आंबेडकर चळवळीविषयी माझ्याकडे साडेचार हजार पुस्तकं हे माझे वैभव - रमेश शिंदे
 महा एमटीबी  04-Dec-2017वाचाल तर वाचाल!हा लाखमोलाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. रमेश शिंदे यांनी गेली ६१ वर्षे आंबेडकरांनी लिहिलेली व त्यांच्यावर लिहिलेली ग्रंथसंपदा मिळवली व ती जतन केली. वाचाल तर वाचालहा संदेश खऱ्या अर्थाने या आंबेडकरांच्या अनुयायाने सार्थ केला. ही ग्रंथसंपदा मिळवणे, जतन करणे, संशोधकांना ती उपलब्ध करून देणे याबाबत महा एमटीबीने त्यांच्याशी केलेली खास बातचीत.

 

आंबेडकरांनी लिहिलेले आणि त्यांच्याविषयीचे लेखनसाहित्य मिळविण्यास तुम्ही कधी सुरुवात केली?

पूर्वी आम्ही वडाळ्याला राहायला होतो. तेव्हा आम्ही विद्यार्थीमित्रांनी ठरवले की, आंबेडकरांनी लिहिलेले आणि त्यांच्याविषयी लिहिले गेलेले साहित्य मिळवायचे आणि सामान्यजनांपर्यंत आंबेडकरांचे विचार पोहोचविण्यासाठी वाचनालय चालवायचे. पण नंतर ते न जमल्यामुळे राहून गेले. आम्ही बाबासाहेबांची नरे पार्कवरील सर्व भाषणे ऐकली. आमची बौद्धिक उंची तेव्हा फार नव्हती, पण आपल्या नेत्याचे भाषण ऐकण्याची उत्सुकता होती. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा माझे वय २३ होते. तेव्हापासून बाबासाहेबांचे लेखन जमा करण्यास सुरुवात केली आणि त्यात बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती मिळविण्याचा अट्टाहास असायचा.

 

तुम्ही हे साहित्य कुठून आणि कसे गोळा केले? आणि ते सांभाळताना काही अडचणी येत आहेत का?

मुंबईत बरेच साहित्य मिळाले. फोर्टमध्ये एक ब्रिटिश कंपनी होती. तिथे हे ग्रंथ मिळाले. नंतर पुण्यात बरीच ग्रंथसंपदा मला मिळाली. पुस्तकांसाठी मी मुंबई ते ठाणेदरम्यान सर्व पादचारी रस्ता पिंजून काढला. पण मुंबईत दुर्मीळ ग्रंथ मिळण्याचे प्रमाण फार कमी, सध्या उपलब्ध असलेली पुस्तकं मुंबईत मिळतात. दुर्मीळ पुस्तकांचे माहेरघर म्हणजे पुणे. म्हणून मी पुण्यात फार फिरलो. बॉम्बे पोर्टलमध्ये मी काम करत होतो आणि ४-५ जण मिळून आम्ही काम करायचो. मी जर कामावर नसेन तर कामाचा खोळंबा व्हायचा नाही. माझ्या सहकारी कर्मचारी मित्रांनी खूप सहकार्य केले. मला पुस्तकांचा छंद आहे, याची त्यांना कल्पना होती. मग ते मला पुण्यात जाण्यास मुभा देत आणि माझ्या पश्चात काम सांभाळण्याची हमी देत. पुण्यात सत्यशोधक समाजाची जवळजवळ ७०-८० पुस्तिका मला पुण्यात मिळाल्या. प्रबोधनकार ठाकरेंची २८ पुस्तकं मला त्यावेळी पुण्यात मिळाली. काही पुस्तकं ही प्रबोधनकारांकडेसुद्धा नव्हती. पुण्यात पु. ग. सहस्रबुद्धे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत्येक आवृत्ती मला दिली. ही संपदा सांभाळण्यात मोठी अडचण आहे आर्थिक. ही पुस्तकं मिळविण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. घर सांभाळून पुस्तकं विकत घेण्यास फार अडचण व्हायची. कधी कधी तर घरी पैशांची चणचण असताना मी पुस्तकं विकत घ्यायचो, त्यामुळे वादही झाले. ऑफिसमध्ये एक कारकून होता. तो खाजगी सावकार होता. त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेऊन पुस्तकं विकत घेतली आहेत. २६ जुलै २००५ साली जेव्हा मुंबईत अतिवृष्टी झाली तेव्हा घरात भरपूर पाणी साचले होते. त्यात काही पुस्तकांचे नुकसान झाले.

