भारतीय लष्कराचा सन्मान
 महा एमटीबी  07-Dec-2017

मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि दिल्लीतील ‘इंडिया गेट’ या दोन्हीही ऐतिहासिक वास्तू आणि सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणारी ठिकाणे. पण या दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे, त्यांचा इतिहास वेगवेगळा आहे. तो इतिहास नेमका काय?, ही नावे का, कशी पडली?
 
ईसाहब, ’इंडिया गेट’ के लिये कौनसा रास्ता ?’’ मुंबईच्या हुतात्मा चौक किंवा फ्लोरा फाऊंटन भागात एक इसम मला विचारत होता. त्याच्याबरोबर आणखी पुरुष, बायका-मुलं अशी आठ- दहा माणसं होती. मंडळी नक्कीच मुंबई दर्शन करायला निघालेली. बाहेरची पाहुणे मंडळी होती. मला थोडी थट्टा करायची लहर आली. ’’इंडिया गेट वह तो दिल्ली मे है,’’ मी म्हटलं. तो माणूस एकदम इतका गोंधळला की, आता काय बोलावं हेच त्याला सुधरेना. मग मात्र मी त्याला नीट समजावत म्हटलं, ’’देखो इंडिया गेट दिल्ली मे है, यहॉं मुंबई मे गेट वे ऑफ इंडिया है.’’ आम्ही दोघेही हसलो आणि आपापल्या मार्गाला लागलो.
 
’इंडिया गेट’ आणि ’गेट वे ऑफ इंडिया’ काय फरक आहे दोघांच्यात? मुंबईच्या दक्षिणेला पालू बंदर किंवा अपोलो बंदर नावाचं जहाजांचं स्थानक होतं. १९११ साली तिथून ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताच्या भूमीवर पाय ठेवला. त्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी इंग्रज सरकारने एक भव्य कमान बांधली. त्यानंतर भारताचा प्रत्येक नवा व्हॉईसरॉय किंवा तत्कालीन मुंबई इलाख्याचा प्रत्येक नवा गव्हर्नर त्या कमानीतून भारतात प्रवेश करायचा. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर, २८ फेब्रुवारी १९४८ या दिवशी ब्रिटिश सैन्यातील शेवटची तुकडी सॉमरसेट लाईट इन्फन्ट्रीही याच कमानीतून बाहेर पडली. आज हे ठिकाण मुंबईकरांचं आणि देशी परदेशी पर्यटकांचं लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
 
परंतु दिल्लीच्या राजपथावरचं ’इंडिया गेट’ हे वेगळं प्रकरण आहे. ते नुसतंच पर्यटनस्थळ नाही तर भारतीय सैनिकांच्या शौर्याचं, बलिदानाचं स्मरणस्थळ आहे. अगदी काटेकोरपणे पाहिलं, तर हे बलिदान केलेले सैनिक भारतीय असले तरी भारतासाठी लढले नव्हते. ते ब्रिटिश धन्यासाठी, ब्रिटिशांच्या शत्रूंविरुद्ध लढत होते. म्हणजे समजा, औरंगजेबाने त्याच्या बाजूने काबूल कंदाहारच्या बंडखोर पठाणांविरुद्ध लढणार्‍या नि ठार झालेल्या राजपूत सैनिकांसाठी असं एखादं स्मारक-बिरक उभारलं असतं तर कसं वाटलं असतं? अगदी तसंच हे मुळात आहे. आता औरंगजेबाने कधीच इतकी कृतज्ञता दाखवली नाही, हा भाग वेगळा पण इंग्रजांनी दाखवली. १९१४ ते १९१८ या कालखंडात झालेल्या पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी १० लाख ५० हजार भारतीय सैनिक उतरवले होते. हे युद्ध मुख्यतः ब्रिटन-फान्स विरुद्ध जर्मनी-तुर्कस्थान यांच्यात झालं. त्यात जगभराच्या विविध रणभूमींवर किमान ७५ हजार भारतीय सैनिक ठार झाले. जुलै १९१४ ते नोव्हेंबर १९१८ असं चाललेलं हे पहिलं महायुद्ध संपतंय न् संपतंय तोच इकडे भारत-अफगाणिस्तान सीमेवर युद्ध भडकलं. ३ मे १९१९ रोजी अफगाण सैनिकांनी भारतीय सरहद्दीत घुसून ’बाग’ हे मोक्याचं ठाणं जिंकलं. यातून जे युद्ध भडकलं ते ऑगस्ट १९१९ पर्यंत चाललं. त्याला ’तिसरं इंग्रज-अफगाण युद्ध’ असं म्हटलं जातं. यात हजार-दीड हजार भारतीय सैनिक ठार वा निकामी झाले, म्हणजेच हे सैनिकही आपल्या मातृभूमीसाठी लढत नव्हते. काटेकोरपणे पाहता ते भाडोत्री, पोटार्थी सैनिक होते. पोटाला घालणार्‍या धन्यासाठी लढत होतेे. इंग्रजीत त्यांना ’मर्सिनरी’ असा शब्द आहे. तो शिवीप्रमाणचे वापरला जातो. त्यांना निष्ठा बिष्ठा नसते. जो धनी जास्त पगार देईल, त्याच्यासाठी तलवार गाजवायची एवढंच त्यांना माहिती असतं. त्यांचं एकंदर वागणंही तसंच म्हणजे लुटारूसारखं असतं.
 
