खिलजीला विसरा आणि रणवीरच्या संग्राम भालेरावची झलक बघा
 महा एमटीबी  08-Dec-2017

 
 
बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुविवादास्पद ठरलेल्या 'पद्मावती' या चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याने रंगवली आहे. त्याच्या या व्यक्तिरेखेबाबत अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटत आहेत, रणवीरही त्या प्रत्येकाला समोर जात आहे, पण 'पद्मावती' च्या प्रदर्शनाची तारीख अजूनही अंधारातच असल्याने रणवीरनी आपला मोर्चा आगामी चित्रपटाकडे वाळवल्याचे दिसते. 'सिम्बा' या पुढील वर्षीच्या डिसेंबर मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर त्याने नुकतेच सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.
 
 
रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या व करण जोहरच्या निर्मिती असणाऱ्या 'सिम्बा' या चित्रपटात रणवीर सिंग संग्राम भालेराव या नावाच्या मराठमोळ्या पोलिसाची भूमिका साकारत आहे. यातली आश्चर्याची गोष्ट ही आहे की 'सिम्बा' हा चित्रपट २८ डिसेंबर २०१८ ला प्रदर्शित होतोय. त्याअगोदर रणवीर कोणत्याही चित्रपटात बघायला मिळणार नाही की काय असा प्रश्न नेटिझन्स कडून उपस्थित केला जात आहे. तरीदेखील अजूनही रणवीरच्या प्रोफाईल वर अल्लाउद्दीन खिलजीचाच फोटो आहे, हे विशेष.
 
'पद्मावती' वादाच्या भोवऱ्यात अडकण्यापूर्वी रणवीर अल्लाउद्दीन खिलजीचे पुरेपूर प्रमोशन सोशल मीडिया वरून करत होता. पण १ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे तो अशा आगामी प्रोजेक्टचे प्रमोशन करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गुजरातच्या निवडणुका संपून निकाल जाहीर झाले की 'पद्मावती'च्या प्रदर्शनाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत रणवीरच्या चाहत्यांना तो छोट्या मोठ्या जाहिरातीतून तर भेटतच राहील...