तो ’वेगळाच’ होता…
 महा एमटीबी  08-Dec-2017
तो दिवाळीचा पाडवा होता. सकाळीच माझा फ़ोन वाजला. माझा जवळचा मित्र आणि जनकल्याण रक्तपेढीमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असलेला राजेश तोळबंदे फ़ोनवर बोलत होता. ’एक वाईट बातमी आहे. आपले गणेश जोशी गेले’, राजेशचे हे शब्द कानावर पडले आणि मी अक्षरश: सुन्न झालो. हे असे कसे झाले ? किती अनपेक्षित, किती अकल्पित ! ’गणेश जोशी गेले’ असा आदरार्थी शब्दप्रयोग राजेशने केला असला तरी आम्ही ’अहो-जाहो’ करावं, असं गणेशचं वय नव्हतं. किंबहुना आम्ही त्याला नेहमी एकेरीच संबोधत असू. वयानं जेमतेम चाळीशीच्या आत-बाहेर असलेल्या गणेशशी आमचा संबंध तसा अगदी अलिकडचा. केवळ पाच महिन्यांपूर्वीच आमचा परिचय झाला होता.
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा माजी पूर्णवेळ कार्यकर्ता आणि राजेशचा चांगला मित्र असलेल्या निलेश फ़ाटक याचा हा मामेभाऊ. गणेशचे वडील एयर इंडियामधून निवृत्त झालेले आणि धाकटा भाऊ नोकरीनिमित्त मुंबईत स्थिर झालेला. गणेशचे वडील आणि भाऊ हे दोघेही नियमित प्लेटलेटदाते. नियमित प्लेटलेटदानाबरोबरच त्यासंबंधीची सर्व अद्ययावत माहितीही या दोघांकडे असते. अशी माहिती मिळवायला तसेच ती इतरांपर्यंत पोहोचवायला या दोघांनाही मनापासून आवडतं. एकंदरीतच रक्तदान आणि प्लेटलेटदानाशी खूपच बांधिलकी असलेलं हे घर. गणेश वडीलांसोबत पुण्यातच रहात असे. लहान वयातच मातृछत्र गमावलेला गणेश हा शारीरिकदृष्ट्या विशेष श्रेणीमध्ये मोडणारा होता. त्याच्यामध्ये जन्मत:च श्रवणदोष होता. त्याचा डावा कान अविकसित होता आणि उजव्या कानाला देखील श्रवणयंत्र लावावे लागत असे. त्यामुळे त्याच्या बोलण्यात काहीशी असहजता जाणवे. शिवाय दम्याचा विकार, फ़िट्स येणे असाही त्रास नियतीने त्याच्या नशिबी लिहिला होता. मात्र नियतीने गतीमंदत्व दिलेले असले तरी इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंतचे शिक्षण गणेशने पूर्ण केले होते. त्यामुळेच लेखन, वाचन आणि इंग्रजीमधून संभाषणही गणेश करु शकत असे. शिवाय त्याचे अक्षरही अतिशय सुंदर होते.
 
गणेश जेव्हा पहिल्यांदा रक्तपेढीत आला तेव्हा त्याचे वडील आणि आत्येभाऊ निलेश हे त्याच्यासोबत होते. शारीरिक विशेषतेमुळे आजवर चार लोकांप्रमाणे नोकरी करणे गणेशला शक्य झालेले नव्हते, परंतु घरातील वातावरणामुळे रक्तदान या विषयाशी गणेशचीही जवळीक निर्माण झाली होती. जनकल्याण रक्तपेढीबद्दल माहिती समजल्यापासून इथे कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत म्हणून आणि स्वत:चे समाधान म्हणूनही काही काम करता येईल का, असे औपचारिकपणे विचारण्यासाठी ही मंडळी आली होती. या पहिल्या भेटीत अर्थातच वरील सर्व गोष्टी मी समजावून घेतल्या आणि याबाबतचा निर्णय संचालकांशी बोलुनच घ्यावा असा विचार करुन तो शिल्लक ठेवला. यथावकाश गणेशचे कुटुंबीय आणि रक्तपेढी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांची एक भेट झाली. या भेटीत गणेशशी आमचा अधिक चांगला संवाद झाला. डॉ. कुलकर्णी यांनी कौशल्याने गणेशशी संवाद साधत त्याला नेमके काय काय आवडते, तो कशा प्रकारचे काम करु शकतो या बाबी नीटपणे समजावून घेतल्या. विशेष म्हणजे त्याच्या शारीरिक मर्यादा योग्य प्रकारे जाणून घेत आणि त्याची रक्तपेढीत काम करण्याची तीव्र इच्छाही लक्षात घेत डॉ. कुलकर्णी यांनी गणेशला रक्तपेढीत कामावर रुजू होण्यास सांगितले. खरं तर शारीरिकदृष्ट्य़ा विशेष श्रेणीमध्ये मोडणाऱ्या अशा कोणास कशा प्रकारचे काम द्यावे, त्यामुळे पुढे काही अडचणी तर उद्भवणार नाहीत ना वगैरे मूलभूत शंका माझ्यासारख्याच्या मनात स्वाभाविकपणे होत्याच. परंतु याबाबत डॉ. कुलकर्णींचा दृष्टिकोन अत्यंत प्रगल्भ होता हे आमच्या नंतर लक्षात आले. कारण गणेशला कशा प्रकारचे काम दिले गेले पाहिजे याबद्दल आम्हाला त्यांनी ज्या सूचना दिल्या, त्या खूप विचारपूर्वक दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेप्रमाणे गणेशला डेटा एंट्रीचं असं काम दिलं गेलं की जे झाल्यामुळे आम्हाला चांगली मदत होऊ शकेल आणि त्यात काही त्रुटी राहिल्यास फ़ारसे काही बिघडणारही नाही, शिवाय काम केल्याचं एक समाधानही त्याला मिळेल, असं हे काम होतं.
 
