वेदांमधले ज्ञान-विज्ञान - वारसा आजही उपयोगी की कालबाह्य? (भाग दुसरा)
 महा एमटीबी  08-Dec-2017

 
 
मागील भागात संस्कृतचे भाषा म्हणूनच नव्हे तर शास्त्रीय दृष्टीकोनातून ज्ञान नसल्यामुळे आपल्याकडील विविध ग्रंथांमधील ज्ञान आत्मसात करण्यात येणार्‍या अडचणींचा उल्लेख केला होता.
 
 
वेदकाळाच्या कितीतरी नंतर म्हणजे काही शतकांपूर्वीचे काही दावे आपण सर्रास ऐकत असतो. त्यातले दोन म्हणजे शास्त्रीय संगीतावर आधारित विशिष्ट रागांच्या आळवणीने दिवे लागणे आणि पाऊस पडणे. दिवा पेटण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते अशी सर्वमान्यता आहे. त्या तीन गोष्टी म्हणजे प्राणवायुची उपलब्धता, अग्नीचा स्त्रोत आणि ज्वलनशील पदार्थ हजर असणे. याखेरीज ऑटोइग्निशन तापमान असेल तर अग्नीच्या स्रोताची आवश्यकता रहात नाही. आता गायनामधून विशिष्ट प्रकारच्या लहरी निर्माण होत असतील असे म्हटले तरी त्यातून या तीन घटकांपैकी अग्नीचा स्रोत निर्माण होणे कसे शक्य आहे; किंबहुना शक्य आहे का? तीच गोष्ट विशिष्ट गायनामुळे पाऊस पडणे सुरू होण्याची. पाऊस पडण्यासाठी पोषक स्थिती कशामुळे तयार होते याचे आता बर्‍यापैकी उत्तम ज्ञान उपलब्ध आहे. तेव्हा गायनामुळे त्यातील नक्की काय घडत असावे?
 
 
दुसरीकडे अरूंधती आणि वसिष्ठ तारे बरोबरीने एकमेकाभोवती फिरतात, एरवी एक तारा दुसर्‍या तार्‍याभोवती फिरतो या नेहमीच्या सिद्धांतापेक्षा वेगळे आहेत हे त्यावेळी उपलब्ध असलेल्या की खरे म्हणजे नसलेल्या साधनांनी दाखवून देणे हे विलक्षण होते. खगोलशास्त्रातील एकूणच प्रगती थक्क करणारी होती.
 
 
संगीताच्याबाबतीत केलेल्या काही दाव्यांचा वर उल्लेख केला आहे. मात्र प्रत्यक्षात जाणतेपणी किंवा अजाणतेपणी ध्वनीशास्त्र म्हणून केलेली प्रगती निव्वळ दैदीप्यमान अशीच होती. वाद्याच्या ‘डिझाइन’मागचे शास्त्र हे शास्त्र या स्वरूपात कदाचित स्पष्ट झाले नसेल; मात्र वाद्यनिर्मिती करणार्‍यांना त्यामागचे तंत्र चांगले आत्मसात झाले होते असे दिसते. या संगीताचे स्वरूप केवळ कर्णमधूर असण्यापुरते किंवा मनोरंजनापुरते असे न राहता त्यातून रागचिकित्सा हे मानसिक व शारीरिक व्याधींवर उपाय करण्याचे तंत्र विकसित झाले. त्याचा मानवी मनावर व शरीरावर परिणाम होण्याबरोबरच काही जणांनी वनस्पतींवर होणार्‍या सकारात्मक परिणामांचे निष्कर्ष मांडल्याचे दिसते.
 