आणि इथेच नेमका युरोपियन मर्सिनरींमध्ये आणि इंग्रजांच्या भारतीय सैन्यामध्ये फरक होता. युरोपच्या अपरिचित हवामानात गोठवून टाकणार्‍या थंडीत अपुरे कपडे अपुरी युद्धसामुग्री यांसह लढणार्‍या भारतीय सैनिकांनी अपूर्व हिंमत, अपार सोशिकता सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करण्याची प्रचंड जिगर यांचं असं काही दर्शन घडवलं की, इंग्रज सेनापतीही थक्क होऊन गेले. भारावून गेले. युद्धानंतर सैनिकांसमोर भाषण देताना अँग्लो फ्रेंच सेनेचा सर्वोच्च सेनानी जनरल फर्डिनंड फॉक भारतीय सैन्याकडे वळला आणि म्हणाला, ’’जेव्हा तुम्ही स्वच्छ सूर्यप्रकाशाने आच्छादलेल्या तुमच्या पूर्वेकडच्या मायभूमीत परत जाल, तेव्हा तुमच्या देशबांधवांना सांगा की आपल्या लोकांना उत्तर युरोपमधल्या फ्रान्स आणि फ्लँडर्सची थंडगार भूमी आपल्या रक्ताने चिंब भिजवली. अत्यंत पराक्रमी आणि दृढनिश्चयी शत्रूला त्यांनी आपल्या तितक्याच दृढ पराक्रमाने मागे लोटलं. आम्ही पराभवाच्या गर्तेत जात असताना त्यांनी आम्हाला अंतिमविजयाचा मार्ग दाखवला. जा, सगळ्या भारतीयांना आमचा निरोप सांगा की, आमच्या भूमीवर सांडलेल्या त्यांच्या रक्ताची स्मृती आम्ही आमच्या मृत विरांइतक्याच भक्तीने आणि आदराने जतन करू.’’
 
या भावनेतूनच इंग्रज सरकारने ठरवले की, पहिल्या महायुद्धात आणि लगेच झालेल्या अफगाण युद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतींचं एक स्मारक उभारायचं. नवी दिल्ली हे नवं शहर ज्या वास्तुरचनाकार एडविन ल्युटेन्सने उभारले, त्यानेच तत्कालीन किंग्ज वे या रस्त्यावर ’ऑल इंडिया वॉर मेमोरियल’ या नावाने ही लाल दगडाची भव्या कमान उभारली. १९२१ ते १९३१ अशी दहा वर्षं ते काम चाललं. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ’किंग्ज वे’ चं नामकरण ’राजपथ’ असं झालं आणि ’वॉर मेमोरियलचं’ ’इंडिया गेट’ झालं. १९७१ साली भारत सरकारने एक फार महत्त्वाचं कामकेलं. ‘इंडिया गेट’च्या भव्य कमानीखाली, सुंदर काळ्या संगमरवराची एक मेघडंबरी उभारण्यात आली. त्या मेघडंबरीत एक उलटी बंदूक आणि तिच्या दस्त्यावर एक लष्करी शिरस्त्राण लटकवलेलं आहे. मेघडंबरीच्या चारी बाजूंना चार मशाली कायम पेटलेल्या असतात. स्वतंत्र भारतासाठी रणांगणावर बलिदान केलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांचं हे स्मारक ‘अमर जवान ज्योति’ या नावाने ओळखलं जातं. या अगदी साध्या परंतु भावनिकदृष्ट्या मौल्यवान स्मारक उभारणीमुळे ‘इंडिया गेट’चा सगळा संदर्भच बदलून गेला. इत:पर ‘इंडिया गेट’ हे गुलाम भारतीयांसाठी इंग्रज धन्याने उभारलेलं स्मारक ही ओळख बाजूला पडली आणि भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचं, धगधगत्या क्षात्रतेजाचं स्मारक ही नवी ओळख निर्माण झाली.
 