झालं, चौथ्या मजल्यावरील हॉलच्या एका कोपऱ्यात गणेशसाठी एका टेबल-खूर्चीची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला हाताने लिहिण्याचे काही काम आम्ही त्याला सांगितले आणि काही दिवसांतच एक संगणकही त्याच्या दिमतीला दिला. त्यामुळे स्वारी एकदम खूश होती. चार ते पाच तासांचं त्याचं काम होतं. जेवण करुन साडेअकरा-बाराच्या सुमाराला गणेशचे आगमन व्हायचे. माझा कक्ष शेजारीच असल्याने मी बहुधा यावेळी असायचोच. आल्या आल्या त्याला कॉफ़ी हवी असायची. मग तो माझ्यापाशी येऊन अगदी काकुळतीचा चेहरा करीत, ’सर, कॉफ़ी हवी होती. मिळेल ?’ असे विचारी. मावशींनी कॉफ़ी आणून दिली की तो आवर्जून ’थॅंक्स’ ही म्हणे. खाण्या-पिण्याच्या बाबतीत गणेश एकदम रसिक होता. साध्या कॉफ़ीवरही ’आज कॉफ़ी जरा फ़िकी होती’ किंवा ’थोडी साखर जास्त होती’ अशासारख्या प्रतिक्रिया सहजपणे त्याच्याकडून येत. तो स्वयंपाकही उत्तम करु शकतो हे नंतर आम्हाला समजले कारण आषाढी एकादशीला स्वहस्ते बनवलेली साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा कीस असे पदार्थ खास आमच्यासाठी तो घेऊन आला. त्यानंतरही काही प्रसंगी असेच वेगवेगळे पदार्थ तो आठवणीने घेऊन येई. फ़क्त घेऊनच येई असे नव्हे तर खाता खाता हे कसं बनवलं, त्यासाठी तयारी कशी केली वगैरे गोष्टी अगदी तपशीलवार त्याने आम्हाला ऐकवल्या. डेटा एंट्रीचे त्याला नेमून दिलेले काम करताना कितीही छोटी अडचण येवो, ती त्वरित विचारायला येणे आणि ती नीट समजून घेणे हा त्याचा स्वभाव होता. दिवसातून एक-दोनदा तरी त्याच्या ’सर, एक विचारायचं होतं’ या अतिशय मृदु आवाजातील प्रश्नाची मला चांगलीच सवय लागली होती. अशा सातत्याने विचारण्यामधून त्याने ’एक्सेल शीटची प्रिंट कशी काढायची’, ’शिवाजी फ़ॉंटचा की-बोर्ड कसा असतो’, ’फ़ाईल सेव्ह कशी करायची’, ’फ़ोल्डर कसे तयार करायचे’ अशी छोटी पण महत्वाची अशी अनेक कार्यालयीन कौशल्ये आत्मसात करुन घेतली होती. एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळाली की प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक यायची. त्याचे हे डोळे मला कायम आठवतात. कार्यालयीन कौशल्यांबरोबरच एखाद्या पावतीवरचे हस्ताक्षर समजले नाही तरी स्वारी तडक माझ्याकडे यायची. इथे अर्थात माझाही कस लागायचा. मग त्याचे हे ’हस्ताक्षरकोडे’ मी सोडवले की पुन्हा चेहेऱ्यावर एक विशिष्ट हास्य आणून तो पुन्हा आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचा. त्याची चहा-कॉफ़ीवरील टिप्पणी असो, कामातील अडचणींवर सातत्याने केलेली विचारणा असो किंवा खाद्यपदार्थ बनविण्याच्या रेसिपीबद्दल सांगितलेली माहिती असो या सर्वच प्रकारच्या संवादांमध्ये कमालीची निरागसता होती. त्यामुळे केवळ मीच नव्हे तर ज्यांचा ज्यांचा त्याच्याशी संबंध आला त्या सर्वांचीच त्याच्याशी चांगली जवळीक निर्माण झाली होती.
 
