विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ४७
 महा एमटीबी  07-Dec-2017

 
 
अवंती : मेधाकाकू... आता मला वाटायला लागलंय की, आपल्या शाळेतल्या मोठ्या फळ्यावर जसे सुविचार लिहिले जातात तशाच ह्या म्हणी, वाकप्रचार, त्याच्या अर्थासह रोज एक प्रमाणे लिहायचे. कशी वाटतीये कल्पना ? आपल्या मातृभाषेची तत्कालीन मराठी बोलीभाषेची ऐट खूप छान आहे. ते सगळ्यांना समजायला हवे असे वाटते मला.!!
मेधाकाकू : अरे व्वा... अवंती, झक्कास आहे तुझी कल्पना. आपण मुख्याध्यापक बाईंशी नक्की बोलूयाच या विषयी. अवंती, या लोकश्रुतींचे विश्लेषण आता आपल्याला करायचे आहे. आपल्या देशात फार प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या या लोकश्रुती, लोकोक्ती, लोकसंबोधने, लोकसाहित्य हे फार मोठ्या पायावर रचले गेले आहे. याचा पाया तीन खांबी आहे आणि ‘भारतीय प्राचीन संस्कृती’ या नावाने आज आपण त्याचा सतत उल्लेख करत असतो. याचे तीन खांब आहेत. विज्ञान, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान. आज आपण यातल्या विज्ञाननिष्ठ पैलूचा अभ्यास करूया. आपल्या जीवनपद्धती; सर्व वयोगटातील-सर्व आर्थिक स्थरातील समाजातील व्यक्तींचे स्वभावविशेष, गुण दोष या बरोबरच प्राणी, पक्षी, अवजारे, हत्यारे, यांचा वापर आणि त्यातील तुलनात्मक वैशिष्ट्ये, पाप-पुण्याच्या संकल्पना या सर्वांचा योग्य अभ्यासपूर्ण संदर्भ या लोकश्रुतीच्या अभ्यासात आपल्याला पाहायला मिळतोय. आज यात उल्लेख असणाऱ्या सगळ्या प्रवृत्तींची नोंद, आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी केलेली आपल्याला दिसते. हाच तो विज्ञानाचा पहिला खांब.
अवंती : आहा... मेधाकाकू, तू किती आश्वासक असे काही सांगितलेस आज. पाश्चात्य संस्कृतीतील सगळे खरे, आपले ते मागासलेले असा भ्रम समाजमनात आजपर्यंत निर्माण केला गेला आहे. इतके दिवस मी सुद्धा त्याच दडपणाखाली त्याच भ्रमात होते.
 
मेधाकाकू : अरेच्या... असे आहे का... बरं...!! आता आपल्या लोकसाहित्यात किती निश्चित आणि सकारात्मक विचार मांडले गेले ते बघूया आपण. यात स्थिर बुद्धीने दिलेला अचूक सल्ला आणि सावधगिरीचा ईशारा काही शतके आपल्याला साक्षर करतो आहे.
सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊ नये कोन.
मेधाकाकू : किती सहज आणि समजायला सोपा आहे हा वाकप्रचार. ‘सोन्याचा द्यावा होन’ हे उपमेय आणि ‘घराचा देऊ नये कोन’ हे उपमान याचा मथितार्थ इतकाच की, किमती वस्तूंचे व्यवहार करतांना दूरदृष्टी असावी. फुटकळ भाडे देणारे भाडेकरू आज भाड्याचे घर सोडायला नकार देतात, घर सोडण्यासाठी पैशाची अपेक्षा करतात, अशावेळी हा वाकप्रचार आठवतो, पण तो पर्यंत उशीर झालेला असतो.
 
अवंती : आहा... मेधाकाकू. मस्त वाटतंय. खूप उर्जा आणि खूप उर्मी.!!
मेधाकाकू : आता हा दुसरा अचूक सल्ला. स्थीर बुद्धीने, सकारात्मक विचार करायला शिकवणारा.!
 
कवडीपासून कमवावे लाखांपासून खर्चावे.
मेधाकाकू : अवंती... इतका अनपेक्षित विचार दोनशे वर्षांपासून आपल्या समाजात रुजलेला आहे. विचार असा आहे की, खर्च करा, अगदी लाखात खर्च करा अजिबात काळजी करू नका. मात्र कमाई सुद्धा अशी करा आणि बचत सुद्धा निश्चयाने-निगुतीने करा म्हणजे कमाई करताना मेहनत-श्रम करायला मागे-पुढे पाहू नका. जितका खर्च करायचाय त्याच्या दुपटीने पैसे कमवायला शिका. बघ आपला समाज किती सकारात्मक विचार घेऊन पुढे निघालाय. तरुण पिढीला आश्वासक असा अचूक सल्ला.
 
अवंती : आहा... मेधाकाकू... किती स्वच्छ आणि स्पष्ट दृष्टीकोन आहे हा. आपल्या समाजाचा. आम्हा मुलांना फक्त पुढे निघा. यश तुमची वाट पहातंय. असा निश्चयी सल्ला...!!
 
मेधाकाकू : असाच निश्चयी सल्ला...
सोन्यासाठी चिंधीची गरज.
 
मेधाकाकू : हो हा निश्चयी सल्ला. पुढे जाऊन असे सांगतोय ती जी काही श्रम-मेहनत करायची आहे ना तुम्हाला, त्यासाठी कुठलेही काम कमी समजू नका. प्रत्येक कारागिराला सन्मान द्या, त्याच्या कामाप्रती सन्मान ठेवा, त्याच्या बाह्य रूपावर काही समज करून घेऊ नका. अगदी शून्यातून सुरुवात करायची तयारी ठेवा. यासाठी वापरलेले एक रूपक ‘चिंधी’, याला असा खूप व्यापक अर्थ आहे आणि ‘सोने’ म्हणजे अर्थातच आपल्याला भविष्यात मिळणारे यश निश्चित आहे !!
 
अवंती : आहा... आहा... मेधाकाकू.. जबरदस्त उर्जा मिळालीये आज. एकदम ‘अवाक’ केलायस तू आणि नवा अभिमान मिळालाय माझ्या समाजाप्रती या सर्वासाठी.
 
मेधाकाकू : वर सांगितलेल्या याच विचारला, हा वाकप्रचार कसा आणिक पुढे घेऊन जातो आहे बघ. कुठलेह काम कमी समजू नये. कवडी पासून कमवावे. इतकी सहज मांडणी...!!
सोन्यारुप्याचा वारा आणि खुर्द्याचा भारा.
मेधाकाकू : मोठे काम मिळाले की, कमाई मोठीच होणार हे निश्चित आहे, अगदी सोन्यारुप्याचा वाराच घेता येणार जणू, हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र ते मिळण्यासाठी वाट पाहू नका. कवडी पासून म्हणजे छोट्या-छोट्या कामापासून सुरु करा. सोन्याचा एक तुकडा मिळण्यापेक्षा, खुर्द्याचा म्हणजे सुट्या नाण्यांचा भारा जमा व्हांयला लागेल. सोन्या रुप्याचा तुकडा म्हणजे एकाच मोठे काम आणि भाराभर खुर्दा म्हणजे खूपसारी छोटी छोटी. हे दोन्ही एकाच मोलाचे आहेत हे लक्षात ठेवा. पुन्हा एक निश्चित आणि सकारात्मक विश्वास.
अवंती : व्वा... मेधाकाकू... इतके छान काही मिळालाय आज. कधीच विसरणार नाही हा अभ्यास.!!
- अरुण फडके