नाशिक पंचांगाचे पाचवे वर्ष
 महा एमटीबी  07-Dec-2017

 
भविष्यकथन किंवा ज्योतिष हे प्राचीन भारतीय शास्त्र. कथित आधुनिक विचारसरणीचे लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत. मात्र, समाजाचा खूप मोठा वर्ग असा आहे जो कोणत्याही निमित्ताने ज्योतिष पाहतोच. विशेषतः धार्मिक सण, कुलधर्म, कुलाचार, विवाह, मुंज, निधन याप्रसंगी वेळ पाहिली जाते. वेळ शुभ की अशुभ हे पाहिले जाते. त्यावरच पुढील निर्णय घेतला जातो. ज्योतिषशास्त्र पूर्णपणे वेळेवर अवलंबून आहे. वेळ-काळ ठरविताना पंचांगाचे महत्त्व मोठे आहे. पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग ही पंचांगे सांगितली आहेत. आपली तिथी संकल्पना खूप छान आहे. एखाद्या महिन्याची एखादी तारीख सांगितली तर त्यामुळे एकूण वातावरण किंवा सूर्य-चंद्र स्थिती स्पष्ट होत नाही. मात्र, तिथी सांगितली की चंद्राची स्थिती काय असेल ते लगेच समजते. पौर्णिमेला पूर्ण चंद्र आणि अमावास्येला अंधार आणि प्रतिपदा ते चतुर्दशी अशा तिथीनुसार शुक्ल की कृष्ण यावर चंद्रस्थिती लगेच लक्षात येऊ शकते. त्याप्रमाणेच पंचांगातील अन्य बाबी विचारात घेतल्या तर त्यावरून त्या तिथीचे चांगले ज्ञान होते. समुद्रात भरती-ओहोटीदेखील तिथीवरून सांगता येते. पूर्वी तर स्थापत्यदेखील काळवेळ पाहून केले जात होते. त्यामुळे इमारत दीर्घकालीन टिकू शकत असत. शिवकालीन इतिहासातदेखील विशेषतः समुद्री किल्ल्याच्या बांधकामात याचे संदर्भ मिळतात. सामान्य ज्योतिष पाहणार्‍यालादेखील एखादे पंचांग तयार करावे, अशी इच्छा असते. त्यामुळे पंचांगकर्ते असे बिरूद तो मिरवू शकतो.
 
 
महाराष्ट्रात सोलापूरकर दाते, टिळक, सोमण असे पंचांगकर्ते प्रसिद्ध असले तरी एकूण प्रमाण कमीच आहे. नाशिकमधील ३४ वर्षीय युवक हर्षद रमेश महाजन यांनी पाच वर्षांपूर्वी नाशिक पंचांग तयार करण्याचा विडा उचलला आणि आता हे पंचांगाचे पाचवे वर्ष आहे. पंचांग तयार करणे म्हणजे आकडेवारी, गणिताचा भाग, विविध माहिती एकत्र करणे असे किचकट काम. तसेच पंचांग तयार केल्यानंतर ते बाजारात आणणे आणि प्रस्थापित करणे हे आणखी वेगळे काम आहे. मात्र महाजन यांनी कष्टाने ते साध्य केले आहे. आई प्रतिभा महाजन यांचा आशीर्वाद आणि नाशिकचे पुरोहित, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि अनेकांच्या सहकार्यातून त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. नाशिक पंचांगाचे यंदा पाचवे वर्ष आहे. हर्षद यांचे महाजन कुटुंब मूळचे नाशिकजवळील जानोरी (तालुका दिंडोरी) येथील राहणारे. घरात ज्योतिष वारसा काहीच नाही. त्यांच्या मातोश्री सिन्नर येथील राममंदिराचे विश्वस्त सबनीस यांच्या घराण्यातील. त्यांनी बी. कॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ज्योतिष शिक्षण मुंबईत घेतले. पंचांगाशी संबंधित धर्मसिंधू, निर्णयसिंधू असे अनेक ग्रंथ अभ्यासून पंचांग विचार केला. नाशिकमधून सुमारे ७० वर्षांपूर्वी दत्तात्रय गायधनी, रहाळकर यांनी पंचांग तयार केले होते. आता या गोष्टीला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. महाजन यांनी आधी पॉकेट साईझ पंचांग काढले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पूर्ण मोठे पंचांग तयार करण्याचे ठरविले. त्याला विविध समाजघटकांतून साहाय्य मिळाले. यंदादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. वापरण्यास सोपे, समजायला सोपे, बारकावे यथास्थित, यावेळी प्रथमच बाळाचे नाव काढताना नक्षत्राजवळ अक्षर देत आहोत, यज्ञविधीसाठी अग्नीचा दिवस दिले आहेत. त्यामुळे सोयीस्कर होणार आहे. मुंबई, पुणे येथील विविध गावी जाते. परदेशातदेखील मागणी आहे. नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. पूर्वीपासून येथे वेद, ज्योतिष, याज्ञिकी परंपरा आहे. ही परंपरा जोपासून त्यात नवी भर घालण्याचे काम महाजन करीत आहेत. त्यांनी सातत्य कायम टिकवावे आणि या क्षेत्रात नाशिकचे नाव आणखी वृद्धिंगत करावे, अशीच नाशिककर नागरिकांची अपेक्षा आहे.
- पद्माकर देशपांडे