 
आयुर्वेद हा तर मोठाच व्यापक विषय. मानवी शरीराची रचना एवढी गुंतागुंतीची असताना केवळ कफ, वात आणि पित्त या त्रिदोषांच्या (यातही दोष या शब्दाचा प्रचलित अर्थ अभिप्रेत नाही) आधारांवरच रूग्णाच्या आजाराचे निदान कसे करता येईल, असा प्रश्न विचारत इतक्या जुन्या ज्ञानाची खिल्ली उडवण्यात काहीजण धन्यता मानतात. मात्र थोडेसे जरी आत डोकावून पाहिले तर या त्रिदोषांबरोबरच विविध धातुंची संकल्पना (मेटल नव्हे) वगैरे समजून घेतण्याची इच्छा असेल तर आपल्या समजुतीत निश्चितपणे फरक पडू शकतो. मुळात त्रिदोषांची संकल्पना निसर्गालाही लागू होते आणि ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ या न्यायाने तीच संकल्पना मानवी शरीरालाही लागू होते हा विचारच फार उत्तुंग आहे. यातील पित्त, वात आणि कफ यांचे आपल्याला ठाऊक असलेले अर्थ या त्रिदोषांना लागू होत नाहीत याचीही बहुतेकांना कल्पना नसते. आयुर्वेदावर नेहमी केला जाणारा आरोप म्हणजे औषधांच्या उपयुक्ततेबाबत पुरेशी पारदर्शकता न बाळगणे. त्यातही अनेक रुग्णांना एकच व्याधी किंवा आजार असेल तर त्यांच्यावरील उपचारांची पडताळणी एकाच पद्धतीने न करता येणे. यावर तज्ज्ञांचे म्हणणे असे की वरवर दिसणारी लक्षणे किंवा अगदी रक्त-लघवी तपासणीतून आलेले निष्कर्ष हे अगदी एकसारखे नसतात आणि त्यामुळे उपचारही एकसारखे असावेत अशी अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे.
 
 
दुसरीकडे गोमुत्राचे उदाहरण तर काही जणांच्या जिव्हाळ्याचे तर काही टिंगलखोरांचे आवडते असे आहे. टिंगलखोरांचा आक्षेप मुख्यत: दुसर्‍या प्राण्यांचे उत्सर्जन मानवाने प्राशन करणे यावर असतो, तर याचे दुसरे टोक म्हणजे गायच का, दुसर्‍या प्राण्यांचे मल-मूत्र प्राशन का केले जात नाही हा प्रश्न. अर्थात हे आक्षेप फार उथळ असल्यामुळे त्यांना काडीची किंमत देण्याचे कारण नाही. कारण यांच्यापैकी काही जण दुसर्‍या प्राण्यांचे उत्सर्जनच काय तर तो प्राण्याचेच भक्षण करणारे असू शकतात आणि उद्या गायीप्रमाणे गाढवाचे मूत्रही काही उपचारपद्धतीमध्ये प्रभावी असते असे दाखवले गेले तर जणू हे लोक निमूटपणे ते प्राशन करणार असतात. म्हणून अशांकडे दुर्लक्ष करणेच योग्य. मात्र दुसरीकडे गोमुत्राचा प्रचार करणार्‍यांपैकी काहींचा अभिनिवेश पाहण्यासारखा असतो. माझ्या पाहण्यात आलेले एक उदाहरण म्हणजे अन्ननलिकेचा कर्करोग झालेल्या रूग्णावर गोमुत्राचे उपचार केले गेल्यावर त्याला गिळणे शक्य झाले एवढेच नाही तर तो कर्करोगापासूनही खडखडीत बरा झाला असा दावा. हा दावा करताना त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर खरोखर कृतकृत्य झाल्याचा भाव होता. मात्र मी एका प्रश्नाने त्यांना चांगलेच नाराज केले. एवढे महत्त्वाचे संशोधन आहे असे वाटते, तर हे संशोधन एखाद्या वैद्यकीय नियतकालिकाकडे पाठवले आहे का? रस्त्याच्या कडेला बसून जडीबूटी विकणारे मूळव्याधीपासून कर्करोगापर्यंत जगातले सगळेच रोग बरे करण्याचे दावे करतात, तसेच सदर संशोधकाला करायचे आहे की या संशोधनाला मान्यता मिळवून घ्यायची आहे? विविध वैद्यकीय परिषदांना हजर राहणारा माझा प्रख्यात सर्जन मित्रही सांगतो की वैद्यकशास्त्राशी फारसा संबंध नसलेल्यांच्या दाव्यातील अभिनिवेश बाजूला ठेवत ते काय सांगत आहेत हे पहायचे ठरवले तरी फारसे हाती लागत नाही. तेव्हा खरे तर इतक्या प्राचीन ज्ञानाची अशी हेळसांड होण्याचा दोष आपलाच आहे. आता केन्द्र सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमून याचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरवले आहे, त्यातून काहीतरी निश्चित असे बाहेर यावे म्हणजे झाले. मात्र गोमुत्राचा संबंध एका जातीशी व एका विचारधारेशी जोडणारे खरोखर धन्य आहेत. हा विषयही इतर विषयांप्रमाणे आपल्याकडील वारशाचाच भाग आहे हे समजून घेण्याची त्यांची इच्छा नसते.
 