दुसरे एक म्हणजे, इथे काम करताना कुठलीही अपेक्षा नाही असं जरी त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं असलं तरी रक्तपेढीने मात्र त्याच्या कामाचा विचार करुन त्याचं एक मानधन निश्चित केलं. पहिल्या महिन्यानंतर त्याच्या मानधनाचा धनादेश जेव्हा आम्ही त्याच्याकडे सुपूर्त केला, तेव्हा त्याला झालेला आनंद केवळ अवर्णनीय होता. तो इतका खूश झाला की त्याला काय करावे तेच कळेना. त्यानेच नंतर सांगितल्यानुसार त्याच्या नावाचा हा आयुष्यातील पहिला धनादेश होता. आनंदाच्या भरात दुसऱ्या दिवशी तो चक्क किलोभर पेढे घेऊन आला आणि सर्वांना आपल्या पहिल्या कमाईबद्दल कौतुकाने सांगत त्याने पेढे खिलवले. आपल्या या मोठ्या आनंदात त्याने सर्वांना सहभागी करुन घेतलं. या कमाईवर त्याचा खरोखरीच अधिकार होता. कारण सुरुवातीला ’कामात काही त्रुटी राहिल्या तरी चालतील’ असा विचार जरी आम्ही केलेला असला तरी गणेशने त्याच्या कामात एकही त्रुटी ठेवली नाही. दिलेले काम अत्यंत चोख आणि वेळेच्या आधीच हा पठ्ठ्या पूर्ण करायचा. तो मूळातच कामसू वृत्तीचा होता. एखाद्या दिवशी काम कमी असले तरी लवकर घरी जाणे किंवा नुसते बसून राहणे त्याच्या जीवावर येई. या त्याच्या स्वभावामुळे त्याला आमच्या अर्थविभागानेही काही अधिक काम करण्याच्या हेतुने खास बोलावून घेतले होते. ’तिथले काम करायलाही मजा येते’ असे त्याने मला आवर्जून सांगितले होते. आपल्या दैनंदिन कामाबरोबरच रक्तदानाशी त्याची असलेली बांधिलकीही अनेक प्रसंगांतून आम्हाला दिसून येई. वर्तमानपत्रात यासंबंधीचे आलेले वृत्त तो आम्हाला हमखास आणून दाखवे. सोशल मिडियावरही याबद्दलच्या माहितीचे प्रसारण तो नेहमी करीत असे. स्वत:च्या व्यक्तिगत संपर्कातून त्याने एक नवीन ’प्लेटलेटदाता’ रक्तपेढीला अलिकडेच जोडला होता.
 
रक्तपेढीच्या कामातून त्याला मिळणारे समाधान त्याच्या देहबोलीतून व्यक्त झालेले आम्ही सर्वजण पाहत होतो. ’दिवाळीला चार दिवस छान सुट्ट्या घे’ असं मी त्याला सांगितलेलं असतानाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फ़राळाचे पदार्थ घेऊन हे महाशय रक्तपेढीत आले आणि मी सुट्टीवर असल्याने त्याने तिथूनच मला फ़ोन करुन त्याने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या सांगण्यावरुन ’तुमच्यासाठी पुन्हा एकदा लाडु-चिवडा घेऊन येईन’ असे आश्वासनही त्याने मला दिले होते. दुर्दैवाने हा फ़राळ मात्र मला कधीच मिळु शकला नाही. नियतीने दिलेला दमा त्याच्यासाठी जीवघेणा ठरला आणि अर्ध्या रात्रीतच सारा खेळ संपलासुद्धा. अचानकपणे झालेला हा चिरवियोग आम्हा सर्वांसाठीच अतिशय दु:खद आणि धक्कादायकही होता. ’आता या कामाच्या आधारावर मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे’ असेही त्याने आमच्यापैकी काहींना बोलुन दाखविले होते. याचा अर्थच इथल्या कामामुळे हळुहळु त्याचा आत्मविश्वास जागा होऊ लागला होता. पण दुर्दैव. नियती अगम्य असते हेच खरे. अर्थात दुसऱ्या बाजुला जनकल्याण रक्तपेढीत अखेरच्या दिवसांत त्याने केलेले काम त्याला एक प्रकारच्या कृतार्थतेची अनुभूती देऊन गेले ही मात्र निश्चितच समाधानाची बाब. हे समाधान तो जाताना घेऊन गेला. दैवाने दिलेले शारीरिक वेगळेपण त्याच्याकडे होते, हे खरेच. पण आपले प्रामाणिक काम आणि संवेदना या आधारावर त्याने अल्पावधीत आपले अव्दितीयत्वही सिद्ध केले हे नक्की. त्याच्या अचानक जाण्याने डॉक्टरांपासून मावश्यांपर्यंत सर्वच जण मनापासून हळहळले. त्याच्या चहा-कॉफ़ीची आणि स्वास्थ्याचीही मनापासून काळजी घेणाऱ्या सर्व मावश्या अत्यंत भावूक झालेल्या आम्ही यावेळी पाहिल्या.
 
त्याच्या अंत्यविधीनंतर माझ्याप्रमाणेच सुन्न झालेले आमचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आशुतोष काळे मला म्हणाले, ’त्याचा चेहेरा किती वेगळा दिसत होता, नाही ?’ यावर थोडा ट्रॅक बदलत मी इतकंच म्हणालो, ’डॉक्टर, तो खरोखर वेगळाच होता !’
- महेंद्र वाघ