विदर्भातील शिक्षकांसाठी होणार ‘शिक्षणाची वारी’
 महा एमटीबी  06-Dec-2017

नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे स्टॉल
 
गुणवत्ता विकासाच्या प्रयोगांचे सादरीकरण


 

अमरावती : 
राज्य शासनाने गतवर्षीपासून शिक्षण क्षेत्रात आगळवेगळे प्रयोग राबविणारे आणि गुणवत्ता विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रयोग करणार्‍या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा शिक्षणाची वारी १४, १५ व १६ डिसेंबर रोजी अमरावती येथे होणार आहे. या वारीमध्ये विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक सहभागी होणार आहेत.

शासनाचा शिक्षण विभाग राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाच्या माध्यमातून पायाभूत चाचणी, डिजिटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक उपक्रम राबवित आहे. यासोबत राज्यातील शाळांमध्ये विविध शैक्षणिक प्रयोग करून, नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्माण करून गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

गतवर्षी लातूर व नागपूर येथे शिक्षणाची वारी घेण्यात आली होती. यंदा शिक्षण वारी अमरावती शहरात आयोजित करण्यात आली आहे. शिक्षणाच्या वारीचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी शिक्षण उपसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विदर्भातील माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. यंदाच्या शिक्षणाची वारीमध्ये महाराष्ट्रात ज्या शिक्षकांनी यशस्वीरीत्या शैक्षणिक उपक्रम राबविले, दर्जेदार आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारे शैक्षणिक साहित्य निर्माण केले, अशा शिक्षकांचे ५० स्टॉल्स राहणार आहेत. ‘शिक्षणाच्या वारी’ मध्ये शैक्षणिक साहित्यासह, गुणवत्ता विकासाचे प्रयोग, त्यांची मांडणी, सादरीकरण आणि काही प्रकल्प सादर करण्यात येणार आहे, राज्यामध्ये काही शाळांमधील शिक्षकांनी लोकसहभागातून टॅब उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. असे तंत्रस्नेही शिक्षक त्यांच्याकडील उपक्रमांचे सादरीकरण करणार आहे. ‘शिक्षणाच्या वारी’तून शाळांमधील शिक्षकांना काही नवीन शिकता यावे त्यांना शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा आयोजनामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.