 
आमचे पूर्वज किती महान होते हे दाखवण्यासाठी काहीजण कसे दुसरे टोक गाठू पाहतात याचे अगदी अलीकडचे सोशल मेडियातील उदाहरण. आपल्याकडे पुजेमध्ये धूप वापरला जातो. उदबत्ती वापरण्याची पद्धत पर्शियातून आली. उदबत्तीत बांबूची काडी वापरलेली असते. बांबूमध्ये भरपूर प्रमाणात शिसे असते. उदबत्ती जळताना हे शिसे आपल्या शरीरात प्रवेश करते व त्यामुळे घातक आजार होऊ शकतात, वगैरे. तेव्हा अशा घातक उदबत्तीऐवजी आपल्याकडे धूप वापरला जाई म्हणजे आपले पूर्वज किती थोर असा त्या पोस्टचा सूर होता. शिवाय बांबू जाळला तर पितृदोष लागू होतो वगैरे दावे. मुळात बाबूमध्ये शिसे साठवण्याची क्षमता असते म्हणजे काय? मुळात हे शिसे येणार कोठून? तर पर्यावरणातील प्रदुषकांपासून. बाबू कोठे वाढवला जातो त्याप्रमाणे त्यात अशी प्रदुषके किती असतात हे ठरेल. उदा. गडचिरोलीच्या जंगलांमध्ये बांबूंचे प्रचंड उत्पादन होते. तेथील पाण्यात-मातीत अशी प्रदुषके येतील का? शिसे वापरले जाणारे रंगासारख्या घटकांचा वापर फारच कमी झालेला आहे. शिवाय हे शिसे इतक्या कमी प्रमाणात असते आणि ते वायुरूपात नसल्यामुळे त्याचा शरीरावर काही विपरित परिणाम होईल हे संभवत नाही. तेव्हा आपले पूर्वज थोर ठरवण्यासाठी असे कचकड्याचे उपद्व्याप कोण करत असते कोणास ठाऊक. शिवाय पितृदोष लागण्याची भीती.
 
