वेर्लेकर