मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत गोदेच्या काठी
 महा एमटीबी  30-Dec-2017
 
 
 
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला मंगळवारी भेट दिली. ’क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांच्या ’शेल्टर’ प्रदर्शनाचा समारोप तसेच त्र्यंबक येथील श्री निवृत्तीनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली होती. अत्यंत धावत्या दौर्‍यात त्यांनी ज्या सकारात्मकतेचे दर्शन घडवल्यामुळे नाशिककर भारावून गेले. निवृत्तीनाथ मंदिरास भेट देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री. त्र्यंबकच्या विकासासाठी खास बैठक बोलविण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. तसेच "नाशिकचा ’ब्रॅण्ड’ तयार व्हावा, याकरता राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असून मी नाशिक दत्तक घेतले असल्याने हे शहर चांगलेच झाले पाहिजे. समृद्धी महामार्गाला नाशिकशी जोडण्यासाठी ’डेडीकेटेड कनेक्टर’ बाबत अभ्यास हातामध्ये घेऊ, जेणेकरून महाराष्ट्राला २० वर्ष पुढे घेऊन जाणार्‍या समृद्धी महामार्गासोबत नाशिक थेट जोडले जाईल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ’शेल्टर’ या कार्यक्रमामध्ये केले. "नाशिकला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असून एक मोठा इतिहास आहे. बदलत्या नाशिकला नवा आकार देण्याचे काम बांधकाम व्यावसायिक करत आहे. नाशिक शहर हे धडपडणार्‍या व शहराबाबत आपुलकी वाटणार्‍या नागरिकांमुळे मोठं होत आहे व अशा सर्व प्रयत्नांना राज्य सरकार व महानगरपालिका पूर्णपणे सहकार्य करेल," अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट असून याकरता ग्रामीण व शहरी भागात घरे बांधणी सुरु झाल्याने सर्वाधिक गुंतवणूक ही बांधकाम व्यवसायामध्ये होत आहे. ’पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत परवडणारी घरे देण्याचे शिवधनुष्य उचलण्याचे काम क्रेडाईने करावे," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बांधकाम व्यावसायिक व महानगरपालिका एकत्र आल्यास सर्वसामान्यांना चांगले घर सहज मिळू शकते. असे प्रस्ताव आल्यास त्याला तातडीने मान्यता देण्याचे काम सरकार करेल. खरंतर त्यांच्या या वक्तव्यातून सकारात्मक मुख्यमंत्री कसा असतो याचे दर्शन घडले. गेल्या तीन वर्षांच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा नाशिकला आले आहेत. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी नाशिकला इतक्या वेळा भेट दिली नाही. तरी प्रत्येक वेळी येथील नागरिकांच्या भावना जाणून ते भाष्य करतात. त्यामुळे मधल्या काळात विरोधकांनी निर्माण केलेले विकास विरोधी वातावरण निष्प्रभ होऊन जाते. आता पुन्हा एकदा त्यांनी याचा प्रत्यय दिला.
 
 
विशेष म्हणजे, नाशिक शहर बस वाहतुकीच्या मुद्द्याला त्यांनी हात घातला. एसटी महामंडळाने शहर बस वाहतुकीची जबाबदारी मनपाने घेतली पाहिजे, असे वारंवार सांगितले आहे. या प्रश्‍नाबाबत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महानगरपालिकेने ही जबाबदारी उचलावी, असे सूचित करतांना चांगली शहर वाहतूक ही प्रगत व चांगल्या शहराची निशाणी असल्याचेही सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाने ’सिटी’ बसेसमध्ये कपात करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे विशेषतः हजारो विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर मनपाने देखील याबाबत हालचाली गतिमान केल्या आहेत.
 
 
फडणवीस यांनी आपल्या हाती घेत विविध पर्यायांचे मार्ग दाखवल्यानंतर बससेवा ताब्यात घेण्याविषयी महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या महापौर रंजना भानसी यांनी ’क्रिसील’च्या सर्वेक्षण अहवालानंतर तातडीने महासभेत एकमताने निर्णय घेऊन शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर बदलीची चर्चा सुरू झाल्याने बससेवा मार्गी लाऊनच नाशिकचा मुक्काम हलवण्याचा निर्धार आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केला आहे.
 
 
महापालिकेने त्यासाठी ’क्रिसील’ या संस्थेची नेमणूक करत तीन महिन्यांत बससेवेबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशित केलेले आहे. महापौर भानसी यांनी ’क्रिसील’चा सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतचा ठराव महासभेत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबतचा एकमताने ठराव करून तो शासनाकडे पाठवला जाणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. ’क्रिसील’या संस्थेकडून सद्यस्थितीत शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही याबाबतचा फिजिबिलिटी रिपोर्ट महापालिकेला सादर केला जाणार आहे. सदरचा अहवाल साधारणपणे फेब्रुवारी २०१८ च्या दुसर्‍या आठवड्यात अपेक्षित असून, त्यानंतर हालचाली अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. 
 
 
 
शिवसेनेचा विरोध कायम
 
नाशिककरांची सोय व्हावी, या हेतूने मुख्यमंत्री आणि भाजपकडून हालचाली गतिमान झाल्या असताना शिवसेनेने मात्र आपली लोक विरोधी भूमिका कायम ठेवली आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी शहर बससेवा चालविणे हे काही महापालिकेचे काम नाही. शहर बससेवेसाठी शासन मदत करणार असल्याचे सांगितले गेले; परंतु नेमकी काय मदत करणार, याचा उलगडा केलेला नाही. वास्तविक पाहता महामंडळाने नकार दिल्यावर स्थानिक वाहतुकीसाठी काय करायचे याचा प्रश्‍न गंभीर होत असताना कोणताही विचार न करता विरोध करणे हे शिवसेनेच्या धोरणात कसे बसते तेच समजत नाही. जनता जनार्दन हे सर्व पाहतच असून पुढील निवडणुकीत या लोकविरोधी भूमिकेचा फटका शिवसेनेला बसल्याशिवाय राहणार नाही हेही तितकेच खरे. याउलट मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यातील भाषणात मात्र कुठेही राजकीय टिपण्णी किंवा टीका नव्हती. प्रत्येक वेळी ती असायलाच पाहिजे असे नाही. उलट कोणतीही राजकीय भूमिका न घेता लोकांचे प्रश्‍न सोडविणे महत्त्वाचे असते. ते होत असल्याने निश्‍चितच भाजपची प्रतिमा उजळली आहे.
 
- पद्माकर देशपांडे