‘आयसीसीआर’च्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड
 महा एमटीबी  30-Dec-2017
 
 
 
 
 
दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात ‘आयसीसीआर’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अतिशय मानाच्या तसेच प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पदावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड केली आहे. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे या पदावर विराजमान होणारे तिसरे मराठी अध्यक्ष आहेत.
 
 
 
 
 
याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. करणसिंह हे या पदावर कार्यरत होते. २०१४ साली त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिकामेच होते. त्यानंतर आता तब्बल तीन वर्षांनी या पदावर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.
 
 
कोण आहेत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे?
 
विनय सहस्रबुद्धे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेच्या कामाद्वारे सामाजिक जीवनास प्रारंभ केला. १९८३ ते ८५ या कालावधीमध्ये त्यांनी विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम केले. तब्बल १८ वर्षे इतका प्रदीर्घ काळ ते मुंबई विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून कार्यरत होते. ते अहमदाबाद येथील सरदार पटेल प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या संचालन मंडळाचे सदस्य आहेत. २००२ साली अफगाणिस्थान तालिबान्यांच्या तावडीतून मुक्त झाल्यावर सर्वात प्रथम गेलेल्या भारतीय सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी शिष्ट मंडळाचे त्यांनी नेतृत्व केले होते. मुंबईतील प्रतिष्ठित एशियाटिक सोसायटी या २०८ वर्षे जुन्या ग्रंथालयाच्या कार्यकारिणीचे ते उपाध्यक्ष आहेत. चतुरंग प्रतिष्ठानच्या वर्ष २०१३ च्या २३ व्या जीवनगौरव पुरस्कार निवडसमितीचे सहस्रबुद्धे अध्यक्ष होते. ठाण्यातील ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनी’चे ते सध्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. संस्थात्मक उभारणी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. Nation First, एकाकी पूर्वांचल, Beyond a billion Ballots, संघटनशास्र या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी लिखाण केले आहे. तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या वर्तमानपत्रातून त्यांनी स्तंभलेखन देखील केले आहे. 
 
 
काय आहे ‘आयसीसीआर’?
 
ICRR या संस्थेची स्थापना इ.स.१९५० मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केली होती. भारताचे अन्य देशातील सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी धोरण निश्चिती आणि कार्यक्रमांची आखणी करणे हे या संस्थेचे प्रमुख कार्य आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत ही संस्था येते. भारताबाहेरील एकूण ३६ देशांत या संस्थेची कार्यालये आहेत. या मार्फत सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. आतापर्यंत मौलाना आझाद, यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, पी.व्ही.नरसिंह राव, शंकर दयाल शर्मा, वसंत साठे यांनी देखील या प्रतिष्ठेच्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.