नकारात्मक आघाडी
 महा एमटीबी  05-Dec-2017
 
 
देशात महाराष्ट्र राज्य हे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी राज्य होते. नंतर स्वातंत्र्योत्तर काळातसुद्धा विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र पुढारलेलाच राहिला. पण, गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या आकडेवारीतसुद्धा राज्याचा क्रमांक वर लागत आहे. नुकतीच केंद्र सरकारने २०१६ ची गुन्हेगारी आकडेवारी जारी केली. यात राज्याचा क्रमांक तिसरा लागत असून उत्तर प्रदेशचा क्रमांक प्रथम आहे. पण, राज्याने काही गुन्ह्यांत अक्षम्यपणे आघाडी उभारली आहे. महाराष्ट्रातून एकूण ४९ हजार ३३८ महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी फक्त २२ हजार ७०२ महिलांचा थांगपत्ता लागला. म्हणजेच, ४६ टक्के महिलांचा थांगपत्ता लागला. जे पुरुष बेपत्ता झाले, त्यापैकी फक्त ३९ टक्के पुरुषांचा सुगावा काढण्यात पोलिसांना यश आले. अपहरणात महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मध्ये आहे. म्हणजेच, देशात दुसरा क्रमांक लागतो. बलात्काराच्या गुन्ह्यात राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. महिलांवर हल्ला करण्यात राज्याचा प्रथमक्रमांक लागतो. राज्यात अशा प्रकारचे ११ हजार ३९६ गुन्हे घडले. लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारांच्या बाबतीत राज्याचा क्रमांक दुसरा लागतो. ऍट्रॉसिटीचे गुन्हे राज्यात कमी दाखल झाले, ही उल्लेखनीय बाब. भ्रष्टाचारात राज्याचा पहिला क्रमांक असून देशाच्या एकूण भ्रष्टाचारापैकी २२.९ टक्के भ्रष्टाचार महाराष्ट्रात होतो. सायबर गुन्ह्यात उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागत असून राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशमध्ये २,६३९ सायबर गुन्हे घडले असून राज्यात २,३८० गुन्हे घडले आहेत. भारतात सर्वाधिक फेसबुक, व्हॉट्‌सऍप वापरकर्ते आहेत. नोटाबंदीनंतरसुद्धा डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाली होती. पण, डिजिटायझेशन हे अजून सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यात झिरपले नसल्याने सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. ‘डिजिटल डिव्हाईड’ आणि या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सारखे असण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये १५ कोटी ९२ लाख ५० हजार १८१ रुपये मूल्यांच्या खोट्या नोटा आढळल्या. महाराष्ट्रात ४७ लाख ९९ हजार मूल्यांच्या खोट्या नोटा आढळल्याने त्यात ९६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वाधिक खोट्या नोटा या प. बंगालमध्ये सापडल्या असून त्यांचे मूल्य २ कोटी ३२ लाख ९५ हजार इतके होते. या प्रकरणी १८३ जणांवर गुन्हे दाखल केले गेले. तेव्हा या गुन्हेगारीचे आकडे पाहता, आपल्याला अधिकाधिक दक्ष राहण्याची गरज तर आहेच, शिवाय पोलीस यंत्रणांनाही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अजून कसोशीने प्रयत्न करावे लागतील, यात काही शंका नाही.
 
 
सुमार दर्जाचे शोधनिबंध
अकुशल कामगार आणि पाट्या टाकण्याचे कार्य हे सर्व क्षेत्रात आढळते. संशोधनासारखे क्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. नुकतेच ‘नेचर’ या संस्थेने एका विस्तृत लेखात शोधनिबंध कशा प्रकारे सुमार दर्जाचे असून बनावट पद्धतीने छापले जातात याचा ऊहापोह केला. जेवढ्या शोधनिबंधांवर आधारित हा लेख होता, त्यात ३२ शोधनिबंध हे भारतीय होते. शोधनिबंध प्रसिद्ध होणे हा एक नियम होता. पुढील प्रगतीसाठी तो फक्त नियम म्हणूनच चालतो, त्यात काही दर्जा नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड सिरिअल क्रमांक असलेल्या पत्रिकेत शोधनिबंध प्रसिद्ध होण्याची अट. या पत्रिकेत संपादकांनी पैसे घेऊन लेख छापल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. विंचूदंशावर जागतिक कीर्तीवर संशोधन करणारे डॉ. हिम्मतराव बाविस्कर यांनी आपले आत्मचरित्र ’बॅरिस्टरचं कार्ट’ या पुस्तकात म्हटले की, त्यांनी विंचूदंशावर एक शोधनिबंध लिहिला. नागपूरच्या एका मेडिसीनच्या प्राध्यापकांनी हा शोधनिबंध वाचला आणि त्यावर त्यांचे नाव टाकण्यास सांगितले आणि म्हणाले की, ‘‘या प्रबंधावर माझे नाव घाल, म्हणजे भारतात कोणत्याही नियतकालिकात माझ्या नावामुळे संपादक तो प्रसिद्ध करेल.’’ बावस्कर नकार देत म्हणाले की, त्यांनी एकही विंचूदंशाचा रुग्ण तपासला नाही. नंतर त्यांनी तो प्रबंध भारतातील एका वैद्यकीय नियतकालिकाच्या संपादकाला पाठविला. प्रबंधावरील अनोळखी नाव वाचून त्यांनी लेख साभार पाठवला. तसेच हा प्रबंध काही विशेष नाही, माहिती अपूर्ण आहे, इंग्रजी अशुद्ध आहे, टेबल्स बरोबर नाहीत व विंचूदंशाच्या ठिकाणी वेदना कमी हे निदान पटत नाही. सदर लेखक असोसिएशनचा सदस्य नाही म्हणून प्रबंध प्रसिद्ध करता येत नाही, अशी पुष्टी जोडली. नंतर बावस्करांनी एका प्राध्यापिकेची मदत घेऊन लंडनच्या लान्सेटमध्ये तो शोधनिबंध पाठवला. त्यांनी तो सुधारून छापला. जागतिक स्तरावर शोधनिबंधाचा दर्जा तपासण्यासाठी पीअर रिव्ह्यू परीक्षण केले जाते. पण, या प्रक्रियेतसुद्धा त्रुटी आढळल्या. समीक्षण पुनरावलोकन करणारी मंडळी ही अभिजन असून ती यावर नियंत्रण ठेवतात. १९९८ साली हे पुनरावलोकन कसे फसते याचा प्रत्यय आला होता. खोट्या लोकांनी पीअर रिव्ह्यू केलेले आढळले. अशा शोधनिबंधात वाङ्‌मय चौर्य केल्याची प्रकरणेही आढळली. त्यामुळे शोधनिबंधांच्या मजकुराच्या दर्जावर आणि शोधनिबंधकांच्या विश्वासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तेव्हा, अशाप्रकारे उचलेगिरी आणि फसवेगिरी करुन केलेले दर्जाहीन शोधनिबंध ज्ञानात भर घालणारे नव्हे तर ज्ञानाचौर्याचेच छापील साक्षीदार ठरतात, हेच खरे.
- तुषार ओव्हाळ