संगणकीय शैक्षणिक क्रांतीचा दूत
 महा एमटीबी  05-Dec-2017
 
 
"माझ्या लहानपणापासून मी ऐकत होतो की, २०२५ सालापर्यंत भारत हा तरुणांचा देश असेल. जगात इतर देशांमध्ये वृद्ध लोकसंख्या जास्त असेल, तर भारतात तरुणांची संख्या जास्त असेल. देशाबद्दल प्रेम असल्याने साहजिकच मन भरून यायचे, पण पुढे कामानिमित्त २००५ सालापासून देशातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातल्या खेड्यात फिरताना जाणवले की, २०२५ साली भारत तरुणांचा देश असेल, पण तो ज्ञानी, कुशलतंत्रज्ञ युवकांचा देश असेल का? आणि या विचारांनी मला माझ्या कामाची प्रेरणा दिली.’’ महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील ७५०० शाळांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात संगणकीय क्रांती आणणारे गिरीश प्रभू सांगत होते. गिरीश प्रभू मूळचे कोकणातले सावंतवाडीचे. वडील श्रीकृष्ण प्रभू आणि आई अनुराधा प्रभू समाधानी, पण समाजशील वृत्तीचे.
 
गिरीश यांनी आयटीमध्ये शिक्षण घेताना ’ऑनलाईन शिक्षणपद्धती’ या विषयावर प्रोजेक्ट केला. तेव्हा त्यांना जाणवले की, देशातल्या युवकांसाठी काळाची गरज असलेला हा विषय आहे. गिरीश यांनी आयुष्याचे लक्ष्य ठरवले की, तंत्रज्ञान हे सर्व क्षेत्रामध्ये क्रांती करत आहे, तर मग भारतीय शिक्षणक्षेत्रातही तंत्रज्ञानाने सुलभता आणायला हवी. त्याचवेळी त्यांच्या प्रयत्नाला चालना देणारी घटना घडली. त्यांचे बंधु अमेरिकेला होते. गिरीश यांच्या आईला वाटले की, आपण मुलाशी ई-मेल किंवा इतर संगणक सुविधांचा वापर करून बोललो तर... पण, तिला संगणकीय ज्ञान नव्हते. गिरीश म्हणतात, ’’मी आईला ई-मेल कसे करायचे, चॅट कसे करायचे, मेसेज कसे तयार करून पाठवायचे शिकवू लागलो. मला वाटले मी चांगले शिकवले. पण झाले काय की, आईला मी शिकवलेले काही कळलेच नव्हते. का? विचार केल्यावर कळले की, मी आईला शिकवताना असा विचार केलाच नव्हता की, संगणक तिच्यासाठी पूर्णतः नवीन आहे. या गोष्टीचा विचार करताना मग अचानक वाटले की, भारत सरकारने काळाची गरज ओळखून सर्वच क्षेत्रात संगणकीय वापर गरजेचा केला आहे, पण सरकारी क्षेत्रात किंवा खाजगी क्षेत्रात वर्षानुवर्षे कामकरणार्‍या लोकांनाही अचानक संगणकाचा वापर करून कामकरायला लावणे म्हणजे कठीण गोष्ट होती. ही देशासाठीही चांगली गोष्ट नक्कीच नव्हती.’’
 
त्यामुळे मग गिरीश यांनी ’गुरूजी वर्ल्ड’च्या अंतर्गत पहिलेवहिले सॉफ्टवेअर तयार केले. त्या सॉफ्टवेअरचा वापर करून कुणीही व्यक्ती संगणक कसा चालवावा? त्याचा योग्य आणि जास्तीत जास्त वापर कसा करावा? हे कुणाचीही मदत न घेता शिकू शकत होते. या सॉफ्टवेअरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे गिरीश कामानिमित्त खेड्यापाड्यात गेले असता त्यांना जाणवले की, तिथल्या बालकांमध्ये अपार ऊर्जा, जिज्ञासा आहे, कष्ट करण्याची धमकही आहे. पण त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान नाही, हीच मुले २०२५ साली युवक होतील. प्रस्थापित आहेरे गटातील युवक त्यांच्या क्षमतेनुसार जग जिंकतील. पण, हा अपवाद वगळता खेड्यापाड्यातील ही मुले तंत्रज्ञान, संगणकीय योग्य ज्ञानाअभावी क्षमता असूनही स्पर्धेच्या बाहेरच राहतील. गिरीश या विचारांनी अस्वस्थ झाले आणि त्यांनी मुलांचे पूर्ण शालेय शिक्षण संगणक प्रणालीमध्ये मनोरंजक पद्धतीने तयार केले. संगणक प्रणालीमधले या शिक्षणाचे सॉफ्टवेअर गरजूंपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी आणि त्यांची पत्नी संजीवनी स्वतः खेडोपाडी जाऊन संगणक, आधुनिक शिक्षण प्रणालीचे महत्त्व पटवून देऊ लागले. अत्यंत स्वस्तातली ही प्रणाली शाळा स्वखुशीने घेऊ लागली. एखाद्या शाळेची तेवढीही कुवत नसेल, तर गिरीश त्या शाळेला परवडेल त्या किमतीत संगणक प्रणाली, शिक्षण सुविधा देऊ लागले. ‘ऍपल’च्या स्टिव्ह जॉब्सच्या कामगिरीला प्रमाण मानणार्‍या गिरीश यांनी स्वप्न पाहिले की, संगणक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवायचा. तोच व्यवसायही आणि तेच ध्येयही. त्यातून समाजकल्याणही साधले पाहिजे. या सर्व बाबींचा विचार करून त्यांनी संगणक क्षेत्रात स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आणि त्याद्वारे महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव प्रगतीचे कार्यही केले. स्वतःसोबत समाजाच्या आणि देशाच्या विकासाचेही स्वप्न पाहणारा सावंतवाडीचा हा सुपुत्र संगणक सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक ध्येयनिष्ठ व्यक्ती म्हणून गणली जात आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.
 
- योगिता साळवी