 
मानवी शरीरातील सहस्रचक्र, अनाहत चक्र आणि मूलाधार चक्र यासारख्या विविध चक्रांबद्दलची उत्सुकता आता कोठे वाढीला लागली आहे. प्राणायामाची लोकप्रियता वाढल्यामुळे हे होत आहे. एरवी अशी चक्रे अस्तित्वात असती तर क्ष-किरण किंवा इतर स्कॅनिंगपद्धतीमध्ये ‘दिसली’ नसती का असा उथळ प्रश्न विचारत त्याची टिंगल करणारेच अधिक असतात. आता कोरियातील एका संशोधनामधून अशी चक्रे अस्तित्वात असल्याला बळकटी मिळालेली आहे. त्यांनी तर याहीपुढे जात या चक्रांचा डीएनएशी संबंध असल्याचे सूचित केले आहे. थोड्या फार फरकाने भारत, तिबेट, चीन, थायलंड या प्रदेशांमध्ये या चक्रांच्या अस्तित्वाबद्दल काही हजार वर्षांपासून सांगितले गेलेले आहे. एकीकडे आपल्याकडे याबाबत अनास्था दिसते तर दुसरीकडे रशियातील काही जणांनी शरीरातील चक्रांची स्थिती दर्शवणारे एक यंत्रच बनवलेले आहे. नाडीतरंगिणी नावाचे नाडीपरीक्षेचा अहवालच बनवून देणारे यंत्रही बाजारात उपलब्ध आहे. मुळात चक्रे आहेत की नाही याबाबतच शंका असेल तर ती कशी ओळखावीत, त्यात कोणते दोष निर्माण झाले आहेत याचे निदान कसे करावे आणि त्याहीपुढे जाऊन या दोषांचे निवारण कसे करावे याबाबतची व्यवस्था निर्माण करणे किती कष्टप्रद आहे याची कल्पना यावी. अशी स्थिती असताना यावरची यंत्रे बनवून बाजारात विकणारे या विषयाच्या विश्वासार्हतेचे काय करत असतील याचा अंदाज बांधलेला बरा.
 
 
उर्जा व वस्तुमान एकमेकांमध्ये रूपांतरीत होतात हे सर्वसामान्यपणे सांगितले जाते. सैद्धांतिक पातळीवरील याचे गीतेत असलेले दाखले दिले जातात. मात्र निव्वळ उर्जेपासून वस्तुमान बनताना निश्चितपणे कोणते मूलद्रव्य बनते याचे काही उत्तर उपलब्ध झालेले नाही. अगदी अलीकडे शोध लागलेल्या न्युट्रॉन तार्‍यांच्या धडकेतून जड मूलद्रव्ये बनल्याचे उदाहरण समोर आले आहे. त्यातून या प्रश्नाची उकल होईल की कसे हे भविष्यात स्पष्ट होईल.
 
 
भारताने जगाला ‘शून्य’ या संकल्पनेची देणगी दिली हे तर सर्वमान्य आहे. मात्र संख्यामापनच नव्हे तर एकूणच भारतीय मापनपद्धती केवढी प्रगत होती याबद्दल सर्वसाधारणपणे अनभिज्ञता आहे. हडप्पा-धोलाविरा-लोथल येथील रस्त्यांची वा इतर मापे ज्या अंगुला-वितस्ती पद्धतीच्या आधारावर घेतलेली दिसतात अगदी त्याच आधारावर ताजमहाल व आणखी कितीतरी ऐतिहासिक वास्तुंची मापे घेतलेली असल्याचे काही अभ्यासांमधून स्पष्ट झालेले आहे.
 
 
अगोरा नावाच्या चित्रपटात अलेक्झांड्रियामध्ये मुळच्या पेगन संस्कृतीचे ज्यू – ख्रिस्ती संक्रमण कसे झाले हे फार प्रभावीपणे दाखवलेले आहे. धर्माच्या नावाखाली वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भयंकर कपट-कारस्थाने केली गेली. आपल्याकडे आक्रमकांनी नालंदामधील समृद्ध ग्रंथालय जाळले, त्याचप्रमाणे अलेक्झांड्रियाचे ग्रंथालय ख्रिस्ती आक्रमकांनी जाळले. या चित्रपटाची तत्वज्ञ आणि गणितज्ज्ञ असलेली नायिका संशोधक वृत्तीची असते. पृथ्वी सपाट की गोल आहे, सपाट असेल तर खालचे लोक पडत का नाहीत, पृथ्वी सुर्याभोवती फिरते तर सुर्यापासूनचे अंतर कमी जास्त का होते, याचा अर्थ सुर्याभोवती फिरता फिरता पृथ्वीची आणखी एका काल्पनिक केन्द्रबिंदूभोवती फिरण्याची कक्षा आहे का, असे प्रश्न पडण्याचे ते दिवस. एलिप्टिकल कक्षेची कल्पना सुचण्यासाठी तिला किती कष्ट पडतात वगैरे त्यात फार सुंदर पद्धतीने दाखवलेले आहे. पृथ्वी गोल आहे की सपाट, वर म्हटल्याप्रमाणे एलिप्टिकल कक्षा अशा गोष्टी आज आपल्यासाठी अगदी सहजसोप्या वाटतात. मात्र अशा छोट्या छोट्या गोष्टी समजण्यासाठी किती वेळ, उर्जा, ज्ञान खर्च झाले असेल हा दृष्टीकोन लक्षात घेतला की त्याबद्दला आदर वाढण्यास मदत होते.
 
