बांगलादेश स्वातंत्र्यानंतरही हिंदू वंशविच्छेद सुरूच
 महा एमटीबी  09-Dec-2017

 
 
स्रोत: Census 2011 Bangladesh: The vanishing Hindus!, 4 May 2015, News Bharati English

 
 
 
 
शेख मुजीब उर्-रहमान
 
शेख मुजीब उर्-रहमान हे बांगलादेशचे पहिले पंतप्रधान. मुजीब आपल्या तरूणपणी मुस्लिम लीगचे कट्टर समर्थक होते. बांगलादेश निर्मितीत ज्या देशाने त्यांची बाजू घेतली, त्यांना सहाय्य केले, निर्वासितांचा लोंढा स्विकारला, युद्ध केले त्या भारतापासून मुजीबांनी कालांतराने फारकत घेण्यास सुरूवात करून ज्या देशाने त्यांना व त्यांच्या प्रांताला अन्यायी वागणूक दिली, अत्याचार, लुटालुट, शिरकाण केले त्या पाकिस्तानशी जवळीक साधण्यास सुरूवात केली. बांगलादेशच्या नवनिर्मित राज्यघटनेत ’समाजवाद व संप्रदायनिरपेक्षता’ शब्दांचा समावेश करणाऱ्या मुजीबांनी ‘Organisation of Islamic Conference’चे सभासदत्व स्वीकारले ह्याची नोंद घेणे आवश्यक आहे.

 
प्रा.अबुल बरकत 
 
बांगलादेश स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या स्थितीत फार काही फरक पडला नाही, हिंदूंचा छळ सुरूच राहिला. बांगलादेशातील राजकीय अभ्यासक प्रा. अली रियाझ 'God Willing: The Politics of Islamism in Bangladesh' या त्यांच्या पुस्तकात असा निष्कर्ष काढतात की, गेल्या २५ वर्षात बांगलादेशातून ५३ लक्ष हिंदूंनी पलायन केले आहे. ढाका विद्यापीठातील प्रख्यात अर्थतज्ञ प्रा.अबुल बरकत ह्यांनी 'Political economy of reforming agriculture-land-water bodies in Bangladesh' ह्या पुस्तकात असा निष्कर्ष काढला आहे की, '३० वर्षानंतर बांगलादेशात हिंदू शिल्लक राहणार नाहीत...१९६४ ते २०१३ मध्ये धार्मिक छळ व भेदभावामुळे १.१३ कोटी हिंदूंनी बांगलादेशातून स्थलांतर केले आहे. म्हणजे सरासरी दररोज ६३२ व दरवर्षी २ लाख ३० हजार ६१२ हिंदू देशत्याग करत आहेत. मुक्तीयुद्धाआधी स्थलांतरितांचे प्रमाण दररोज ७०५ होते, तर १९७१ ते १९८१ मध्ये ५१२ व १९८१ ते १९९१ मध्ये ४३८ झाले. पण नंतर हे प्रमाण १९९१ ते २००१ मध्ये ७६७ व २००१ ते २०१२ मध्ये ७७४ इतके वाढले.' तसेच किमान २२ मूलनिवासी समूह गायब झाले आहेत.१ म्हणजे १९७१च्या आधीपासून हिंदूंचे स्थलांतर होत होते व बांगलादेशनिर्मिती नंतर १९७१ ते १९९१ मध्ये थोडेसे कमी झाले असले तरी बंद झाले नव्हते व १९९१ ते २०१२ हे प्रमाण १९७१च्या आधीच्या प्रमाणापेक्षाही वाढले आहे.
 
 
१९७९ला प्रयाग येथे विश्व हिंदू संमेलन भरले होते, त्यात बांगलादेशातील ८१ वर्षीय उपेंद्रनाथ दत्त निवेदनात म्हणाले,"आमचा प्रश्न प्रत्यक्ष जीवनमरणाचाच प्रश्न आहे. हिंदू म्हणून नामशेष होण्याचे संकट आमच्यापुढे आ वासून उभे आहे....आम्ही मात्र असे अभागी आहोत की मध्ययुगीन पाशवी प्रवृत्तीचे अन् क्रौर्याचे लक्ष्य व शिकार बनलो आहोत. बांगलादेशातील हिंदू शारीरिकदृष्ट्या वैफ़ल्यग्रस्त व सांस्कृतिकदृष्ट्या अपंग आहेत."२ वरील निवेदन बांगलादेशातील बंगाली अस्मिता फोल ठरून बांगलादेशाची धार्मिक मूलतत्ववादाकडे वाटचाल दर्शवते.
 
 
संदर्भ - 
 
१. Hasan, Kamrul; No Hindus will be left after 30 years, 20 Nov 2016, Dhaka Tribune
 
२. जोग, ब.ना.;मुसलमानांच्या दंगली, विराट प्रकाशन, १९८०, पृष्ठ ३५-३६
 
- अक्षय जोग