 

किती पुस्तकं आणि लेखन साहित्य तुमच्याकडे सध्या उपलब्ध आहे?

३५०० ते ४००० ग्रंथ माझ्याकडे उपलब्ध आहेत. या ग्रंथसंपदेत आंबेडकरांनी लिहिलेली, आंबेडकरांवर लिहिलेली, सत्यशोधक चळवळीवरील, दलित चळवळ, पँथर चळवळ, प्रबोधनकार लिखित पुस्तकांचा समावेश आहे. चरित्र, टीकात्मक, चळवळीवरील इतिहास आणि टीकात्मक अशी दोन्ही बाजूच्या पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तकं माझे वैभव आहे.

प्रॉब्लेम ऑफ द रुपीहा १९२३ साली लंडनच्या पी.एस किंग ऍन्ड सन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती माझ्याकडे आहे. तसेच त्यांचे हू वेअर शुद्राज’, ‘एव्होलिशियन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’, ‘ऍनहिलेशन ऑफ कास्टयांच्या प्रथम आवृत्ती माझ्याकडे आहेत.

 

तुमच्याकडील साहित्याचा संशोधकांनी कसा वापर केला?

बाबासाहेबांचे चरित्रकार धनंजय कीर, चांगदेव खैरमोडे तसेच य. दि. फडके, गंगाधर पातावणे, वामनराव होवाळ यांनी माझ्याकडील साहित्याचा संदर्भ घेतला. भारतासह अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मन अशा विदेशातील संशोधकांनी माझ्याकडील साहित्यांचा संदर्भ घेतला आहे. सर्व प्रकारच्या संशोधकांना मी पूर्ण सहकार्य केले. यासाठी मी कुणाकडून पैसे घेतले नाही. बाबासाहेबांच्या कार्याचा आणि विचारांचा लोक अभ्यास करतात याचे समाधान जास्त होते. हे संशोधक सुद्धा कमालीचे प्रामाणिक होते. कुठलेही पुस्तक त्यांच्याकडून फाटले नाही अथवा गहाळ झाले नाही.

 

या साहित्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला?

बाबासाहेबांचे कार्य आणि कतृत्व कळण्यास या साहित्याची फार मोठी मदत झाली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी एवढे मोठे कार्य केले, याची जाणीव या साहित्यामुळे झाली. आंबेडकरांच्या जडणघडणीत त्यांचे वडील रामजीबाबा यांनी खूप मेहनत घेतली.

 

आजच्या काळात आंबेडकरांनी लिहिलेल्या लेखनाचे कितपत महत्त्व आहे?

संविधानात बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाचा समावेश केला आहे. हजारो वर्षे या देशात त्यांच्या अभाव होता. ती मूल्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला दिली. ते विचार हे आजही लागू आहेत. बाबासाहेब हे ब्रिटिश काळात मजूर मंत्रिपदी होते. यांनी महिलांसाठी गरोदरपणात भरपगारी रजा देण्याचा कायदा केला. त्याच कायद्याचे महत्त्व आजही अबाधित आहे. भारतात विभिन्न जातीधर्माचे लोक सुखेनैव नांदतात याचे श्रेय जाते बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला. आंबेडकरांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.

 

तुकाराम शिंदे 

संपर्क क्रंमांक : ९७६९७९७३२०

पत्ता : घर क्रमांक: ३२१, चाळ क्रमांक: ४०, मोतीलाल नगर क्रमांक १, गोरेगाव पूर्व, मुंबई

आंबेडकरांचे साहित्य संपदा वाचण्यासाठी

  इथे क्लिक करा

आंबेडकरांचे समग्र लेखन आणि भाषणे वाचण्यासाठी

 

 तुषार ओव्हाळ