 
तेव्हा असे ज्ञान पडताळून पाहण्यासाठी स्वत: काहीही कष्ट न घेता सवंगपणाने त्याची कुचेष्टा करायची की याच ज्ञानातून भल्याभल्यांनी प्रेरणा घेतलेली आहे याची जाणीव ठेवून किमान आदर तरी बाळगावा हे ज्याचे त्याने ठरवावे.
 
 
या समृद्ध वारशाची आजच्या संदर्भातील दुसरी बाजूदेखील सांगायला हवी. एक म्हणजे अंधश्रद्धांचा व कर्मकांडांचा बाजार आणि सामाजिक कोन. शास्त्रांमध्ये सांगितले आहे या सबबीखाली आजही चालू असलेल्या अनेक अनिष्ट प्रथा आपण अगदी रोजच्या जीवनात पहात असतो. अनेकदा मूळ हेतु बाजूला राहून भलतेच समज दृढ होत जातात. त्यांचे रूपांतर कर्मकांडांमध्ये होते, एक प्रकारच्या भीतीमध्ये होते. त्यांचा बागुलबुवा केला जातो. ज्यांना हे प्रकार मान्य नसतात, त्यांच्या लेखी सारे वैदिक ज्ञान जणू याबाबतीतलेच असते आणि म्हणून ते त्यापासून दूर राहू इच्छितात. गंमत म्हणजे जे या प्रकारांमध्ये गुरफटलेले असतात त्यांच्यालेखीही हे सारे ज्ञान जणू याबाबतीतलेच असते आणि त्यांना मात्र या प्रथांचे अनुकरण करण्यात एक प्रकारचे समाधान वाटत असते. सामाजिक कोनाबद्दल बोलायचे तर वेदकाळामध्येच जातीव्यवस्था बनवली गेली आणि त्यातूनच सामाजिक भेदभाव निर्माण झाला. त्यामुळे त्यापैकी ‘खालच्या’ जातीतील लोकांना जणू या वारशाशी काही घेणेदेणे असायलाच नको. मात्र वर्ण आणि आजची जातीव्यवस्था यातला फरक आता कोठे सांगण्यास सुरूवात झाली आहे. अगदी ऋग्वेदातील पुरूषसुक्तामधील वाद्गरस्त समजले जाणारे वर्णनही मूळ संहितेशी मेळ खाणारे नाही व ते नंतर घुसडले गेले असावे असे आता समजले जाऊ लागले आहे. मात्र सध्या ज्या पद्धतीने सामाजिक वातावरण बिघडवण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते पाहता वैदिक ज्ञान समाजाभिमुख बनणे हे मोठेच अवघड काम दिसते. मात्र या लेखांचा त्यावर सविस्तार भाष्य करण्याचा उद्देश नाही.
 
 
पुढच्या व अंतिम भागामध्ये स्वत:हून मेहनत घेत या ज्ञानाचा उपयोग करणार्‍या काही पाश्चिमात्य शास्त्रज्ञांबद्दल आणि विचारवंतांबद्दल माहिती घेऊया.
 
 
- राजेश कुलकर्णी