दुदर्वी वर्तुळ
 महा एमटीबी  04-Dec-2017 

स्वातंत्र्यपूर्व काळात कुणी व्यक्ती तुरुंगात जायची तेव्हा ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास सोसतेय, अशी एक धारणा होती. पुढे आणीबाणीमध्येही राष्ट्रप्रेमी नागरिकांना महामहिम कॉंग्रेस सरकारच्या दयेने ठोठावलेल्या शिक्षेमुळे तुरुंगवास घडला आणि तमाम कारागृहे या राष्ट्रप्रेमी नागरिकांनी ओसंडून वाहू लागली. आता तुरुंगात जातात ते गुन्हेगार. या ना त्या स्वरूपात कायद्याविरुद्ध, देशाविरुद्ध, समाजाविरुद्ध वर्तन करणारे लोक गुन्हेगारीच्या कक्षेत आले. गुन्हेगारीचे स्वरूप बदलले, मानसिकतेमध्ये तर अतोनात बदल झाला.

 

गुन्हेगाराला तुरुंगवासाची शिक्षा होते तेव्हा काय होते? तिथल्या दैनंदिन जगण्याने त्याचे मनपरिवर्तन होईल, त्याच्या कृत्याचा त्याला पश्‍चात्ताप होईल, तो सुधारेल. आपण केलेल्या कृत्याने आपल्याला तुरुंगात राहावे लागते, तुरुंगवासाचे जगणे खडतर. या खडतर जागी परत नको रवानगी व्हायला या भीतीने गुन्हेगार भविष्यात पुन्हा गुन्हे करण्यास धजावणार नाही, असे काहीसे गणित तुरुंगवासामागे असावे. असे फक्त चित्रपटातच तुरुंग पाहणार्‍या आपल्यासारख्या आम जनतेला वाटते. काही महिन्यांपूर्वीचे भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये प्रकरण किंवा सांगलीमधील अनिकेत कोथळे प्रकरण पाहून तर तुरुंगाबद्दल, पोलीस कस्टडीबद्दलचे मत आणखीनच गडद होते.

 

असो, मूळ मुद्दा तुरुंगवासाचा आहे. शिक्षा यावर समाजशास्त्रामधल्या थिअरीनुसार शिक्षा कशी असावी, याबद्दल बरेच मतप्रवाह आहेत. त्यापैकी एक की शिक्षेचा कालावधी असा असावा की, त्यामुळे गुन्हेगार सुधारेल, त्याची मानसिकता समाजशील होईल. पुन्हा गुन्हा करण्याकडे गुन्हेगाराचा कल जाऊ नये. (निर्भया, कोपर्डी, खैरलांजी आणि नितीन आगेचे गुन्हेगार, देशद्रोही कृत्य करणारे गुन्हेगार हे राक्षस आहेत, ते सुधारण्यापलीकडे आणि माणूस म्हणण्यापलीकडले आहेत त्यामुळे शिक्षेची सुधारणा थिअरी त्यांना लागू होत नाही) पण जगभराच्या गुन्हेगारांना दिलेल्या शिक्षेकडे पाहिले तर हे चित्र दिसते का? उलट वास्तव असे आहे की, गुन्हेगार व्यक्ती तुरुंगात गेली की पुढे भविष्यात या ना त्या गुन्ह्यांसाठी ती व्यक्ती तुरुंगाच्या वार्‍या करतच राहते. कारण तुरुंगातही एक जग वसत असते आणि नवीन गुन्हेगारांना ते जग आपल्या परिघात बांधण्याचा प्रयत्न करते. नव गुन्हेगार ते अट्टल गुन्हेगार हे एक दुर्दैवी वर्तुळ आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.


वर्तुळ रोखायला हवे

तुरुंगात जाणे हे पहिल्यांदा गुन्हेगारी करणार्‍या व्यक्तीसाठी धक्कादायक, दु:खदायक आणि भीतीदायकही वाटते, पण सातत्याने तुरुंगाची हवा खाणार्‍या व्यक्तीला तुरुंगाचे भय वाटेनासे होते. तुरुंग कधीही न पाहिलेल्या पापभिरूंसाठी हे विधान म्हणजे काहीच्या काहीच वाटेल. पण मोठमोठ्या तुरुंगाच्या बाहेर किंवा जिथे तुरुंगवास, पोलीस कस्टडीचा निकाल दिला जातो अशा न्यायालयांबाहेर एक चक्कर टाकली तर या विधानाची सत्यता पटेल. दुसरीकडे एखादी व्यक्ती तुरुंगात गेली, म्हणजे काही तरी मोठा गुन्हा केला म्हणूनच गेली असेल असे समाजाला वाटते. त्यामुळे समाजातील फाजील भिडस्त वर्ग मग अशा लोकांच्या दबदब्याला विनाकारण बळी पडतो. पहिले कोणी कुत्रे विचारायचे नाही पण तुरुंगातून सुटून आल्यापासून मनातल्या मनात शिव्या देऊन का होईना लोक गुन्हेगाराला भीतीने मान देतात. त्यामुळे गुन्हेगाराला वाटते, ’’बदनाम हुआ तो क्या, नाम तो हुआ.’’ मग अशा काळ्या प्रसिद्धीच्या झोतात जगण्याची त्याला सवयच पडते. दुसरीकडे तुरुंगातही बर्‍यापैकी गोतावळा जमलेला असतो. एखादा वकील किंवा न्यायाधीश ज्या थाटात कलमांचा अर्थ आणि सजा सांगेल त्या पद्धतीने कलमांचा अर्थ लावण्यात हे गुन्हेगार तुरुंगात शिकतात. त्यामुळे कुठला गुन्हा कसा केला असता तर शिक्षा कमी झाली असती याचाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो.

 

त्यातच आपल्याकडे तुरुंग कमी आणि गुन्हेगार जास्त झाले आहेत. तुरुंगाच्या क्षमतेबाहेरच्या संख्येने गुन्हेगारांना तुरुंगात अक्षरश कोंबले जाते. तुरुंगाच्या क्षमतेबाहेर गुन्हेगार आल्याने मर्यादित संख्येने असलेले तुरुंगातले शासकीय अधिकारीवर्गही हतबलच होतात. सगळ्या गुन्हेगारांकडे लक्ष देणे जमत नाही. त्यामुळे साहजिकच तुरुंगातच टोळीयुद्ध, टोळी बनणे, टोळ्यांचे कामाचे स्वरूप ठरवणे वगैरे कामे विनासायास होतात. नवगुन्हेगाराला अट्टल गुन्हेगार होण्यास मुळीच वेळ लागत नाही. यावर उपाय काय? गुन्हेगारांच्या वाढत्या संख्येला आळा बसवणे हाच होय. पण ती दूरगामी प्रक्रिया आहे. तूर्तास या गुन्हेगारांना पुरे पडतील इतके तरी तुरुंग हवेत. नेमका हाच दृष्टिकोन ठेऊन राज्य सरकाने नवीन कारागृहासाठी मानखुर्दमध्ये ५ एकराचे भूखंड निश्‍चित केले आहे. त्यामुळे नव्या कारागृहाचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या तुरुंगाची निर्मिती होणार आहे. ते गरजेचे आहेच म्हणा पण नवगुन्हेगार ते अट्टल गुन्हेगार हे वर्तुळ रोखायला हवे. 

  - योगिता साळवी