कर्ज घेताय, मग आधी तुमचा 'सीबील स्कोर' जाणून घ्या...
 महा एमटीबी  09-Dec-2017


 
साहील वर्मा एका आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याचे वार्षिक उत्पन्न रु.१८ लाख इतके आहे, त्यांनी वाकड येथे रु.७५ लाख किमतीचा एक रेडी पझेशन फ्लॅट घेण्यासाठी बँकेकडे रु.६० लाखाच्या होम लोन साठी अर्ज केला. १५ दिवसानंतर बँकेने त्यांना नकार कळविला. खरे तर त्यांचे वार्षिक उत्पन्न विचारात घेता रु.६० लाखाचे होम लोन सहजगत्या मिळणे अपेक्षित होते, तरी सुद्धा बँकेने त्यांच्या कर्जास नकार कळविला. याचे एकमेव कारण होते त्यांचा 'सीबील स्कोर'. आपल्या पैकी बहुतेकांना होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेण्याची गरज पडू शकते. अशा वेळी एखाद्याचे कर्ज जर सीबील स्कोर मुळे नाकारले गेले तर निश्चितच मनस्ताप तर होईलच पण यावर त्वरित काही उपाय देखील करता येणार नाही. म्हणूनच सीबील स्कोर म्हणजे काय व तो कसा ठरविला जातो याची माहिती असणे आजकाल जरुरीचे झाले आहे.
 
सीबील स्कोर हा एक तीन आकडी नंबर असून हा कर्जदाराने पूर्वी घेतलेल्या कर्जाच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असतो, कर्जाचा परफॉर्मन्स हा घेतलेल्या कर्जाची रक्कम, तारण, कर्जाचे कारण, घेतलेल्या कर्जाचा वापर, कर्जाचा कालावधी, परतफेड करतानाचा बँकेचा अनुभव, कर्ज घेण्याची फ्रिक्वेन्सी, कर्जातील अनियमितता या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून ठरविला जातो. त्यानुसार कर्जदारास स्कोर (गुण) दिला जातो. हा स्कोर ३०० ते ९००च्या दरम्यान असतो. जितका स्कोर जास्त तितका कर्जदाराचा परफॉरमन्स चांगला समजला जातो. सीबील स्कोरची वर्गवारी खालील प्रमाणे केली जाते.
 
 ३०० ते ६१९  पुअर (खराब)
 ६२० ते ६४९   बरा
 ६५० ते ७५० चांगला 
७५१ ते ९००    उत्तम
 
आता सर्व व्यापारी बँका कर्ज अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी सीबील या संस्थेकडून संबंधित अर्जदाराचा स्कोर सीबील कडे अर्जदारा बाबतची माहिती देऊन मागवितात. सीबील कडून मिळणाऱ्या स्कोर वरून अर्जदाराच्या परफॉर्मन्सबाबत माहिती मिळत असल्याने त्यानुसार नवीन कर्ज अर्जाबाबत निर्णय घेतला जातो. अर्जदाराने पूर्वी कर्ज घेतले नसल्यास सीबीलकडून 'नो हिस्टरी' असा रिपोर्ट दिला जातो. थोडक्यात अर्जदार प्रथमच कर्ज घेत आहे हे समजते. विशेष म्हणजे सीबील कडे कर्जाबाबतची सर्व माहिती बँका/कर्ज देणाऱ्याने द्यावयाची असते. यामुळे एकच व्यक्ती एकाच कारणासाठी एकाच तारणावर एका पेक्षा जास्त ठिकाणाहून कर्ज घेऊ शकत नाही व यामुळे बँकांची फसवणूक न होण्यास मदत होते.
 
सीबील स्कोर संदर्भात नुकतेच जनता सहकारी बँकेच्या फेसबुक पेजवरून
एक लाईव्ह कार्यक्रम करण्यात आला होता.
 
 
 
सीबील स्कोरची मागणी वित्त संस्था (बँक) तसेच कर्ज मागणी करणाऱ्यासही करता येते. मागणी ऑन लाईन व ऑफ लाईन दोन्ही पद्धतीने करता येते. या साठी सीबीलच्या साईट वरील फॉर्म पूर्ण भरून ऑन लाईन /ऑफ लाईन सबमिट करावा लागतो व ऑन लाईन सबमिशन करताना रु.४७० इतके पेमेंट ऑन लाईन करावे लागते. याउलट ऑफ लाईन सबमिशन करताना रु.४७०चा चेक/डी डी अर्जासोबत जोडावा लागतो. अर्जदाराने कर्ज मागणी अर्ज करण्यापूर्वी सीबील स्कोर जाणून घेणे जास्त योग्य असते. सीबील स्कोर सोबत सी आय आर (क्रेडीट इन्फर्मेशन रिपोर्ट) दिला जातो.
 
सीबील (क्रेडीट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) ही संस्था भारतात २००१ पासून कार्यरत असून २०१० पासून इक्विफ़क्स, एक्स्पेरिअन, हाय मार्क या तीन नवीन संस्था याच प्रकारची सेवा सुविधा देऊ लागल्या आहेत. क्रेडीट स्कोर हा प्रामुख्याने कर्जाची अनियमित परतफेड, कर्ज थकीत होणे, वारंवार कर्ज घेणे, क्रेडीट कार्डचे बिल वेळेत न भरणे किंवा पूर्ण बिल भरता रोल ऑन करणे या कारणांमुळे कमी होत असतो. आणि म्हणूनच नियमित परतफेड केल्याने व आवश्यक असेल तेवढेच कर्ज घेतल्याने सीबील स्कोर मुळे भविष्यात अडचण होत नाही.
 
- सुधाकर कुलकर्णी
प्रमाणित वित्तीय नियोजक
-----