१७ व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने भारतातल्या हिंदू आणि मुसलमान सैनिकांना नोकर्‍या देऊन भारतीय सैन्य उभारलं. या सैन्याने इंग्रजांना भारत जिंकून दिला. पण धूर्त इंग्रजांनी भारतीयांना कधीही अधिकारीपद दिलं नाही. भारतीय सैनिक हा नोकरीत कितीही ‘सिनियर’ असला तरी तो शेवटपर्यंत ‘सिपॉय’ म्हणजे प्यूनच राहायचा आणि पोरगेल्या ‘ज्युनियर’ इंग्रज ऑफिसरकडून त्याला हुकूमस्वीकारावे लागत. ही स्थिती पहिल्या महायुद्धाने पालटली. समोरून कजाखी जर्मन सैन्याचा कडवा मारा चालू असताना आणि इंग्रज अधिकारी ठार वा घायाळ होऊन पडलेले असताना, भारतीय ‘सिपॉय’ लोकांनी पलटणीची कमांड आपल्या हाती घेतली आणि योग्य त्या हालचाली करून शत्रूचा हल्ला उधळून लावून, असामान्य पराक्रमाबरोबरच असामान्य नेतत्व गुणही प्रकट केले. असं या युद्धात अनेकदा घडलं. परिणामी इंग्रजांना भारतीय तरुणांसाठी ‘ऑफिसर्स केडर’ खुली करावीच लागली आणि सक्षमभारतीय तरुणांची पहिली तुकडी ऑफिसर बनण्यासाठी ब्रिटनच्या ‘सँडहर्स्ट मिलिटरी स्कूल’मध्ये दाखल झाली.
 
इतिहासाचं एक चक्र पूर्ण झालं. हिंदू राजे मुख्यतः गजदल आणि पायदळ यांच्या आधारे स्थिर युद्ध करीत. आक्रमक तुर्कांनी स्थिरयुद्ध टाळून अत्यंत चपळ अशा घोडदलाच्या आधारे युद्ध वेगवान, गतिमान केलं आणि हिंदूंना पराभूत केलं. पुढे तुर्कांनी हिंदूंना आपल्या सैन्यात नोकर्‍या दिल्या पण फक्त सैनिक म्हणून अधिकारी म्हणून नाही.
 
 
परंतु पुढे तुर्कांना हिंदूंसाठी अधिकारीपदं खुली करावीच लागली. हिंदूंनी पाहाता-पाहाता तुर्कांची गतिमान युद्धपद्धती आत्मसात करून त्यांनाच शह दिला. याचं सगळ्यात मोठं आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शहाजीराजे भोसले. निजामशहाच्या सैन्यात सामान्य शिलेदार असणार्‍या (म्हणजे सिपॉय असणार्‍या) मालोजी भोसल्यांचा मुलगा शहाजी भोसले, त्याच निजामशहाचा सरलष्कर म्हणजे कमांडर इनचिफ आणि नंतर वजीर म्हणजे पंतप्रधान झाला आणि शहाजी भोसल्यांचा मुलगा तर हिंदूराष्ट्र निर्माता झाला.
 
असो, तर गेल्या महिन्यात काही महत्त्वाच्या घटना घडल्या. ब्रिटिश सैन्यातले बारा-चौदा अधिकारी दिल्लीला आले. त्यांनी इंडिया गेटवरून पुष्पचक्र अर्पण केलं. आणखी काही दिवसांनी ब्रिटनचा युवराज चार्ल्स आणि लेडी कॅमिला यांनीही दिल्लीभेटीत इंडिया गेटवर पुष्पचक्र वाहिलं. आणखी काही दिवसांनी बेल्जियमचे राजे फिलिप आणि राणी मथिल्ड यांनी दिल्लीला येऊन ’इंडिया गेट’वर पुष्पचक्र वाहिलं. फ्लँडर्स हा परिसर बेल्जियमच्या हद्दीत आहे. जुलै १९१४ मध्ये महायुद्ध सुरू झालं. ते जर्मनीच्या बोल्जियमवरील आक्रमणाने. जर्मन आक्रमणाचा ताज्या दमाचा असह्य अग्निवर्षाव प्रथम झेलावा लागला तो बेल्जियमला आणि सप्टेंबर १९९४ मध्ये भारतीय सैन्य, मुंबईहून निघून फ्रान्सच्या मार्सेलिसमार्गे, बेल्जियमच्या फ्लँडर्स भागात पोहोचलं सुद्धा. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतीय लष्कराने दिल्लीच्या माणेकशॉं सेंटरमध्ये ’इंडिया इन फ्लँडर्स फील्ड’ नावाचं एक चित्रप्रदर्शन उभारलं होतं. ८ नोव्हेंबर २०१७ रोजी राजे फिलिप आणि राणी मथिल्ड यांनी त्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
- मल्हार कृष्ण गोखले